सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड ३२

टेलिव्हिजन प्रॉडक्शन डिपार्टमेंट – भाग ३

Advertising World

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग),  निवेदिका – किशोरी कुलकर्णी

निवेदिका – कन्सेप्ट डिझायनिंग, कथा डेव्हलपमेंट यापुढचं पाऊल असतं प्रॉडक्शन. नंदनजी, टेलिव्हिजन माध्यमासाठी जाहिरात करताना प्रॉडक्शनची प्रोसेस कशी असते?

नंदनजी – बेसिक प्रॉडक्शनच्या आधी जे आपण काम करतो त्याला प्री-प्रॉडक्शन म्हणतात. मग शूटिंग आणि त्याच्यानंतरच्या प्रक्रियेला पोस्ट-प्रॉडक्शन म्हणतात. या संपूर्ण प्रक्रियेला प्रॉडक्शन किंवा व्हिडिओ प्रॉडक्शन म्हणतात.

निवेदिका – मग या सगळ्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ?

नंदनजी – प्री-प्रॉडक्शनमध्ये ग्राहकाबरोबर मिटिंग, चर्चा, थोडक्यात, यूएसपी काढणे, वन लाईन लिहिणे, कथा लिहिणे, स्टोरी बोर्ड करणे, लोकेशन शोधणे, संगीत दिग्दर्शक शोधणं, कलाकार शोधणं या सगळ्या प्रक्रिया असतात. हे सगळं झाल्यावर जो शूटिंगचा दिवस उजाडतो ते प्रॉडक्शन यात सगळं बरोबर काम होतं. ते झाल्यावर पुढचा टप्पा तो एडिटिंग, म्युझिक, डबिंग, संपूर्ण संगणक ग्राफिक्स करून ते लावायचा असतो. याला पोस्ट प्रॉडक्शन म्हणतात.

निवेदिका – म्हणजे ग्राहकाची मिटिंग ते टेलिकास्ट या सगळ्या प्रक्रियेला प्रॉडक्शन म्हणू शकतो. इतक्या मोठ्या प्रक्रियेमध्ये किती व्यक्ती काम करत असतात?

नंदनजी – प्रॉडक्शनचा आवाका किती मोठा आहे, कुठे शूटिंग करायचं ? बजेट काय ? या सगळ्या गोष्टींवर लोकं किती आहेत, कलाकार किती आहेत, हे ठरतं. त्या प्रॉडक्शनच्या मिटिंगपासून एक महत्त्वाचा माणूस असतो, तो म्हणजे प्रॉडक्शन मॅनेजर. पहिल्या मिटिंगपासून शेवटच्या पेमेंटपर्यंत त्याचा सहभाग असतो. प्रत्येक प्रोसेस त्याला माहितीच पाहिजे, कारण तोच सगळ्याचे निर्णय घेत असतो. पण अर्थात तो कामकरी माशी असतो, तो कुणाला तरी उत्तरे देणारा असतो. निर्मात्याला, दिग्दर्शकाला. या सगळ्यातला जो दुवा असतो तो प्रॉडक्शन मॅनेजर. त्याच्या अधिकारात अनेक गोष्टी असतात. तो अनेक मिटिंग लावतो, गोष्टी अ‍ॅरेंज करतो. त्याला सगळ्याचे सोर्स माहिती असतात. ऐनवेळी आलेली अडचण सोडवणारा एकमेव माणूस म्हणजे प्रॉडक्शन मॅनेजर.

निवेदिका – म्हणजे एकूण प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठं योगदान प्रॉडक्शन मॅनेजरचं असतं. कुठल्याही माध्यमाची कुठलीही जाहिरात (Advertising World) करताना योग्य व अनुभवी जाहिरात एजन्सी निवडणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं कोणत्याही प्रॉडक्शनसाठी मॅनेजर निवडणं आहे; तर याबद्दलचं थोडं सविस्तर सांगाल का?

नंदनजी- नक्कीच. पहिल्या मिटिंगपासून प्रॉडक्शन मॅनेजर कोणकोणत्या गोष्टी बघतो, तर जागा ठरवणे, कलाकार तसेच शूटिंगच्या इतर लोकांच्या येण्या-जाण्याच्या, स्टुडिओच्या, कुठल्या कुठल्यावेळी कोण कोण येणारे, त्याच्याबरोबरीने तारखांच्या जुळवणे, हॉटेल बुकिंग, फूड सप्लायर कोण आहे, साहित्य कोणते आणायचे, कुठून आणायचे, लोकांच्या तारखा ठरवणे, एखाद्याला कुठली अडचण आली, तो येऊ नाही शकला, तर तिथे काय लावता येईल, या सगळ्याचा निर्णय, अ‍ॅक्शन हा घेत असतो. कुणाचं किती काम झालंय ते बघून त्याच्याप्रमाणे त्याचे वाऊचर बनवून त्याच्या पेमेंटपर्यंतचं काम प्रॉडक्शन मॅनेजरचं असतं.

कुणाच्या तारखा क्लॅश होत असतील, तर तिथली सारवासारव हा करत असतो. प्रॉडक्शन करताना प्रचंड मोठा खर्च असतो. 15-20 ते 100 लोकांचा त्यात समावेश असतो. या सगळ्याचा खर्च आवाक्यात आणण्याचं काम जो करतो तो प्रॉडक्शन मॅनेजर. शूटिंग संपल्यानंतर त्याचे पोस्ट प्रॉडक्शन करणं, त्याचं एडिटिंग करणं, स्टुडिओ बुक करणं, डबिंग करणं, संगणक ग्राफिक्सवाला कोण असेल, त्याच्याकडून काय करून घ्यायचंय? संगीत कोण देणार आहे, त्याचा पाठपुरावा घेणं, बेसिक क्रिएटिव्ह काम करणारा दिग्दर्शक असतो, त्याची टीम असते ,पण त्याचं जे तांत्रिक काम करायचंय ते हा प्रॉडक्शन मॅनेजर करत असतो. या सगळ्या गोष्टींचं बुकिंग करणे, त्याप्रमाणे त्यांचे कलाकार, दिग्दर्शक, त्या त्या डिपार्टमेंटशी फोन करून ती कामं करून संपूर्ण प्रॉडक्शन, कुठल्याही अडचणीशिवाय पूर्ण करणारा जो असतो तो म्हणजे प्रॉडक्शन मॅनेजर.

निवेदिका – इतक्या जबाबदार्‍या या एकट्याच माणसाला पार पाडाव्या लागतात म्हणून तो अष्टावधानी असणं फार गरजेचं असतं.

नंदनजी- पण हा एकटा नसतो. प्रॉडक्शन मोठं असेल तर त्यालाही असिस्टंट असतात. मग ते वेगवेगळे विभाग सांभाळतात. हेअर ड्रेसेस, कपडेवाला, सप्लायर, वेगवेगळ्या जागेचा सप्लायर, हे सगळं बघणारा त्या त्या विभागाचा त्याचा असिस्टंट असतो, ते ही कामं बघतात. छोटं असेल तर एक-दोन जण बघतात. अगदी छोटं असेल तर एकटाच सांभाळून घेतो. अशा पद्धतीने या प्रॉडक्शन मॅनेजरचं काम होतं.

निवेदिका – म्हणजे 20-30 सेकंदांची जाहिरात आपण टीव्हीवर बघत असतो; पण त्याच्यामागे किती मेहनत असते आणि किती व्यक्ती यासाठी दिवसरात्र काम करत असतात! नंदनजी गेली अनेक वर्षं तुम्ही काम करताय आणि प्रॉडक्शनचे अनेक किस्से तुमच्याकडे असतील, तर एखादा किस्सा सांगाल?

नंदनजी- खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनासाठी सहकार खात्यासाठी आम्ही काही फिल्मस् करत होतो. नाशिकजवळच्या एका खेडेगावात 25 कलाकार घेऊन 3 ते 4 दिवसांचं शूटिंग होतं. पुण्याहून लाईट आले होते. पहिल्या दिवशी 3-4 तासांचं शूटिंग झालं. लंच ब्रेक झाला आणि त्यानंतर जेव्हा आम्ही शूटिंगला लाईट चालू केले तेव्हा त्या लाईटमधल्या ट्यूब उडाल्या. साधारण 3-4 तास गेले. त्यानंतर पुन्हा त्याने ट्यूब आणून लावल्या. पुन्हा त्या उडाल्या. त्या इलेक्ट्रिशियनकडच्या ट्यूब संपल्या. मग त्याने सांगितले, तुमचा जनरेटर खराब आहे.

दुसरा जनरेटर आणला. तो दिवस संपला. दुसर्‍या दिवशी दुसरा जनरेटर आला. पुन्हा नाशिकमधून ट्यूब आणल्या. साधारण 25-30 कि.मी. दूर आम्ही नाशिकपासून शूट करत होता. परत तसंच झालं. तिसरा दिवस उजाडला तरी एका मिनिटाचंही शूट होऊ शकलं नाही. तीन दिवस 25 कलाकार पुण्या-मुंबईहून आलेले, काही नाशिकचे. हे सगळे नुसते बसून होते, गप्पा-टप्पा चालू होत्या. टाईमपास चालू होता. मी टेंशनमध्ये होतो. 25 कलाकार, 15 जणांचा तांत्रिक लोकांचा या सगळ्यांचा जेवणाचा, राहाण्याचा, खाण्याचा खर्च तीन दिवस बेअर करत होतो. शेवटी पुण्याला ज्यांच्याकडून लाईट आणले त्यांचा वरिष्ठ माणूस आला आणि त्याने पाहिलं. अतिशय छोटी समस्या होती. त्या लाईटचा बॉक्स असतो.

जिथे कनेक्शन लावतात. लाईट मॅनने तीन दिवस लाईटचे कनेक्शन उलटेसुलटे केले होते; पण तो लाईटवाला खूप चांगला होता. त्याने पूर्ण खर्च बेअर केला. म्हणाला, माझी चूक आहे. यापुढे मी असे करणार नाही. त्याला विचारलं, झालं काय? तो म्हणाला, माझ्याकडचा उपस्थित जो इलेक्ट्रिशियन होता त्याच्याऐवजी मी त्याचा असिस्टंट पाठवला. इथे माझी चूक झाली.

निवेदिका – म्हणजे अगदी लहानसहान गोष्टींकडे प्रॉडक्शनच्यावेळी लक्ष दिलं पाहिजे आणि तिथे काम करणारा प्रत्येक माणूस अनुभवी किंवा जाणकार असला पाहिजे.

नंदनजी- अजून एक असं झालं की, बर्‍याच जणांच्या इतरत्र तारखा होत्या. त्या त्यांना पुढे ढकलाव्या लागल्या. गडबड होत असते. म्हणजे त्यांच्यामधल्या तांत्रिक माणसाने अगदी बारकाईने काम करायला हवं. असा हा अनुभव.

निवेदिका – या अनुभवाच्या जोरावर तुमचे पुढचे शेड्युल्स नक्कीच चांगले पार पाडले असतील.

नंदनजी – नक्कीच

निवेदिका – एकंदरीत मागच्या ३ भागांमधून आपण टेलिव्हिजन प्रॉडक्शन डिपार्टमेंटसंबंधी खूपच चांगली माहिती जाणून घेतली , नंदनजी तुमचे मनापासून आभार…धन्यवाद

पुढचा विषय – टेलिव्हिजन कॅमेरा वर्क (क्रमशः) Advertising World

टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता. जाहिरात विश्व (Advertising World) या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

jahirat VIshwa

वाचकांसाठी संपर्क –  नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com