सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड २६

Advertising Worldटेलिव्हिजन जाहिराती

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग),  निवेदिका – किशोरी कुलकर्णी

निवेदिका – जगाच्या एका कोपर्‍यातली बातमी क्षणार्धात दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत पोहोचवणारं आणि त्याचबरोबर आपलं मनोरंजनही करणारं माध्यम म्हणजेच टेलिव्हिजन. नंदनजी, एखादी जाहिरात करताना कन्स्पेक्ट डेव्हलप करावी लागते, तर एकूण ही प्रोसेस कशी असते ?

नंदनजी –  एखादं प्रॉडक्ट जेव्हा आपण मार्केटमध्ये टाकत असतो ते प्रॉडक्ट लोकांच्या नजरेत यावं, लोकांनी ते घ्यावं आणि त्यासाठी जी जाहिरात करायची आहे, ही जाहिरात कशा पद्धतीने झाली पाहिजे, त्याचं सादरीकरण कसं असलं पाहिजे, त्यात वापरणारं मॉडेल कसं असलं पाहिजे, ते पुरुष असावं की स्त्री असावं की एखादा वेगळा प्राणी असावा किंवा काही नसावं, त्यात शब्द असावे की नुसतं म्युझिक असावं की नुसती अ‍ॅक्टिंग असावी. या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रॉडक्शन तयार करण्यासाठीचं जे माध्यम आहे त्याला आपण कन्स्पेक्ट म्हणूया.

निवेदिका – मग ही कन्स्पेक्ट डेव्हलप करतानाच सगळी टिम मिळून याचा विचार करते का ?

नंदनजी- नक्कीच; पण बेसिक त्याचा सुकाणू एकाकडेच असतो. त्याला आपण आर्ट डायरेक्टर किंवा डायरेक्टर म्हणूया किंवा कन्स्पेक्ट डेव्हलपर वेगळा असेल, कोणी प्रॉडक्शनवाला असेल, कॅमेरामन असेल, स्क्रिप्ट रायटर असेल, ग्राहकाचा एखादा माणूस असेल आणि मेन डायरेक्टर हे सगळे मिळून बसून त्या प्रॉडक्टवर चर्चा करून ते कशा पद्धतीने न्यायचं आहे याचा विचारविनिमय होतो आणि मग ती कन्स्पेक्ट डेव्हलप होते.

निवेदिका – आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, टेलिव्हिजन हे सादरीकरणाचं माध्यम आहे. त्यामुळे आपलं प्रॉडक्ट हे उत्तम प्रकारे कसं प्रेझेंट केलं जाईल यासाठी त्या प्रोसेसमध्ये असणार्‍या प्रत्येकाचाच विचार इथे घेतला जातो. म्हणजे अगदी स्क्रिप्ट रायटरपासून ते अगदी म्युझिक डायरेक्टरपर्यंत आणि त्या प्रत्येकाचंच मत इथे नक्कीच महत्त्वाचं ठरतं.

नंदनजी – म्हणजे कन्स्पेक्ट डेव्हलप करतानाच काय काय केलं पाहिजे, त्यांचं प्रॉडक्ट काय आहे, त्यानंतर कुणासाठी बनवलंय, ते विकत घेणारा टार्गेट ऑडियन्स कोण आहे याचादेखील विचार केला जातो. स्त्रियांसाठी बनवलंय की पुरुषांसाठी, की दोघांसाठी आहे, लहान मुलांसाठी आहे याचाही विचार करायला हवा. यावरून आपल्याला कन्स्पेक्ट चांगली डेव्हलप करता येते. मग कन्स्पेक्ट डेव्हलप करताना आणखी काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत, की कुठल्या चॅनलसाठी ही जाहिरात लावायची आहे, कुठल्या प्रदेशात लावायची आहे, कुठल्या राज्यात लावायची आहे, त्याची भाषा काय आहे या सगळ्याचा विचार ही कन्स्पेक्ट डेव्हलप करताना केला पाहिजे, असं मला वाटतं.

निवेदिका – आणि भारत हा विविधतेने नटलेला देश आहे; त्यामुळे इथे अनेक चालीरिती आहेत, संस्कृती आहेत; त्यामुळे तुम्ही म्हणत आहात तसं प्रत्येक प्रदेशाच्या वेगवेगळ्या चालीरिती, संस्कृती, त्यांचं राहणीमान, भाषा या सगळ्याचा विचारसुद्धा अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीला (Advertising World) करावा लागतो.

नंदनजी – भारतामध्येच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या जाहिराती (Advertising World) करायला फार छान वाव आहे. परदेशात जर जाहिराती बनवायच्या असतील तर इतकं व्हेरिएशन नाही मिळणार. एखादं मणिपुरी नृत्यातून किंवा त्या संस्कृतीतलं प्रॉडक्ट दाखवायचं असेल, तर ते दाखवता येतं, महाराष्ट्रातलं वेगळं प्रॉडक्ट दाखवता येतं, असा खूप वाव आहे कन्स्पेक्ट डेव्हलप करण्यासाठी.

निवेदिका – म्हणजे या क्षेत्रात काम करतानासुद्धा एक वेगळी मजा येत असते.

नंदनजी – बर्‍याच अंशी काय असतं एखाद्या ठराविक प्रॉडक्टसाठी एखादी ठराविक पध्दत झाली, आणि त्याची कंटिन्युटी राहिली तर त्या पध्दतीवरूनदेखील ते प्रॉडक्ट लोकांच्या जास्त लक्षात राहायला मदत होते.

निवेदिका- याचंच उदाहरण द्यायचं झालं तर नुकतीच आता टीव्हीवर जाहिरात येते आहे मोबाईल नेटवर्कची. ज्यामध्ये एक मॉडेल आहे आणि तिला बघता क्षणी आपल्याला कळतं ही कोणत्या नेटवर्कची जाहिरात आहे.

नंदनजी – बरोबर. आता हे करताना त्यांनी काय केलं आहे की मॉडेलवर जास्त फोकस ठेवला आहे. त्या मॉडेलची केशरचना ठराविक बनविली आहे. तिचा पेहराव, बोलण्याची पद्धत हा सगळा बाज त्यांनी सलग ठेवला आहे. फक्त त्याच्या कन्स्पेक्ट ज्या आहेत या वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या आहेत; परंतु ती जाहिरात कधी कधी इतकी व्यवस्थित होते की, कधी कधी अशा प्रकारच्या मॉडेलच्या केसाचीपण पद्धत येते आणि लोकं त्या पद्धतीची कॉपी करतात. हा एक छुपा विचार असतो की, ते जर कॉपी झालं तर आपोआप त्याची जाहिरात कुठे ना कुठे न बोलता होत असते.

निवेदिका – आणि त्या प्रॉडक्टचा कायमस्वरूपी ठसा त्या ग्राहकांच्या मनावर उमटलेला असतो. नंदनजी, सर्वसाधारणपणे असा एक समज आहे की, टेलिव्हिजनसाठी जाहिरात करायची असते किंवा एखादी व्हिडिओ जाहिरात करायची असते तेव्हा त्याची प्रॉडक्शन किंमत ही खूप जास्त असते, तर मग कन्स्पेक्ट डेव्हलप करतानाच बजेटचा विचार होतो का ?

नंदनजी – नक्कीच. बजेट काय आहे याप्रमाणे जर कन्स्पेक्ट डेव्हलप केली तर जाहिरात जास्त चांगल्या प्रकारे आपण दाखवू शकतो किंवा त्यांचं प्रॉडक्शन चांगल्या प्रकारे बनवू शकतो.

निवेदिका- म्हणजे जाहिरात एजन्सीने कन्स्पेक्ट डेव्हलप करताना आधी बजेट काय आहे याचा विचार ग्राहकाशी केला पाहिजे.

नंदनजी – केलाच पाहिजे. बहुतांशी एखादी छान कन्स्पेक्ट असते, ती ग्राहक मंजूर करतात; पण जेव्हा प्रॉडक्शनच्या माणसाने त्याचं बजेट काढलं त्यावेळी ते नाही म्हणतात. मग पुन्हा त्यावर काम करत बसावं लागतं. आधीच बजेटचा विचार केला तर ग्राहकाच्या पद्धतीने ती जाहिरात मांडता येते.

निवेदिका – मग अशावेळी कोणत्या चॅनेलवर जाहिरात द्यायची आहे हासुद्धा मुद्दा बजेटसाठी महत्त्वाचा ठरतो का ?

नंदनजी – हो. अगदी महत्त्वाचा आहे. एखाद्या इंग्रजी चॅनलवर जाहिराती द्यायच्या असतील, तर ते प्रॉडक्ट तसं असलं पाहिजे किंवा हे भारतात द्यायचं असेल तर ते प्रॉडक्ट तसं असेल तर ते देण्यात पॉईंट असतो. अगदी लोकल लेव्हला आपण रिजनल चॅनलला देतो, तर त्या ग्राहकाच्या मागणीनुसार आपण या सगळ्या गोष्टी ठरवत असतो आणि हे करत असताना एजन्सीनेसुद्धा ग्राहकाला एज्युकेट केलं पाहिजे. खूप मोठं प्रॉडक्शन करण्यातही पॉईंट नसतो. जेव्हा ते प्रॉडक्ट मोठं आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे खेळा; पण जर त्याचं प्रॉडक्ट छोटं असेल, तर तुम्ही त्याला सगळ्याची माहिती दिली पाहिजे. ती त्याला लावता आली पाहिजे. टेलिकास्ट करता आली पाहिजे. जास्तीत जास्त वेळा कशी टेलिकास्ट करता येईल त्याकडेसुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे.

निवेदिका – नंदनजी आजचा विषय आहे कन्स्पेक्ट डेव्हलपिंग. याबद्दलचा किस्सा कोणता तुम्ही शेअर करणार आहात.

नंदनजी – एक मिनिरल वॉटरची जाहिरात बनवायची असते. त्यांच्या प्रॉडक्टचा सगळा अभ्यास केला जातो. त्यावरून असं समजतं की, इतर कंपन्यांपेक्षा यांची मशिनरी वेगळी आहे. त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्युअर मिनिरल वॉटर आहे. त्या पद्धतीने जाहिरात करा. मग अशा 

2-3 कन्स्पेक्ट समोर मांडल्या जातात. त्यातली एक कन्स्पेक्ट सगळ्यांना आवडते आणि डेव्हलप झाल्यानंतर परत सभासदांबरोबर मिटिंग झाली त्यावेळी डायरेक्टरने हात वर केले की, ही कल्पना मी करू शकत नाही. कल्पना करायला खरोखर अवघड होती. एखाद्या उजाड माळरानावर ट्रेकिंगला जाणारी मुलं असतात त्यातल्या एका मुलीच्या बाटलीमधलं पाणी संपतं. रखरखीत उन्हाळा, गवत वाळलेलं, यातून कळतं की, मुलं तहानलेली आहेत. काय करायचं ? तिचा एक मित्र असतो. त्याला काळजी वाटते की पाणी नाहीये. काय होणार? आणि वर ढग जमा होतात. वीज कडाडते आणि त्या ढगातून मिनिरल वॉटरची बाटली येते. ती यांच्या हातात येते आणि मग तो तिला देतो आणि ती ते पाणी पित असताना मागचे सगळे डोंगर हिरवेगार होतात. म्हणजे पाऊस पडायला लागतो आणि म्हणून मागचे डोंगर, गवत हिरवेगार होतं. त्यातून हे समजतं की, हे किती चांगल्या प्रकारचं प्रॉडक्ट आहे. शुद्ध आहे आणि तुम्ही कसे रिफ्रेश होता.

या जाहिरातीत एकही डायलॉग नव्हता. एकही वाक्य नव्हतं. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्या जाहिरातीला मिळालेलं संगीत आणि मागचा हिरवा निसर्ग त्याचा एक वेगळा परिणाम दर्शकांवर झाला. दोन भागांमध्ये याचं शूटिंग करायचं ठरलं. सारखाच पोषाख. सगळं सारखंच. एक मे महिन्यात रखरखीत उन्हाळ्यात शूटिंग केले. ते झाल्यानंतर तिथे मार्किंग करण्यात आलं आणि त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जेव्हा पाऊस पडला, हिरवळ आली. त्याच मार्किंगवरती तेच पुन्हा सगळं करण्यात आलं. अशा प्रकारचं सादरीकरण या जाहिरातीतून करायचं होतं. त्याला ते कदाचित अवघड वाटलं असेल. मग ज्याने ती कल्पना सादर केली त्याने ती डायरेक्ट केली आणि ती यशस्वी झाली.

निवेदिका – नंदनजी, अतिशय सुंदर आणि वेगळा अनुभव तुम्ही शेअर केलात आणि तुमचा हा किस्सा वाचल्यानंतर ज्यांनी ही जाहिरात पाहिली असेल त्यांना नक्कीच आठवली असेल. धन्यवाद!          

पुढचा विषय – ऑडियो व्हिडियो स्क्रिप्ट रायटिंग                                                                                                                                                                                                                      

Advertising World – (क्रमश:)

jahirat VIshwa

टिप –(Advertising World) सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com