सर्वात वर

जाहिरात विश्व-एपिसोड १९

बातमीच्या वर

इलेक्ट्रॉनिक मिडिया ; रेडिओ जाहिराती

लेखा सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग)

निवेदिका –  नंदनजी रेडिओ हे माध्यम जाहिरातीसाठी निवडल्यावर कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत?

नंदनजी – सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रेडिओ व टेलिव्हिजन या दोन्ही माध्यमामध्ये अतिशय कमी वेळात आपल्या सगळ्या प्रॉडक्टची माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं कसब जाहिरात एजन्सीचं असतं. तुमचा फोननंबर, तुमचा पत्ता, प्रॉडक्ट डिटेल्स त्यात आले पाहिजे, हे कॉपीरायटरचं कसब असतं.

निवेदिका – म्हणजे ही वेळेची मर्यादा पाळूनसुद्धा कमीत कमी शब्दात प्रॉडक्टविषयी जास्त माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवली पाहिजे.नंदनजी – यासाठी 20-30 सेकंदाचा वेळ हातात असतो आणि बजेटप्रमाणे तो रेडिओला जाहिराती देत असतो. बर्‍याचदा ग्राहक सांगतो, आमचं हेही हवं, तेही हवं, असं करून चालणार नाही. एका प्रॉडक्टचं एकच वैशिष्ट्य स्पॉटमध्ये सांगितलं पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे ग्राहकाचा गोंधळ होत नाही आणि स्पॉटमध्ये जी काही गोष्ट सांगायची ती व्यवस्थितपणे कळते. याचप्रमाणे प्रत्येक जाहिरात करताना ती आकर्षकच व्हायला पाहिजे, याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे; कारण जेव्हा कार्यक्रमातील गाणी संपतात, स्पॉटची वेळ येते. त्या ब्रेकमध्ये आपल्या आजूबाजूला अनेक जाहिराती असतात, यात आपल्या जाहिरातीचं वेगळेपण हे ठसलं पाहिजे, लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे, याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. रेडिओ हे फक्त श्राव्य माध्यम आहे. त्यामुळे लक्ष वेधून घेण्यासाठी तुमचा स्पॉट, तुमची जाहिरात तेवढीच परिणामकारक झाली पाहिजे.

म्हणून हटके जाहिरात करणे हे एजन्सीचं काम असतं. हे प्रत्येक ग्राहकाच्या बाबतीत सांभाळावं लागतं. बरेचदा ग्राहकाचं बजेट कमी-जास्त होत असतं आणि मग आता एवढंच बजेट आहे, एवढीच जाहिरात करू, असं करून चालत नाही, आपण 2-3 स्पॉट लावू, तर असं नाही. रेडिओचं माध्यम, तुमचा ग्राहक, टार्गेट ऑडिअन्स, किती वेळा जाहिरात तिथे लावावी लागणार आहे. त्या पूर्ण तयारीनिशी तिकडे उतरावं लागणार आहे. आपण परीक्षेला जेव्हा पूर्ण तयारीने जातो तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण दिली तर पूर्ण मार्क्स मिळतात. एखाद दोन प्रश्न सोडवून पूर्ण मार्क्स मिळत नाही. जेव्हा थोडं बजेट टाकून ग्राहक उतरतो आणि जाहिराती करतो, तर ते बजेट वाया जातं. मला व्यावसायिकांना असं सांगायचंय, तुमच्याकडे जर थोडं बजेट असेल तर जाहिरात करू नका. पुढच्या बजेटचे पैसे साठवा आणि पूर्ण बजेट ठेवूनच जाहिरातीत उतरा.

निवेदिका – एका दिवसात जाहिरात किती वेळा ब्रॉडकास्ट झाली पाहिजे हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर चॅनल, वेळ कुठली निवडावी, हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं; तर त्याबद्दल काय सांगाल?

