सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड ३१

Advertising World : टेलिव्हिजन प्रॉडक्शन डिपार्टमेंट भाग २

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग),  निवेदिका – किशोरी कुलकर्णी

Advertising World
Advertising World

निवेदिका – एकाच प्रकारचे प्रॉडक्ट बनवणार्‍या कितीतरी कंपनी मार्केटमध्ये असतात. त्यामुळे एकाच प्रॉडक्टच्या वेगवेगळ्या जाहिराती (Advertising World) आपण टीव्हीवर बघत असतो; मात्र त्यातली एखादीच जाहिरात आपल्या लक्षात राहाते. याचे कारण असते त्याचे हटके सादरीकरण. जाहिरातीची कल्पना तुम्ही किती वेगळ्या प्रकारे मांडू शकता, यावर त्या जाहिरातीचं यश अवलंबून असतं.यासाठी महत्त्वाचा असतो तो अनुभवी दिग्दर्शक. एखाद्या विशिष्ट प्रॉडक्टची जेव्हा जाहिरात करायची असते, तेव्हा दिग्दर्शक हा टिम निवडत असतो. कॅमेरामन, कलाकार, मेकअप मॅन कोण असतील; तर नंदनजी या टीमची निवड कशी होते?

नंदनजी – तुमचं प्रॉडक्ट काय आहे, अलंकाराचे आहे की कॉसमेटीकचे आहे. मग त्यासाठी मॉडेल वेगळं असतं. त्यासाठी कॅमेरा, लाईट्स डिमांड वेगवेगळे असते. एखाद्या साड्यांची जाहिरात असेल तर त्याची  टोटल टीम वेगळी असते. एखाद्या बिल्डरची जाहिरात करायची असेल, तर ती टीम, कॅमेरामन, मॉडेल, मेकअप वेगळं असतं. तुमची टीम, कलाकार, कॅमेरामन, तंत्रज्ञ हा बदलत असतो. बहुतांशी टेक्निकल टीम सारखी असू शकते; कारण ते टिमवर्क असतं आणि दिग्दर्शकाची त्या टिमशी नाळ जोडलेली असते, विचारांची लाईन जुळलेली असते. कदाचित संगीत दिग्दर्शक बदलू शकतो. एखादी टॉपच्या कॉसमॅटिकची जाहिरात करायची आहे, तर संगीत दिग्दर्शक वेगळा असेल; पण एखाद्या शेतातल्या प्रॉडक्टची जाहिरात (Advertising World) असेल तर संगीत दिग्दर्शक वेगळा असेल, अशी प्रत्येकाची पध्दत असते. त्या पद्धतीप्रमाणे प्रत्येकाला हायर करून ती जाहिरात बनवणं हे दिग्दर्शकाचं कसब असतं.

निवेदिका – दिग्दर्शक ज्यांच्याबरोबर ट्युनिंग असेल अशी टीम निवडतो. मग याचा परिणाम वातावरण हसतं-खेळतं ठेवायला होऊ शकत असेल का?

नंदनजी- नक्कीच. सेटवर वातावरण खेळीमेळीचं ठेवावं लागतं; कारण प्रत्येक जण हा मोकळा झाला पाहिजे. जी काही जबाबदार लोक आहेत ती लोकं गंभीर असतात त्याच्याबाबतीत; पण दिग्दर्शकाला जी अ‍ॅक्टिंग करून घ्यायची आहे, मोकळं वातावरण झाल्याशिवाय त्यांच्याकडून अ‍ॅक्टिंग काढणं मुश्कील असतं. हसत-खेळत वातावरण ठेवलं तर त्याला अ‍ॅक्टिंग करायला मजा येते आणि काम खूप चांगल्या पद्धतीचं निघतं. हे बहुतांशी ठिकाणी बघायला मिळते. गंभीर भूमिका असेल तरी वातावरण खेळीमेळीचं ठेवणं हे कसब आहे.

निवेदिका –  म्हणजे तिथले आर्टिस्ट, त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं हे दिग्दर्शकाच्या हातात आहे, हे भान त्याने जपले पाहिजे. कधीकधी जाहिरातींचा काळ वेगळा असतो. ऐतिहासिक, पौराणिक जाहिरात असते किंवा ग्रामीण चित्र कधी उभं केलेलं असतं. मग हे सगळं परिस्थितीचं भान दिग्दर्शक कसं जपतो?

