सर्वात वर

जाहिरात विश्व -एपिसोड १७

बातमीच्या वर

 इलेक्ट्रॉनिक मिडिया : रेडिओ जाहिराती

लेखाच्या सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग)


निवेदिका – इलेक्ट्रॉनिक मीडियाविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, तर त्याबद्दल सुरुवातीला काय सांगाल?

नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग)

नंदनजी- इलेक्ट्रॉनिक मीडिया तसा तर फार जुना आहे; पण इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून हल्लीच्या काळात त्याला फार महत्त्व आलं आहे. आताचे जे 60-70 वर्षांचे गृहस्थ आहेत, त्यांच्या लहानपणापासून ते रेडिओ ऐकत मोठे झाले आहेत. एक वेगळं स्थान प्रत्येकाच्या मनात रेडिओने मिळवलं आहे. याच्या व्यतिरिक्त टेलिव्हिजनच्या माध्यमातून किंवा चित्रपटगृहांच्या माध्यमातून तिथल्या जाहिराती दृकश्राव्य या माध्यमाच्या द्वारे आता फेमस होत चालल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया तसं पहायला गेलं तर खूप व्हास्ट आहे.

निवेदिका – म्हणजे थोडक्यात दृकश्राव्य माध्यमातून जेव्हा आपण जाहिराती करतो तेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करतो, असं म्हणायला हरकत नाही. आजच्या काळात तर त्याचं महत्त्व जास्त अधोरेखित केलं पाहिजे. मग एकूणच इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून जाहिराती करण्याची आजच्या काळात काय गरज आहे, असं तुम्हाला वाटतं?

नंदनजी- खूप मोठी गरज आहे. हा मीडिया आजच्या काळात सर्वात महत्त्वपूर्ण मीडिया मानला जातो. अनेक मोठमोठ्या एजन्सीज आपल्या ग्राहकासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करायला भाग पाडतात; कारण प्रत्येक प्रॉडक्ट आज आपण रेडिओ, टेलिव्हिजनच्या माध्यमातून ऐकत असतो, बघत असतो आणि त्याचा मोठा परिणाम प्रत्येकावर होत असतो. याचं छोटं उदाहरण- तू कधी अमिताभ बच्चनला पाहिलं आहे का?

निवेदिका – हो, टीव्हीवर पाहिलंय.

नंदनजी- प्रत्यक्ष भेटली आहेस?

निवेदिका – नाही.

नंदनजी- तू कधी रेडिओवर अनाऊंसमेंट करणार्‍या व्यक्तींना भेटली आहेस?

निवेदिका – नाही; कारण ते सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत. त्यामुळे आपण त्यांचा आवाजच ऐकतो.

नंदनजी- तरीसुद्धा ही लोकं जवळ आली तर तुला ती ओळखीची वाटतात. ती तुमच्या मनावर आज अधिराज्य करत आहेत, त्यांना न बघता; याचं कारण दृक्श्राव्य हे माध्यम प्रत्येकाच्या मनावर जास्त काळ टिकून राहातं ते आपलंसं करतं हे सर्वात महत्त्वाचं.

निवेदिका – म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून जाहिरात केली तर ती जास्तीत जास्त लोकांपयत पोहोचते. अजून काय फायदे सांगता येतील?