नंदनजी- आकाशवाणीसारखी जर माध्यमं घेतली, तिथे प्रोग्रॅमवाईज जाहिराती लागतात. प्रोग्रॅमनुसार श्रोते ऐकत असतात. तिथे जाहिराती करताना प्रोग्रॅमप्रमाणे जाहिरातींची फ्रिकव्हेन्सी ठेवावी लागते; पण जेव्हा प्रायव्हेट स्टेशन्स असतात त्यांना प्रोग्रॅम नसतो, तिथे दिवसभराच्या जाहिराती द्याव्या लागतात. त्यावेळी 20 वेळा तरी जाहिरात वाजली पाहिजे एका दिवसात. अशा पद्धतीने जाहिराती कराव्या लागतात. अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी काय करते, तर 30 सेकंद जाहिरात एजन्सीने बनवली असेल, त्यात आशय असेल, सगळ्या गोष्टी समाविष्ट केल्या असतील तर पुढे 20 चा एक कट असतो, 10 चा एक कट असतो. पहिल्यांदा श्रोत्यांना, ग्राहकाला समजेल इथपर्यंत म्हणजे साधारण 1-2 महिने 30 सेकंदाची जाहिरात पूर्ण वाजवावी लागते. एकदा त्यांना ती जाहिरात समजली; मग फक्त हॅमरिंगसाठी पुढे ती 20 सेकंदांची वाजवायची; त्यानंतर पुढचे महिने 10 सेकंदांची वाजवायची, अशा पद्धतीने जाहिरातींची फ्रिकव्हेन्सी  असावी.या सगळ्याचा बारकाईने विचार करण्यासाठी योग्य, अनुभवी अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीची मदत घेतली पाहिजे.
अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये सगळी त्या पद्धतीची लोकं काम करत असतात. त्या त्या पद्धतीचं त्यांचं शिक्षण झालेलं असतं. संपादक, म्युझिक देणारे सगळे असतात. या सगळ्याचा विचार करून, अनुभवी एजन्सीकडून हे सगळं गेलं तर त्याचा इम्पॅक्ट आणि रिटर्नस नक्कीच मिळतात.

निवेदिका – जाहिरात कुठल्या चॅनलला लावायची, कधी लावायची, किती वेळा लावायची आणि कोणत्या शब्दात ती मांडायची हा सगळा बारकाईने विचार अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी करत असते. म्हणून अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीची मदत घेणं हे फायद्याचं ठरत असतं. रेडिओ हे माध्यम निवडल्यानंतर अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी कोणकोणत्या गोष्टींचा विचार करते?

नंदनजी- सगळ्यात महत्त्वाचा ग्राहकाने दिलेला यूएसपी असतो. युनिक सेल्स पॉईंट यावरती कॉपीरायटरने व्यवस्थितपणे, कमी शब्दात, कमी सेकंदात जाहिरात करून जेवढं ग्राहकाचं बजेट वाचवता येत असेल तेवढं वाचवायचं. हे त्याचं पहिलं कर्तव्य; त्यानंतर अतिशय चपखल बसणारी कॉपी, त्या कॉपीला चांगल्या प्रकारची वाक्यरचना, त्यात कशा प्रकारे आकर्षक करता येईल, कुठल्या स्कीम्स असतील, त्या देता येतील, एखादी बेस लाईन, कॅच लाईन असेल, या सगळ्याचा विचार त्यात करायला हवा हे सगळं बोलणार्‍या अँकर किंवा व्हाईस ओव्हर आर्टिस्ट असेल, तो पुरुष की स्त्री पाहिजे याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे किंवा दोघांचे एकत्रिकरणही करू शकतो आणि त्याचा वेगळा परिणाम साधू शकतो.

या पद्धतीने चांगलं रेकॉर्डिंग चांगल्या सॉफ्टवेअरमध्ये झालं पाहिजे. स्टुडिओमध्ये जो माईक असतो त्यापासून विचारणा झाली पाहिजे. टेक्निकल क्वॉलिटीपण चांगली घेतली पाहिजे; कारण या गोष्टी ऑन-एअर होत असतात. त्या लहरी जेव्हा हवेतून जात असतात, त्या रेडिओने कॅच करून घेत असतात. त्यावेळी तुमची क्वॉलिटी अतिशय चांगली हवी असते. नेहमी आपण जेव्हा स्टुडिओमध्ये ऐकतो; त्यानंतर 20% जनरेशन लॉस पकडून आपल्याला ऐकायला येतो. हा सगळा विचार अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी आणि टेक्निकल टीमने केलेला असतो. म्हणून अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी महत्त्वाची. तसंच चपखल बसणारं म्युझिक परिणाम देत असतं. काही स्किम्स, वेगळ्या पद्धतीची वाक्यरचना, तिथला साऊंड इफेक्ट टाकलेला पाहिजे. याला आम्ही ऑरनामेंटेशन म्हणतो. सगळ्या बाजूंनी त्याला सजवणं हे केलं पाहिजे.

या सगळ्यांमुळे जाहिरातीला उठाव येतो. बरेच कॉपीरायटर अलंकारिक भाषा वापरतात, अवघड भाषा वापरतात. याने त्याचा परिणाम साध्य होत नसतो. म्हणून भाषा सोपी पाहिजे; पण जाहिरात अलंकारिक हवी. परिणाम साध्य झाला पाहिजे. जेणेकरून ग्राहकाला रिटर्नस् मिळतील.जेव्हा एखादी जिंगल केली जाते तेव्हा त्याचंही संगीत तितकंच महत्त्वाचं असतं. ते प्रभावी आणि लक्षवेधी झालं पाहिजे.जिंगल करताना खूप काम करावं लागतं. पहिले गाणी लिहिली जातात. त्याचे शब्द सोपे हवेत. पटकन लक्षात राहातील असे, गुणगुणता येतील असे; मग पुढे म्युझिक डायरेक्टरचं काम असतं; सोपं आणि चांगलं म्युझिक दिलं गेलं पाहिजे. त्यात जे वाद्यं वापरली जातात ते पूरक हवेत, पोषक हवेत, की ते त्याला साज चढवतील अशा पद्धतीने जिंगल झाली पाहिजे.

निवेदिका – रेडिओ या माध्यमाचे फायदे काय काय आहेत?

नंदनजी- एका स्टेशनला आपण एक जाहिरात लावली तर शहरातल्या तसेच ग्रामीण भागातल्या लोकांना टार्गेट करू शकतो. एक जाहिरात सगळ्यांना एका वेळेला ऐकायला मिळू शकते.

निवेदिका – रेडिओ अगदी तळागाळात पोहोचणारं माध्यम असल्यामुळे याचा फायदा जाहिरातदाराला नक्कीच मिळतो.

नंदनजी- याहीपेक्षा महत्त्वाचं घरामध्ये जेव्हा ग्राहक जाहिरात ऐकत असतो तसेच तो ग्राहक हॉटेलमध्ये, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना, त्याच्या गाडीने बाहेरगावी जात असताना ऐकत असतो. त्याच्याकडे ही जाहिरात पोहोचून आपलं प्रॉडक्ट पोहोचतं. इतकी ताकद या रेडिओ माध्यमात आहे.

निवेदिका – 24 तास हे माध्यम आपल्याबरोबर असल्यामुळे तेवढ्या वेळा ती जाहिरात ग्राहकांपर्यंत पोहोचते आणि एक फायदा असा की काही तात्कालीक जाहिराती, नैमित्तिक जाहिराती असतात. यासुद्धा आपण पटकन त्या माध्यमावर देऊ शकतो. थोडक्या काळासाठीच्या जाहिराती म्हणून त्याचा वापर करताना आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. याचा अनुभव तुम्हाला सांगता येईल का?

नंदनजी- एक मोठा कार्यक्रम होता. मोठ्या गायिकेचा कार्यक्रम ओपन एअरला होता. संपूर्ण तिकिटं संपलेली. खूप गर्दी उसळत होती. संध्याकाळी सातचा कार्यक्रम होता; पण पाच वाजता इतका जोरदार पाऊस आला की काय करावं समजेना. लोकांचे लोंढे नाशिकमध्ये येत आहेत, त्या कार्यक्रमासाठी. तर काय करावं? हे लोंढे थांबले पाहिजेत. पाणी साचलेलं सगळं भिजलं होतं. मी ताबडतोब आकाशवाणीवर अनाऊन्समेंट करायला सांगितली की, जी लोकं इथे येत आहेत त्यांनी थांबावं आणि हाच कार्यक्रम त्याच तिकिटावर दोन दिवसांनी परत होईल. याचा खूप चांगला फायदा झाला.