नंदनजी- गोष्टीमधून त्या काळात घेऊन जाणारे जे दृश्य आहे, त्याचं भान ठेवलं गेलं पाहिजे. लोकेशन, बॅकग्राऊंड, प्रॉपर्टीज निवडताना या सगळ्याचं भान ठेवलं पाहिजे. कोणता काळ आहे याचा विचार करून बाहेरच्या सीनमध्ये विजेच्या तारा दिसता कामा नयेत. रेल्वे दाखवायची असेल, तर ती त्या काळातली दाखवायला हवी. कपडे त्या काळातले दाखवले पाहिजेत. या सगळ्याचा अभ्यास करून आणि त्याप्रमाणे सगळी निवड करून मग शूटिंग प्लॅन केलं जातं.

निवेदिका – बर्‍याचदा असं होतं की, काही नोटा बदलल्या जातात, तर त्याचंही भान दिग्दर्शकाने ठेवलं पाहिजे. जुना काळ दाखवायचा असेल, तर आजच्या चलनातल्या नोटा दाखवून उपयोग नाही. नंदनजी दिग्दर्शकाला तांत्रिक शिक्षण असणं कितपत गरजेचं आहे?

नंदनजी – फार गरजेचं आहे. तो दिग्दर्शक काय करतो आहे, नाटकाचा दिग्दर्शक असेल तर रंगभूमीवरच्या ज्या तांत्रिकता आहेत त्या सगळ्या त्याला चांगल्या अवगत पाहिजेत. चित्रपट करायचा असेल, तर त्याची फिल्म (रीळ), त्याचा कॅमेरा आणि इतर ज्या गोष्टी असतात; साऊंड, लाईट्स या सगळ्याचं तांत्रिक भान, नॉलेज आणि अनुभव हा सगळा त्या दिग्दर्शकाला असावा लागतो. जाहिरात खूप आकर्षक करायची असते; त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त अशी उपकरणे वापरावी लागतात. या सगळ्याचं तांत्रिक नॉलेज पाहिजेच. कधी कधी असं होतं की, नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आणि दिग्दर्शकाला तांत्रिक शिक्षण नाहीए; तर तो त्या तांत्रिक टीमकडून ते करून घेतो. त्या पद्धतीने तो पुढची कामं लावतो.

निवेदिका – मग तांत्रिक शिक्षणाच्या बाबतीतला एखादा किस्सा आठवतोय?

नंदनजी- पूर्वी एक चित्रपट येऊन गेलेला, ज्यात यमाचे काही सीन होते. त्याच्यावर आधारित जाहिरात तयार झाली होती. यम, यमदूत असे दोन-तीन जण त्यांनी वेष परिधान केले होते. सीन असा होता की, ढगातून ते खाली उतरतात. इथे तांत्रिक शिक्षणाचा अभाव दिसतो. ढगातून खाली उतरायचंय तर अनेक चित्रपटात आपण पाहिलेलं आहे. क्रोमा केलेलं असतं. क्रोमा की म्हणजे निळा किंवा हिरवा कपडा असतो. त्याच्यात नंतर ते की आऊट करतात आणि तिथे नंतर मागे दुसरा पाहिजे तो सीन भरला जातो. असाच प्रकार त्यांनी इथे केला.

Advertising World
Advertising World

निळा कपडा लावला आणि पायाकडून (खालून) शूट घेतला. हसत हसत ते खाली उतरत आहेत. हे बघताना तिथल्या कपडेवाल्याने, तांत्रिक लोकांनी त्याला पाठीमागच्या सारखा रंग कपड्यांमध्ये नसावा किंवा दागिन्यांमध्ये किंवा हातात ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यात नसावा हे पाहिले नाही. पोस्ट प्रॉडक्शनला एडिटिंगच्यावेळी मागचा रंग की आऊट होताना हा रंग पण की आऊट झाला. यमाने घातलेल्या वस्त्रांमध्ये तसाच निळा रंग होता. तो की आऊट झाला. त्यामुळे त्याच्या शरीरातून ते ढग दिसायला लागले. हे हास्यास्पद झालं आणि तांत्रिक अभाव असल्याचा तोटा ग्राहकाला झाला. अशा प्रकारे जाहिरात (Advertising World) खराब होते म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो, जे तांत्रिकदृष्ट्या ज्ञानी आणि अनुभवी आहेत त्यांच्याकडून काम करणं आपल्याला स्वस्त पडतं. कितीही महाग वाटलं तरी…

निवेदिका – या साठीच या मालिकेद्वारे एकच गोष्ट सांगितली जाते की अनुभवी, ज्ञानी एजन्सी कडूनच जाहिरातींची कामे करणे कधीही फायद्याचेच ठरते. तेव्हा श्रोतेहो हा विषय असाच चालू राहणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार.

पुढचा विषय –टेलिव्हिजन प्रॉडक्शन डिपार्टमेंट भाग ३ (क्रमशः)

jahirat VIshwa

(टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.)

वाचकांसाठी संपर्क –  नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com