सर्वात वर

जाहिरात विश्व-एपिसोड १८

 इलेक्ट्रॉनिक मिडिया : रेडिओ

जाहिराती लेखाच्या सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग)

निवेदिका – जाहिरात करण्यासाठी रेडिओ या माध्यमाचं काय महत्त्व आहे?

नंदनजी- आपल्या सगळ्यानाच माहीत आहे मागच्या चार-पाच पिढ्यांपासून रेडिओ हे माध्यम घराघरात पोहोचलेलं आहे. खेड्यापाड्यात पोहोचलं आहे. प्रत्येकाला आपल्या मनामध्ये रेडिओविषयी एक आदर आहे, त्याच्याविषयी मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. याचं मूळ कारण रेडिओवरून दिली जाणारी माहिती ही आपल्या जीवनाशी निगडित आहे आणि त्याच माध्यमातून होणार्‍या जाहिराती यादेखील आपल्याला जवळच वाटतात.

निवेदिका – आणि म्हणूनच ते प्रॉडक्ट श्रोत्यांच्या अगदी जवळचं होतं;  कारण रोजच्या रोज जाहिराती आकाशवाणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असतात. मग जेव्हा जाहिरातीसाठी रेडिओ हे माध्यम निवडलं जातं तेव्हा त्यासाठी कोणकोणते प्रकार उपलब्ध आहेत?

नंदनजी- यामध्ये जिंगल बेस जाहिरात असते. जिंगल म्हणजे गाणं. व्यतिरिक्त साधारण नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये जाहिरात असते किंवा अ‍ॅक्टिंग बेस जाहिरात असते, संवादात्मक किंवा नाट्यमयरित्या होणारी जाहिरात असते. हा झाला जाहिरातीचा भाग; पण अनेक वेगळ्या प्रकारे आपण जाहिरात देऊ शकतो, ते म्हणजे रेडिओ प्रोग्रॅम्स. आजकाल रेडिओ प्रॉग्रॅम्सद्वारे आपल्या प्रॉडक्टची व्यवस्थितपणे माहिती देता येते. याव्यतिरिक्त आणखी काही प्रकार आहेत; ज्याच्या माध्यमातून आपण जाहिरात करू शकतो. एखादा चांगला, लोकांना आवडणारा कार्यक्रम असेल, मग तो चांगल्या गाण्यांचा असू शकतो, समाजोपयोगी माहिती देणारा असू शकतो, आरोग्याविषयी माहिती देणारा असेल, तर अशा प्रकारचे प्रोग्रॅम्स स्पॉनसर्स करून आपल्या जाहिरात त्या माध्यमातून करू शकतो. त्यातून रेडिओचे जे इन-हाऊस प्रोग्रॅम्स असतात, त्यांना जर स्पॉनसर्सशीप दिली, तर प्रोग्रॅमपण लोकांपर्यंत पोहोचतात. आपलीपण जाहिरात होते.

निवेदिका – नक्कीच. जेव्हा तो प्रोग्रॅम आकाशवाणीवरून प्रसारित केला जातो तेव्हा त्या प्रोग्रॅमबरोबर त्या प्रॉडक्टचं नावपण सहजपणे श्रोत्यांच्या ओठावर येतं; कारण त्या प्रोग्रॅमबरोबर प्रॉडक्टचीपण ती एक ओळख बनली असते. त्यामुळे  श्रोत्यांच्या मनात ते प्रॉडक्ट ठसलेलं असतं.नंदनजी- याचं एक उदाहरण देतो. गेली 18 वर्षं एक दुकानदार अतिशय पॉप्युलर असा कार्यक्रम करतोय. त्या कार्यक्रमाची स्पॉनसरशिप त्यांनी 18 वर्षं दिली. तो कार्यक्रम इतका प्रसिद्ध झाला की, त्या व्यावसायिकाने त्या कार्यक्रमाची स्पॉनसरशिप सोडल्यानंतरदेखील अनेक श्रोत्यांना तो कार्यक्रम इज इक्वल टू व्यावसायिक. इतकं ते समीकरण श्रोत्यांच्या मनात घर करून होतं.

निवेदिका – इतक्या मोठ्या काळासाठी स्पॉनसरशिप दिल्यामुळे असेल किंवा आकाशवाणी माध्यमाची किमया असेल. तो प्रोग्रॅम आणि तो स्पॉन्सरर या दोघाचंही नाव एकत्रितरित्या श्रोत्यांच्या मनावर ठसलं गेलं. नंदनजी, एखाद्या प्रॉडक्टसाठी ग्राहक वर्ग कोणता आहे किंवा अशा बर्‍याच गोष्टी आहेत की, ज्याच्यावर कोणतं माध्यम निवडावं हे अवलंबून असतं. मग कोणता टार्गेट ऑडिअन्स असताना रेडिओ हे माध्यम प्रभावी ठरेल असं तुम्हाला वाटतं?

नंदनजी- बेसिकली तुमचं प्रॉडक्ट कुठलं आहे, ते कोणत्या रिचला जाणार आहे, कुठलं टार्गेट ऑडिअन्सपर्यंत जाणार आहे हे बघून पूर्ण भारतामध्ये जाणारं एक चॅनल आहे, जे संपूर्ण भारतातल्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचतं; त्यानंतर फक्त एका मेगासिटीपर्यंत किंवा मेट्रोसिटीमध्ये जाणारं एक चॅनल आहे. लोकल रेडिओ स्टेशन आहेत, प्रायमरी चॅनल्स आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारची जी चॅनल्स आहेत त्या त्या चॅनलवरून त्या त्या प्रॉडक्टची त्या त्या टार्गेट ऑडिअन्ससाठी जर जाहिरात केली तर त्याचा नक्कीच फायदा ग्राहकाला होऊ शकतो; पण यासाठी त्यांचा अभ्यास कमी असल्याने तुम्ही एजन्सीला विचारून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही जाहिरात करावी असा माझा आग्रह असेल.

निवेदिका – बरोबर, या क्षेत्रात अ‍ॅटव्हर्टायझिंग एजन्सीचा अभ्यास असतो. ग्राहक वर्गाचा, प्रॉडक्टचा अभ्यास असतो. त्यामुळे माध्यम कोणतं निवडावं हे जर आपण अ‍ॅड एजन्सीच्या सल्ल्याने ठरवलं तर त्याचा नक्कीच जास्त फायदा होणार आहे.

नंदनजी- त्या त्या ग्राहकाच्या वेळेनुसार, आपला टार्गेट ऑडिअन्स कधी ती जाहिरात ऐकणार आहे, त्यानुसार आपण वेळही निवडली पाहिजे. समजा स्त्रियांशी निगडित जर एखादे प्रॉडक्ट असेल तर दुपारच्या वेळी, शेतीविषयी प्रॉडक्ट असेल तर त्याची ठराविक वेळ अशा वेगवेगळ्या वेळेला आणि वेगवेगळ्या चॅनलवर जाहिराती केल्या तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला मिळू शकतो.

निवेदिका – म्हणजे रेडिओ हे माध्यम जाहिरातीसाठी स्वीकारताना इतका बारकाईने विचार करावा लागतो. मार्केटमध्ये प्रॉडक्टपण विविध प्रकारचे उपलब्ध आहेत. मग कोणत्या प्रॉडक्टच्या जाहिराती करताना रेडिओ हे माध्यम परिणामकारक ठरू शकतं?

नंदनजी – तुमचं प्रॉडक्ट काय आहे, हे फार महत्त्वाचं आहे. जे प्रॉडक्ट आपल्याला दिसत नाही; पण आवाजाच्या माध्यमातून ज्याची जाहिरात आपण करू शकतो, ते प्रॉडक्ट जे दिसलं नाही तरी चालेल. उदा. काही सर्व्हिसेस, बर्‍याचदा अनेक सर्व्हिसेसचे रेडिओ प्रोग्रॅम्स किंवा त्यांच्या जाहिराती आपण आकाशवाणीवरून ऐकतोच ऐकतो. या व्यतिरिक्त जे जनरल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहे अशा प्रकारच्या सर्व प्रॉडक्टच्या जाहिराती आपण आकाशवाणीवरून करू शकतो.

निवेदिका – आज प्रत्येक जिल्ह्यात आकाशवाणीचं स्वतंत्र केंद्र सुरू झाली आहेत, तर याचा उपयोग एखाद्या जाहिरातदाराला कसा होऊ शकतो?नंदनजी – पूर्वीच्या काळी आकाशवाणीवरून जाहिरात द्यायची, तर सर्वसाधारण माणसाला शक्य होत नव्हतं; कारण त्यांचा एरिआ खूप मोठा होता. मोठ्या मोठ्या अंतरावर स्टेशन्स होती. त्यांचा रिच तेवढा होता म्हणून त्यांचे रेट पण महाग होते; मात्र आता आकाशवाणीने लोकल रेडिओ स्टेशन्स काढले आहेत. शिवाय अनेक प्रायव्हेट रेडियो स्टेशन्स देखील सुरु झाले आहेत, त्यामुळे लोकल माणसाला अतिशय स्वस्तात जाहिराती करता येऊ शकतात; शिवाय त्याला हवे त्या टार्गेट एरियापुरतं. म्हणजे समजा कुणाला फक्त जळगावमध्ये जाहिरात करायची आहे; पण ती नाशिकलापण ऐकू येते, तर त्याचा उपयोग नव्हता, त्याचे पैसे वाया जायचे; पण आता लोकल रेडिओ स्टेशनमुळे त्या त्या जिल्ह्यापुरते जाहिराती करणे आता शक्य झालंय.

निवेदिका – म्हणजे छोट्या व्यावसायिकांना किंवा लघु उद्योजकांना याचा जास्त फायदा झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. नंदनजी, आज कोणता किस्सा सांगणार आहात?

नंदनजी – एक मसाल्याचा उत्पादक होता. त्याच्यासाठी जिंगल करायच्या होत्या. चार वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या चार वेगवेगळ्या जिंगल करायच्या, असे ठरलं. प्रत्येक मसाल्याची जाहिरात वेगळी व्हायला हवी; पण त्यात युनिफॉरमिटीपण वाटली पाहिजे. चार वेगळ्या म्युझिक डायरेक्टरच्या चार फेमस ट्युन घेतल्या. त्या गाण्यांच्या मीटरवर चार गाणी लिहिली, हे तिथे इतकं चपखल बसलं. ओपनिंग-क्लोझिंग सेम असल्याने त्याची युनिफॉरमिटी जपली; त्यामुळे या उत्पादकाचं आहे हे कळलं. एक ओळख तयार झाली. या व्यतिरिक्त चार वेगळ्या जाहिराती आहेत, चार वेगळे मसाले आहेत हे भासवलं. आज या जाहिरातींना 20-22 वर्षं झाली असतील. अजूनही रेडिओला चालू आहेत.

निवेदिका – वा छान, अतिशय उपयुक्त माहिती आम्हाला मिळत आहे पण वेळेचं भान राखायला पाहिजे पुढच्या भागात आपण आणखी पुढची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार(क्रमशः)
लिंक –                                                           

टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता. या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या  वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

jahirat VIshwa

वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com