निवेदिका – अशा प्रकारे काही नैमित्तिक जाहिराती किंवा महत्त्वाच्या सूचना ज्या नागरिकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, यासाठीपण हे माध्यम वापरू शकतो.

नंदनजी- हाच प्रकार जाहिरातींसाठीपण होऊ शकतो. प्रदर्शन, सेल याच्याही जाहिराती आपण रेडिओवर तेवढ्या काळापुरत्या देऊ शकतो. या व्यतिरिक्त फायदा, एखादा प्रोग्रॅम आपण केलाय, शेड्युल प्लॅन केलंय; पण हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाहीए; असं झालं तर आपण तो प्लॅन बदलू शकतो. तेवढी लवचिकता या माध्यमात आहे. आणखी एक म्हणजे एक जाहिरात आपण बनवली आहे. त्यात काही चेंजेस करायचे आहेत, तर तसे चेंजेस करूनही आपण जाहिराती पुन्हा वाजवू शकतो आणि तेवढा ग्राहकाचा खर्च वाचू शकतो.

निवेदिका – अनेकदा असं होतं की, एखादा ग्राहक 2-3 अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीला एकाचवेळी भेट देत असतो आणि साहजिकच त्या सगळ्या अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीच्या कोटेशनमध्ये बरीच तफावत असते. मग जी अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी स्वस्तामध्ये काम करून देते तिच्याकडे तो ग्राहक वळतो. मग एकूण या प्रकाराबद्दल तुम्ही काय म्हणाल?

नंदनजी- माझं असं आवाहन आहे की, पैशांपेक्षा एजन्सीचं काम बघा. ज्या एजन्सीचं काम तुम्हाला आवडतंय, ज्या एजन्सीने चांगल्या प्रकारे काम केलं आहे, ज्यांच्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटला प्रशिक्षित अशी काम करणारी माणसं आहेत, अशा एजन्सीकडे तुम्ही दाखल व्हा. ते तुमच्या बजेटमध्ये काम करून देतात. एखादी एजन्सी कमी बजेटमध्ये काम का करते? निश्चितच त्यांचा अनुभव कमी असतो. एखादी एजन्सी पैसे जास्त का मागते? त्यांचा अनुभव जास्त असतो. त्यांचा टेक्निकलचं बजेट जास्त असतं. त्यांचा स्टुडिओ डेव्हलप असतो. इक्विपमेंट चांगल्या क्वॉलिटीची असतात, सॉफ्टवेअर महागडी असतात; त्यामुळे बजेट वाढतं. म्हणून ते महाग नसतं. चांगल्या क्वॉलिटीचं असतं; शिवाय रास्त असतं. बजेटमध्ये देणारे असतात. दुसर्‍या एजन्सीने कमी पैसे लावले म्हणून ते महाग वाटत असतं; म्हणून तुम्ही पहिले अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीला निवडा. तुमचं बजेट सांगा, ते चांगल्या बजेटमध्ये काम करून देऊ शकतात. कमी बजेटमध्ये काम केल्याने कामं स्वस्तात होतात; पण त्याचा पूर्ण परिणाम साध्य होतोय का, आपल्याला पाहिजे तो रिझर्ल्ट मिळतोय का? या गोष्टींचाही विचार व्हायला पाहिजे. नाही तर आहे ते बजेटही वाया जातं. परत पुढचं बजेट येईपर्यंत आपल्याला थांबावं लागतं. आपली जाहिरात करता येत नाही.

निवेदिका – म्हणजे ग्राहकाने अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीने कोटेशन किती दिलंय याचा विचार न करता कोटेशन इतकं का आहे, त्यामागे कोणकोणत्या गोष्टी आहेत, या पैलूंचा विचार करून त्या एजन्सीला काम दिलं पाहिजे. नंदनजी असं म्हणतात, रेडिओ या माध्यमासाठी जाहिरात करणं आव्हानात्मक असतं म्हणून अनेक निर्मात्यांना हे क्षेत्र खास करून आवडतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल?

नंदनजी- हे क्षेत्र जरी आव्हानात्मक असलं, तरी आवडीचं आहे. प्रत्येक वेगवेगळ्या ग्राहकाचा अभ्यास करायला मिळतो. त्याच्या प्रॉडक्टचा अभ्यास करायला मिळतो, स्वत:ला संयम, आवड पाहिजे, तर त्यात तुम्ही क्रिएटिव्ह काम करू शकता. अनेक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी चांगल्या प्रकारे क्रिएटिव्ह कामं करतात. हे क्रिएटिव्ह आणि आवडीने काम करायला खूप मोठा वाव या क्षेत्रात आहे. प्रॉडक्ट पाहून त्या प्रॉडक्टची जाहिरात करताना ती कुठल्या स्टाईलने हवी, कॉमेडी की गंभीर पाहिजे याचा विचार आपल्याला करता येतो, त्यात देणारे आवाज कसे हवेत? हळूवार पाहिजेत. एखादा मोर्चा असेल, तर त्यातला आवाज कसा पाहिजे? एखादे नाजूक प्रॉडक्ट असेल, तर त्यांनी जाहिरात हळूवारपणे करायला पाहिजे. अलंकाराची जाहिरात कशा पद्धतीने मांडली पाहिजे, अशा पद्धतीने हसून, ओरडून, नाट्यमय प्रकारातून जाहिरात, या वेगवेगळ्या प्रकारचा अवलंब त्या त्या प्रॉडक्टनुसार, गरजेनुसार झाला पाहिजे.

निवेदिका – हे फक्त श्राव्य माध्यम असल्याने प्रेझेंटेशन तितकचं महत्त्वाचं आहे.

नंदनजी- पुरुष-स्त्री व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट कसे, कोणते घ्यायचे, त्याचं म्युझिक कसं द्यायचं, त्या पद्धतीने जाहिरात मांडणं, त्याचा परिणाम साधून आपल्या ग्राहकाला त्याचा परिणाम कसा साध्य होईल याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे.

निवेदिका – त्याच्या सेलला त्याचा किती फायदा होईल, हा सगळा विचार अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी करत असते.

नंदनजी- आणि हेच आव्हानात्मक आहे.

निवेदिका – प्रत्येक निर्मात्याप्रमाणे तुम्हालाही हे क्षेत्र आव्हानात्मक वाटतं, याबद्दलचा एखादा किस्सा…

नंदनजी- एका ग्राहकाचं खूप फेमस शोरूम होतं. त्याला खूप रिस्पॉन्स मिळायला लागला म्हणून त्याने वाढवायचं ठरवलं. मोठी जागा घेतली. पत्ता बदलला आणि पत्ता बदलल्याची जाहिरात करायची होती. ते करताना चार-पाच बायका भिशी खेळत आहेत किंवा पत्ते खेळत आहेत, तर ते करताना एक बाई चिटिंग करते, दुसरा पत्ता टाकते आणि दुसरी बाई म्हणते, ‘पत्ता बदलला हिने’ हे धरून निवेदकाने म्हटलं, हो बाईसाहेब पत्ता बदललाय. अशा पद्धतीने वेगळ्या, हटक्या जाहिराती केल्या आणि त्याला खूप रिस्पॉन्स मिळाला.

निवेदिका – म्हणजे ही शाब्दिक कोटी करणं जमलं पाहिजे. त्यातून श्रोत्याचं लक्ष नक्कीच वेधून घेतलं पाहिजे.

नंदनजी- त्या ग्राहकाला खूप जणांनी सांगितलं, तुमची जाहिरात अतिशय सुंदर, त्यामुळे आमच्या लक्षात राहील की पत्ता बदललाय.

निवेदिका – खूपच उत्तम माहिती आम्हाला मिळाली, विशेष म्हणजे रेडिओ माध्यमाविषयी खूप विस्ताराने माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद! पुढचा विषय – रेडियो जाहीरात प्रसिद्धी 

(क्रमशः)                                                       

jahirat VIshwa

टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या  वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली