सर्वात वर

तांडव

एनसी देशपांडे

(Amazon Prime Video Original Series)

भारतातली लोकशाही हा संपूर्ण जगातील चर्चेचा विषय असल्याने या पार्श्वभूमीवर बॉलीवूडने अनेक चित्रपटांची निर्मिती करून तिकीटबारीवर भरपूर गल्ला जमवलाय. राजकारण हा विषय सिनेमावाल्यांचा हमखास यशाचा फंडा राहिलाय. त्यामुळे आजही या विषयावर चित्रपटांची निर्मिती होतच आस्ते. आता तर वेब-सिरीजचा जमाना असल्याने वेळेचं बंधनच नाही, मग कथानक अधिक विस्तृतपणे दाखवण्याची सुविधा झालीय. या आधी हॉटस्टारने मुंबईतील राजकारणावर आधारित ‘सिटी ऑफ क्राईम’ ही मराठी कलाकारांना घेऊन प्रदर्शित केलेली सिरीज खूप प्रसिद्ध झालीय. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकारणावर आधारित वेब-सिरीज प्रदर्शित होणे अपेक्षितच होते आणि तसे झालेही. अमॅझॉन प्राईम (Amazon Prime Video Original Series) व्हिडीओ ओरिजिनल सिरीजमध्ये नुकतीच प्रदर्शित झालेली ‘तांडव’ ही वेब-मालिका याच विषयावर बेतलीय. या सिरीजच्या निमित्ताने ‘नबाब ऑफ पतौडी पॅलेस’ बघायला मिळतो. पंतप्रधानांचं खाजगी निवास्थान दाखवण्यासाठी या पॅलेसचा वापर करण्यात आलाय. यातील महत्वाची पात्रं पंतप्रधान देवकीनंदन आणि त्यांचा कौटुंबिक आणि राजकीय वारसपुत्र समर प्रताप सिंग याच्या वावर या हवेलीत दाखवलाय. 

या सिरीजची निर्मिती अली अब्बास जफर यांनी केली असून दिग्दर्शनही त्यांनीच केलंय. या सिरीजच्या सेलेबीलिटी ध्यानात ठेऊन डिम्पल कपाडिया, सैफ अली खान, कुमुद मिश्रा, सुनील ग्रोवर, मोहम्मद झीशान अय्युब, दिनो मोरिया आणि संदीप मेहता या प्रसिद्ध चेहऱ्यांना यात संधी दिलीय. लहानमोठ्या भूमिकांमधून प्रसिद्धी पावलेले तिग्माशु धुलिया, संध्या मृदुल, कृतिका अवस्थी, गौहर खान आणि सना मोर हे कलाकारही या कथानकात महत्वाची भूमिका बजावतात.
‘तांडव’ या नावावरूनच या सिरीजच्या कथानकाची थोडीफार कल्पना येऊ शकते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या  भारताच्या राजधानीत म्हणजेच दिल्ली, शहरात घडते, जिथे तुम्हाला सत्ता आणि कुशलतेच्या बंद, अराजक दाराच्या आत नेऊन भारतीय राजकारणाच्या अंधकारमय खोल्यांचा उलगडा केला आहे.

‘तांडव’ (Amazon Prime) या मालिकेचे कथानक म्हणजे एक राजकीय मेलोड्रामा आहे. थोडं संथ गतीने सरकतं जाणाऱ्या या कथानकात उत्कंठा वाढण्याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे ‘तांडव’ या सिरीजच्या नावाचा विरोधाभास अनुभवायला मिळतो. आता काही तरी घडणार, तांडव सुरु होईल अशा प्रेक्षकांच्या अपेक्षा फोल ठरतात. नावाचा एका सिझनमध्ये हे कथानक संपणार नसल्याची ग्वाही शेवटच्या प्रसंगाने दिली जात असल्याने पुढचा सिझन येणार हे निश्चित. 

राजकीय पार्श्वभूमी असलेलं कथानक म्हटल्यावर वेळोवेळी, फसवाफसवी, दगाबाजी, कुरघोडी, राजकीय उलथापालथ असणारच आणि तसं दाखवलंही आहे. तरी परंतु सगळं सुरळीत, एका रांगेत घडत गेल्याने पुढील कथानकाची पूर्ण कल्पना प्रेक्षकांना येते. सध्याच्या वेब-सिरीजनी प्रेक्षकांना दिवसांगणिक प्रगल्भ केल्याने, त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आधी धक्का आणि नंतर त्याच्या मागची खेळी, तयारी आणि डावपेच अशी सवय प्रेक्षकांना झाल्याने एका रांगेत, त्यातही सरळसरळ आणि संथपणे पुढे सरकणारं या मालिकेचं कथानक उत्सुकता ताणू शकत नाही, म्हणजे मजा येत नाही. बॉलीवूडस्टार ‘सैफ अली खान’ हा एक प्रतिमा बाळगलेला अभिनेता असल्याने त्याच्या भुमिकेकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलेलं असतं. परंतु त्याच्या भूमिकेलाही सरळसोट मार्गाने पुढे नेल्याने तो ‘नायक की खलनायक’ याचा अंदाज बांधता बांधता मालिकेचा शेवट होतो. त्यामुळे हे पात्र अपेक्षित प्रभाव पाडू शकत नाही. त्यामुळे जर ‘नबाब ऑफ पतौडी पॅलेस’ मध्ये चित्रीकरण करायचं नसतं तर कदाचित ‘सैफ अली खान’ ची निवडही झाली नसती, असं उगीचंच वाटून जातं. याला कारण असं की प्रदीर्घ कालावधी अंतर या मालिकेच्या निमित्ताने कॅमेरासमोर उभी राहिलेली आणि कथानकाची फारशी मदतही न लाभलेली ‘डिंपल कपाडिया’ यातील ‘अनुराधा किशोर’, पंतप्रधान देवकीनंदनची रखेल, या भूमिकेत आपल्या सक्षम अभिनयाच्या जोरावर भाव खाऊन गेलीय. किंबहुना तीच या कथानकाची नायिका असल्यागत हे पात्र प्रभावी ठरलंय. आवाजांचे चढ-उतार, चेहऱ्यावरील हावभाव आणि प्रसंगी केवळ डोळ्यातील मिश्कील, छद्मी आणि विजयी भावांनी तिने प्रसंग जिवंत केलेत.  

राजकारणातील अपेक्षित दगाबाजी, डाव आणि हार-जीत याचं प्रामुख्याने दर्शन या मालीएत होतं. मग त्यामुळे वारंवार बदलत जाणारी समीकरणे याचा खुलासाही विस्तृतपणे दाखवलाय. राजकारण्यांचे ‘खुर्ची प्रेम’ आणि नंतर खुर्चीसाठीच्या खेळ्या, युक्त्या या मालिकेत चांगल्या दाखवल्या आहेत. परंतु ही वेब-सिरीज न वाटत एक अर्धवट चित्रपट वाटतो.


जनलोक दल’ या राजकीय पक्षाने दोन टर्म पूर्ण केल्या असून तिसऱ्या निवडणुकीतही तेच सरकार स्थापणार आणि ‘देवकी नंदन (तिग्मांशू धूलिया) हेच पंतप्रधान होतील हे निश्चित आहे. निवडणुकीच्या निकाल येण्यापूर्वीच ‘देवकी नंदन’ यांच्या मृत्यूची बातमी समोर येते. त्यांचा कौटुंबिक आणि राजकीय वारस समर प्रताप सिंग(सैफ अली खान) यानेच त्याचा खून केलाय, हे फक्त प्रेक्षकांनाच माहिती असतं. आता पंतप्रधानपदाचा दावेदार एकमेव समर प्रताप सिंह असतो. समरनेच पंतप्रधानांचा खुन केल्याचा एका अनोळखी व्यक्तीचा फोन तीस वर्षांपासून विशेष असणारी अनुराधा किशोर (डिंपल कपाडिया) हिला येतो आणि त्याचा सुयोग्य वापर करून ती पंतप्रधानाच्या खुर्चीत विराजमान होते. या पहिल्याच खेळीत ती यशस्वी होऊन समरच्या एकुणात प्लानचा धुव्वा उडवते.

या कथानकात एकीकडे राजकीय संघर्ष आणि राजकारण्याची मिलीभगत दाखवतांना, दुसरीकडे सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि कामगार संघर्ष करतांना आणि तिसरीकडे महविद्यालयीन विद्यार्थ्यांचे राजकारणही दाखवलंय. या सगळ्या घटनांवर राजकीय अंकुश असल्याचं दाखवल्याने एकाच कुटुंबाची ही राजकीय खेळी असल्याने, काही गोष्टी ओढून ताणून कथानक बसवल्यात, असंही जाणवतं. 

यासह मालिकेत (तांडव) विद्यार्थ्यांच्या राजकारणावरही भर दिलाय. विद्यापीठाच्या रस्त्यावर लोकांचा आवाज, त्याचा परिणाम संपूर्ण देशभर कसा पसरतो, हे देखील दाखवलंय. त्या दरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याच्या तोंडचं वाक्य खूप महत्वपूर्ण असंच आहे. तो म्हणतो की, ‘दहशतवादी आता सीमेपलिकडून येत नाहीत तर ते इथेच आहेत आणि त्यांची तयारी अशा विद्यापीठांमधूनच होते. या विद्यार्थ्यांच्या राजकारणात शिव-शेखर (मोहम्मद झीशान अय्यूब) याने उत्तम कामगिरी केलीय. 

यातील प्रसंग सुरुवातीला संथ गतीने पुढे सरकत जातात, मग कथानक अर्ध्यावर पोहोचल्यावर वेग घेते. त्यानंतर मात्र अंगावर शहारे उठतात. दहा एपिसोडमध्ये बांधलेल्या यातील कथानकात खूप काही दाखवण्याचा अट्टाहास केल्याने प्रेक्षकांना बरेचसे गोंधळल्यासारखे होते.  याच सोबत शेतकरी चळवळ, महाविद्यालयीन राजकारण याची सरमिसळ केल्याने भिन्न घटनांचे संदर्भच लागत नाहीत.
बॉबीमुळे प्रसिद्धी लाभलेली सुंदर अशी डॉल ‘डिंपल कपाडिया’, हिने अनुराधा किशोर या व्यक्तिरेखेत अपेक्षित रंग भरल्याने, हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. तिच्या प्रभावाखाली समर प्रताप सिंग(सैफ अली खान) हे पात्र झाकोळले आहे.  कथानकाची भरपूर साथ असूनही ते एस्टॅब्लीश करण्यात तो कमी पडतो. मालिकेच्या शेवटाला एक हुकुमशहा आणि किंगमेकर अशी त्याची ओळख होतांनाच मालिका संपतेही. सुनील ग्रोव्हरची व्यक्तिरेखा फार मोठी नाही परंतु त्याने प्रभावी काम केलंय. 

एकुणात ही वेब-सिरीज बघणेबल नक्कीच आहे आणि याचा दुसरा सिझन येण्याचे सुतोवाच शेवटी केल्याने आधीचे कथानक माहिती असावे, एवढेच!(Amazon Prime)

N C Deshpande
एनसी देशपांडे

९४०३४ ९९६५४