नंदनजी – जाहिरातीसाठी दोन मीडिया सगळ्यात महत्त्वाचे. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया. प्रिंट मीडियामध्ये जाहिरात करायची झाली तर तुझ्याकडे एक वर्तमानपत्र येत असेल आणि दुसर्‍या वर्तमानपत्रात जाहिरात आली तर तुला ती कळणार नाही. आपण एकावेळी 10 वर्तमानपत्रं विकत घेऊ शकत नाही; पण एक रेडिओ किंवा एक टीव्ही घेतला तर त्याला मात्र 10 चॅनल, 10 रेडिओ स्टेशन्स असतात. ते आपण ट्यून करू शकतो तसा फायदा बघायला गेला तर प्रिंट मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्याला जास्त स्वस्त पडतो. आता आपल्याला ते महाग वाटतं कारण त्याचं प्रॉडक्शन महाग असतं. ते लावायला खर्च जास्त असतो. जर आपण दोघांचे बजेट इक्वल ठेवलं, तर प्रिंट मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण जास्त काळ जाहिरात करू शकतो. अनेक मल्टिनॅशनल कंपन्या प्रिंट मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आऊटडोअर मीडियाला महत्त्व देतात. दुसरा फायदा कसा, तर तुम्ही जर साक्षर असाल तर तुम्ही वर्तमानपत्र, मॅग्झिन, लिफलेट वाचता येते; पण जिथे साक्षरता नाही तिथे वाचण्याची गरज नाही; कारण तुम्ही कानाने रेडिओ ऐकताय, समोर टीव्हीवर आलेलं प्रॉडक्ट बघत आहात, इतका मोठा फायदा या मिडीयाचा आहे. या व्यतिरिक्त एखादी गृहिणी स्वयंपाकघरात जर स्वयंपाक करत आहे, तर तिला मुद्दाम त्यासाठी वेळ काढून रेडिओ ऐकायची गरज भासत नाही. रेडियोवरच्या फोन इन प्रोग्रॅममध्ये बरेच लोक असे सांगतात की, माझा हा व्यवसाय, माझा तो व्यवसाय, आम्ही काम करता करता तुमची गाणी ऐकतो. असाच दुसरा भाग टीव्हीचापण आहे. तुम्हाला त्यासाठी खास करून जाहिराती बघाव्या लागत नाहीत. एखादा प्रोग्रॅम बघत असताना त्या जाहिराती तुम्हाला कळतात. तसेच त्यात उत्तम प्रकारची जिंगल असेल ती जर फेमस होत असेल, चाल दिली असेल, तर जाता जाता समोरचा माणूस गुणगुणतो; कारण ती डोक्यात बसलेली असते. लहान मुलांना आवडली तर ते दिवसभर गुणगुणतात. हे नकळतपणे होते. अशा पद्धतीचे अनेक फायदे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आहेत.

निवेदिका – म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करतो तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या प्रॉडक्टची किंवा सर्व्हिसची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. मग जेव्हा एखादी अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी मीडिया प्लान करते तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाला किती महत्त्व दिलं पाहिजे?

नंदनजी- तुमचं प्रॉडक्ट काय आहे, कुठला टार्गेट ऑडियन्सला ते पोहोचवायचं आहे. कुठल्या टार्गेटेड एरियामध्ये पोहोचवायचं आहे याच्याशी ते संबंधित आहे. प्रिंट मीडियामध्ये वर्तमानपत्राच्या जाहिरातीला त्याचं वेगळं स्थान आहेच आहे. मासिकातली जाहिरात मासिकातच द्यावी लागेल.
निवेदिका – म्हणजे प्रत्येक मीडियाचं आपापलं महत्त्व नक्कीच आहे.

नंदनजी – त्याचं उदाहरण म्हणजे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान गेली अनेक वर्षं आकाशवाणी माध्यमातून भारतामधल्या प्रत्येकाशी कानाकोपर्‍यातल्या व्यक्तीशी ते बोलतात. त्यांनी इतर कुठल्याही मीडियाचा वापर न करता फक्त रेडिओ हे माध्यम निवडलं याचं कारण काय? त्याच्यातून त्यांना प्रत्येक माणसापर्यंत त्यांचा आवाज पोहोचवून त्या माणसाला आपलं जवळचं कोणीतरी बोलतंय असा भास निर्माण होतो. याच्या व्यतिरिक्त त्यांना ज्या ज्या लोकांना ज्या ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या त्या पद्धतीने ते भाव व्यक्त करून ते बोलत आहेत. ते भाव प्रत्येकापर्यंत पोहोचत आहेत आणि त्याचा सगळ्यात जास्त प्रभाव हा प्रत्येक श्रोत्यावर होत असतो. प्रत्येक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीला तो ग्राहक त्याचा टार्गेट ऑडियन्स आणि त्याचा टार्गेट एरिआ आणि त्याचं प्रॉडक्ट हे बघून ताळमेळ घालत तो तो मीडिया निवडावा लागतो. त्याच्यामध्ये नि:संशय इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर आहेच आहे. 

निवेदिका – इलेक्ट्रॉनिक मीडियाला महत्त्व देणं ही काळाची गरज झाली आहे; कारण सतत नवनवीन मीडिया जाहिरातीचे, आपल्यासमोर येत आहेत; पण इलेक्ट्रॉनिक मीडियाचं महत्त्व यात कमी होणार नाही. जेवढा जास्त वापर आपण रेडिओ, टेलिव्हिजन यांचा करू. तेवढ्या जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत तुमचं प्रॉडक्ट पोहोचायला नक्कीच मदत होणार आहे. नंदनजी, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी गेली कित्येक वर्षं प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करते आहे. तुमच्याकडे यासंदर्भातले किस्से नक्कीच असतील तर आज तुम्ही कोणता किस्सा सांगाल?

नंदनजी- एका मोठ्या शहरामध्ये एक मोठं प्रथितयश असं वर्तमानपत्र होतं. त्याच्या संचालक, अधिकारी वर्गासोबत माझ्या मीटिंग्ज, बिझनेस डिल चालायचे, त्याचवेळी आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्यापण जाहिराती करायचो. तिथल्या व्यवस्थापकानी एक दिवशी माझ्याशी थोडीशी हुज्जत घालत, ‘तुम्ही नसतं इलेक्ट्रॉनिक विकू नका. आमचंपण मार्केट करा. आमचं वर्तमानपत्र एक नंबरला आहे. आम्हाला कधीच तोड नाही वगैरे असं भरपूर मार्केटिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आश्चर्य असं की, बरोबर सहा महिन्यांनी तीच मॅनेजमेंट माझ्याकडे आली आणि मला त्यांनी काय सांगावं? आमच्या वर्तमानपत्राची जाहिरात इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी करायची आहे. ही साधारणत: 95-96 ची गोष्ट आहे. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया तेवढा फेमस नव्हता; पण असे किस्से घडले आणि विशेष म्हणजे त्यांचे प्रत्येक जिल्ह्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे जिंगल्स केल्या आणि महत्त्वाचं म्हणजे त्या जिंगल्सना राज्यस्तराचा प्रथम पुरस्कार मिळाला. ते नावाजलं गेलं. त्यामुळे त्या वर्तमानपत्राला पुन्हा उभारी आली. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रिंट मीडियावर जो काही परिणाम झाला असं दृश्य आपल्यासमोर दिसतंय; पण जेव्हा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाची साथ घेऊन पुढे चालायला लागतो तेव्हा त्याचा नक्कीच चांगला फायदा त्यांना होतो.आता तर प्रत्येक वर्तमानपत्राचं वेगळं चॅनलपण सुरू झालंय. वर्तमानपत्र चॅनलसाठी आणि चॅनल वर्तमानपत्रासाठी चांगला सपोर्ट एकमेकांना करत आहेत.

निवेदिका – म्हणजे जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेली वेगवेगळी माध्यमं ही जेव्हा एकमेकांना साथ देऊन काम करतील तेव्हा त्याचा फायदा जाहिरातदारांना होणार आहे.धन्यवाद नंदनजी रेडियो या माध्यमाची अगदी सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना तुम्ही देत आहात. आणि श्रोतेहो आपण आणखी माहिती घेणार आहोत पण पुढच्या भागात तो पर्यंत नमस्कार. 

jahirat VIshwa

(क्रमशः)                                                                     

टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या  वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली