सर्वात वर

मोठी तिची बाहुली

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

“ए , किती वेळा सांगु तुला मला ऑफिसला जाताना नको अडवत जाऊ.” स्वराचा आवाज अचानक मोठा झाल्याने माझं लक्ष गेलं तर बाईसाहेब बाहुलीशी (Doll) बोलत होत्या. तिचं असं रागावून बोलणं तिच्या एकदंरीतच लाघवी स्वभावाच्या विरूद्ध असल्याने मी तिच्या हालचाली निरखून पाहत होते. बाहुलीला एका हाताने बाजूला करत दुसऱ्या हाताने हवेतच हात हलवुन लिपस्टिक निवडली आणि तर्जनी ओठांवरुन फिरवत परत बडबडली, “सारखी पायापायात येऊ नकोस गं ! बरं, आज लवकर येईन ओके?”अच्छा, म्हणजे स्वरा तिच्या मम्मीच्या भुमिकेत होती आणि तीने बाहुलीला (Doll) स्वराची भुमिका दिली होती. 

स्वरा अगदी दिड वर्षांची असल्यापासून माझ्या कडे येते. वयाच्या मानानं इतर मुलांपेक्षा ती खूप स्पष्ट बोलणारी, विचारांमध्ये सुसुत्रता असणारी आणि अतिशय आनंदी मुलगी आहे. स्वराचं हे असं रागावून बोलणं, चिडचिड करणं मला नविनच होत. त्या दिवसापासुन पुढचे काही दिवस मी स्वराला रोज बाहुली (Doll) देऊ लागले. तीचा आणि त्या बाहुलीचा ‘एकतर्फी’ संवाद म्हणजे स्वराची अलिखीत रोजनिशी होती. ती कधी बाहुलीला (Doll) मिठीत घेऊन “सॉरी पिल्लू” म्हणायची तर कधी बाहुलीला खोटं खोटं आइस्क्रीम, चॉकलेट देऊन खुश करायची.  स्वराचा स्वभाव सुद्धा अगदी लाघवी म्हणावा तसा आहे, साधारणतः कुणी नवं माणुस दिसलं तर मुलं बोलायला लाजतात, ही मात्र सगळ्यांना आपल्या क्युट दिसण्याची, चमकदार डोळ्यांची,  आपल्या गोड आवाजाची आणि हजरजबाबीपणाची मोहिनी घालते. कुणीही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वरा इतकी सुसंबद्ध कशी देते याचं मला कायमच कोडं पडतं.

अशा सर्वगुणसंपन्न स्वराने बाहुलीला (Doll) अशी वागणूक का द्यावी? काय चाललंय तिच्या मनात? ह्या तिच्या वागण्याचा तिच्या पुढील आयुष्यावर नेमका काय परिणाम होईल ह्याची तिच्या पालकांना जाणीव आहे का? स्वराच्या बाबतीत नेमकं काय घडतंय याचा अंदाज मी मनाशी बांधला आणि तिच्या पालकांना भेटायला बोलावलं.स्वरा आणि घडलेले प्रसंग तसं बघायला गेलं तर लहान आहेत, पण याची मानसिक व्याप्ती मोठी आहे , म्हणुनच पालकांशी बोलुन त्यांना यात सहभागी करून घेणं खूप महत्वाचं होतं.

स्वराचे पालक येतांनाच १५ मिनीटांचा अल्टीमेटम घेऊन आले. याआधी माझ्याशी दिलखुलास विशेषतः घड्याळाचं बंधन नसणाऱ्या गप्पा मारणारी स्वराची आई वारंवार घड्याळ पहात होती. स्वराचे वडिल हातातल्या मोबाईलला सारखं अनलॉक करून पहात होते. याचाच अर्थ या अशा मानसिकतेत त्या दोघांशी १५ मिनीटेच काय १५ तास जरी बोलले असते तरी काहीच फरक पडला नसता. मी त्यांची कामाच्या दिवशी गैरसोय झाल्याने माफी मागितली आणि सुट्टीच्या दिवशी थोडा वेळ काढून भेटायला येण्याची विनंती केली. त्यांनीही लगेच तयारी दाखवली, शेवटी त्यांनाही त्यांच्या लेकीची काळजी होतीच पण त्यासाठी वेळ काढणं अवघड दिसत होतं. मम्मी- पप्पांना स्कूल मध्ये आलेलं पाहुन स्वरा मात्र बेहद्द खुश होती. पप्पाऽऽ अशी हाक मारत तिने चिमुकल्या हातांनी त्यांना मिठी मारली, त्यांनी तिचं ‘पार्सल’ तिच्या आईकडे शिफ्ट केलं आणि ते तिघं निघाले. एकत्रपणे जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या तिघांकडे मी बघत तर होते मात्र आता मला ते एकत्र दिसत नव्हते,  तीन स्वतंत्र व्यक्ती तिन दिशेला जातांना मला दिसत होते.

नाही, हे असं होऊन चालणार नाही. मुलांचं बालपण होरपळतं, त्यांचा भावनिक विकास खुंटतो. स्वरासारख्या हुशार आणि चुणचुणीत मुलीवर दिवसेंदिवस परिणाम होतो आहे, हे थांबायला हवं. मी आता लवकरात लवकर स्वरा व तिच्या पालकांना भेटण्याचा विचार मनात पक्का केला होता.

त्या भेटीनंतर मी स्वराशी मुद्दाम जरा जास्त बोलायला सुरुवात केली. डबा कुणी बनवला, वेणी कुणी घातली, आजचा फ्रॉक छानच आहे तुझा, कुणी घेतला? या सारख्या प्रश्नांची आधी मिळणारी उत्तर, आधीचा उत्साह आणि आधीचे चेहऱ्यावरचे हावभाव सगळंच बदललं आहे हे माझ्या लक्षात आलं.

अखेर स्वराचे आई-बाबा वेळ काढून भेटायला आले. मी स्वराची तक्रारच करायला बोलावलं असणार याची त्यांना खात्रीच होती.

“स्वरा स्कूल मध्ये पण विचीत्र वागते का हल्ली?” स्वराच्या आईने मला सरळ सवाल टाकला. एका मोस्ट अवेटेड भेटीची सुरुवात अशी व्हावी याचा मला खेद वाटला. “विचित्र  नाही पण जरा वेगळी वागते आहे ती हल्ली!” मी म्हणाले, “वेगळं म्हणजे विचित्र नाही मॅम. स्वरा , तु जा बरं तुझी स्वरा (बाहुली) (Doll) तुझी कधीची वाट बघतेय” मी स्वराने तिथुन जावं म्हणून तिला सांगीतलं, तेवढ्यात “नो मॅम, तिला ऐकुच द्या तिच्या तक्रारी” असं म्हणत तिच्या आईने हात पकडून तिला जबरदस्तीने बसवलं. 

ही शाळा स्वराची होती, इथे तिला मोकळेपणा मिळतो, इथे ती तिच्या मर्जीने बागडते, उड्या मारते, खेळते, गाते, नाचते ! तिच्या या जगात आज तिच्या मनाविरुद्ध घटना घडली होती. मुक्त होऊ पहाणाऱ्या एका फुलपाखराला उडण्याची मनाई होत होती. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. यापुढे सुत्र मला हातात घेणं भाग होतं. ” अरे, काय झालं माझ्या स्वराला? इकडे ये” डोळ्यातलं पाणी तिने कसबसं अडवलं होतं त्या मिनिटाला मला तिच्या धोरणीपणाचं कोण कौतुक वाटलं. देव इतकं गुणी लेकरु देतो तेव्हा पालकांची जबाबदारी वाढलेली असते. ती जवळ आल्यावर मी हलकेच तिच्या गालाला स्पर्श केला, तशी ती खुदकन हसली. ” अहो, मी काही तक्रारी सांगायला नाही बोलावलंय तुम्हाला” मी तिला अलगद मांडीत घेतलं, ” मी तर तीचं कौतुक करायला बोलावलं आहे. हो ना बेटा? ” ती मानेनेच हो म्हटली आणि तिची बाहुली (Doll) आणायला पळाली. 

आमचं विषयाला धरून काही बोलणं चालु असतांना माझं पुर्ण लक्ष समोरच्या सीसीटीव्ही स्क्रीनवरच होतं. मला जे अपेक्षित होतं ते लवकरच झालं ! स्वराचा चिडलेला आवाज आला आणि मी तिच्या पालकांना सीसीटीव्ही स्क्रीनवर पहायला सांगीतलं. स्वराने तिच्या बाहुलीचे (Doll) दोन्ही हात एकाच हातात धरले होते , दुसऱ्या हाताने ती बाहुलीला (Doll) धमकावत होती, ” आता आपण तुझ्या स्कुलमध्ये चाललोय, तुझ्या टिचरला मी सगळं सांगणार आहे. त्यांनी सांगीतलंय मला तु किती त्रास देतेस स्कुलमध्ये ते ! खबरदार तिथे जाऊन काही आगाऊपणा केलास तर….”सगळीकडे शांतता होती, स्वराने नकळत शाळेत येण्याआधी घरी पार पडलेला अध्याय वाचुन दाखवला होता. तिचे पालक ओशाळले होते, नजर चोरत होते. आम्ही थोडावेळ शांतच बसलो. मग कुणीतरी सुरुवात करावी म्हणुन मी म्हटलं  ” हेच सांगायचं होतं मला. स्वराचं बाहुलीशी (Doll) बोलणं, तिला रागावणं, मारणं, तिच्यावर वैतागणं हे तिचे विचार नाहीत, ही तिला घरी मिळणारी वागणूक आहे. हे मला तुमच्याकडुन अजिबात अपेक्षित नव्हतं.” स्वराचे बाबा तिच्या आईला ओरडुन म्हणाले, “तरी तुला सांगत होतो, स्वरा ५ वर्षांची होईपर्यंत घरात रहा, मला तुझ्या पैशांची गरज नाही, तिला वेळ दे पण तु ऐकशील तर ना!” 

स्वराची आई आता रडवेली झाली होती. त्यांना नव्यानेच नौकरी लागली होती. ” मॅम, आमचं खरंच चुकलं. स्वराच्या जन्माआधी मी नौकरी करत होते, मग स्वराचा जन्म झाला म्हणून मी नौकरी सोडली. तिचं बालपण पुन्हा मिळणार नाही, ते पुर्ण एन्जॉय करायचं असं आम्ही ठरवलं होतं. ती आत ३ वर्षांची आहे ती पहिलीत गेली की मग नौकरी शोधायची हे पक्कं ठरलं पण या कोरोना काळात संसाराची गाडी एका चाकावर नाही चालणार, दुसरं चाकंही फिरायला हवं या विचाराने जरा नाईलाजाने नौकरी पत्करली. स्वरासाठी सासुबाई स्वतः पुढे आल्या. मला सगळंच एकटीने करायला लागु नये म्हणून त्या खुप मदत करताय मात्र मी अजुनही आई म्हणून कमी पडतेय  याचा गिल्ट(न्युनगंड) घेऊन जगते आहे. स्वराच्या जन्मापासून ती माझं विश्व झाली होती, आणि तिला थोडं समजायला लागल्यापासून मीच तिचं विश्व आहे. तिच्या बाबांशीही तिचं छान जमतं, पण बाबांना ऑफिसलाही जावं‌ लागतं त्यामुळे बाबा ठराविक वेळीच भेटणार याची तिला सवय आहे. मी २४ तास तिच्या सोबत असायचे ,आता नेमकं तेच होत नाहीये. मी निघाले की ती माझ्या पाया-पायात घुटमळते, माझ्या वस्तु लपवते, मुद्दाम पसारा काढून बसते. तिला स्कुलला सोडुन मला पुढे जायचं असतं पण आधीसारखी पटकन तयारच होत नाही. या सगळ्याचा त्रागा मग तिच्यावरच निघतो.”

स्वराची आई अगतिक होऊन सांगत होती. एक स्त्री म्हणून मला तिची वेदना समजत होती, ओढाताण जाणवत होती, तिने तडजोड तर केली होती पण तिला ती झेपत नव्हती.स्वरा आता ३ वर्षांची आहे. इतरांचं निरीक्षण करून व त्यांच्या प्रमाणे वागण्यामधून समाजात कसं मिसळावं हे या वयात मुलं शिकतात तसंच कशा प्रकारची वागणूक स्वीकारली जाते आणि कुठल्या प्रकारची वागणूक नाकारली जाते हे देखील त्यांना या वयात समजायला लागतं. मुलांच्या वागण्या बोलण्याला आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे महत्त्वाचे घटक म्हणजे त्यांच्या आजूबाजूची माणसं अर्थात समाज !

मोठ्या माणसांचं आणि वयाने मोठ्या मुलांचं वागणं हे या वयातील मुलांसाठी एक प्रकारचा आदर्श असतो. स्वराच्या वयाची मुलं त्यांच्या वागण्याचं अनुकरण करायला शिकतात. लोक जे सांगत आहेत ते त्यांना ऐकायचं नसतं पण लोक जसं वागत आहेत त्याचे अनुकरण मात्र या मुलांना नक्की करायचं असतं.

पालकांनी आरडाओरडा किंवा मारहाण केली तर ही मुले तसेच वागायला शिकतात. जर घरातले मोठे इतरांशी सौजन्याने वागले, आदराने आणि संयमाने वागण्याचं उदाहरण त्यांनी मुलांना दिलं तर ही मुलं त्यांचं अनुकरण करतात.

या वयाच्या मुलांना दुसऱ्यांची भूमिका वठवणं किंवा ढोंगीपणा अर्थात नाटक करायला आवडतं आणि हे त्यांना करू द्यावं कारण यामधूनच त्यांना इतरांची विचारसरणी समजून घ्यायला आणि ती स्वीकारायला किंवा नाकारायलाही मदत मिळते. 
स्वराच्या आई-बाबांना आता स्वराच्या वागण्याचा अर्थ थोडा थोडा समजायला लागला होता. अलीकडेच नोकरी लागल्यामुळे स्वराच्या आईचा स्वभाव बदलला होता. आईच्या वागण्यातला बदल स्वरानी अचूक टिपला होता. तिच्याशी कायम कनेक्टेड असणारी आई आता बदलली होती आणि त्याचाच परिणाम स्वरावर होत होता. स्वरासाठी तिची आजी आली होती पण याआधी स्वरा आणि तिची आजी इतका वेळ कधी एकत्रच नव्हत्या. त्यामुळे स्वराला तिच्या आजीची सवयच नव्हती. अचानक आलेल्या आजीने स्वराचा ताबा घेतला होता. सकाळी उठल्यापासून स्वराला आंघोळीला जा ,चल मी तुझा दूध बनवून ठेवलंय ,हे मी तुला कपडे घालून देते, या सगळ्या आईने करायच्या गोष्टी आता आजी का करते ? या प्रश्नाचे उत्तर स्वराला सापडत नव्हतं. अचानक गोंधळलेल्या मनस्थितीत आता ‘मी आईकडे जाऊ की आजीकडे जाऊ?’ याचा निर्णय सुद्धा स्वराला घेता येत नव्हता. या छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वराज्याच्या स्वभावावर परिणाम व्हायला लागला होता.

स्वरा च्या बाबतीत मी केलेलं निरीक्षण आणि त्यातून काढलेला निष्कर्ष हा बऱ्याच अंशी बरोबर होता. स्वराच्या आईला आता खूप प्रश्न पडत होते. स्वरा तीन वर्षाची झाली म्हणजे नक्की तिची काय प्रगती असायला हवी? तिला काय काय यायला हवं? तिला त्यातलं काय काही येत नाही? अशा प्रश्नांची सरबत्तीण त्यांनी माझ्यावर केली.
खरं तर असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील म्हणूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता फक्त स्वराच्या आई-बाबांना नाही तर मी तुम्हा सगळ्यांना देते. आपलं मूल जेव्हा तीन वर्षाचं होतं त्यावेळेला त्यांची प्रगती कशी ओळखायची याच्या काही टिप्स मी तुम्हाला देते.

या तीन वर्षे वयाच्या मुलांना कुठल्या कुठल्या गोष्टी करता आल्या पाहिजेत ?

@ सहज आणि मोकळं चालता आलं पाहिजे 

@ जिना चढणे, धावणे, लाथ मारणे, उड्या मारणे अश्या शारीरिक क्रिया त्यांना सहजरीत्या करता आल्या पाहिजेत. 

@ चित्रातील किंवा प्रत्यक्ष सामानातील वस्तू बोट दाखवून ओळखता यायला हव्या. 

@ दोन किंवा तीन शब्दांची छोटी वाक्य बनवून बोलता यायला हवं.स्वतःचं नाव आणि वय सांगता यायला हवं.

@ रंगांची नावे सांगणे 

@अंक ओळखणे 

@खेळतांना खोट्या वस्तूंचा वापर करून त्यांच्याशी संवाद साधणे.

@ स्वतःच्या हाताने जेवण्याखाण्याची सवय या वयात मुलांना लावायला हवी.

या वयाची मुलं आपले प्रेम व्यक्त करू शकतात आणि म्हणूनच मुलांनी आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर आपल्या मुलांबरोबर पुस्तक वाचा, पुस्तक पहा, त्यामधली चित्र मुलांना दाखवा आणि त्या चित्रांवर चर्चा करा. मुलांना गोष्टी सांगा, गाणी आणि छोटी छोटी बालगीतं, बगबडगीतं शिकवा. नुसता मोबाईल देऊन त्याच्यावर वेगवेगळे कार्टून किंवा वेगवेगळ्या गोष्टी लावून दिल्या तर मुलं तुमच्याशी जोडली जाणार नाहीत.

मुलांना खाण्यासाठी त्यांची स्वतःची ताट वाटी वेगळी द्या. त्यांना स्वतंत्रपणे खाऊ द्या. त्यासाठी त्यांना जास्त वेळ लागला तरी चालेल. स्वतःचे कपडे स्वतः घालणे, हात स्वच्छ धुणे, स्वच्छतागृहाचा अर्थात टॉयलेटचा वापर करणे या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवा आधी मुलांची थोडी मदत करा मग आपोआपच ते या सगळ्या गोष्टी स्वावलंबनाने करायला शिकतील.

कधी कधी आपली मुलं वेगळंच वागायला लागतात आणि सुरवातीला आपल्या लक्षातच येत नाही कारण कधी कधी आपण एवढ्या लहान मुलांकडे काय लक्ष द्यायचं? म्हणून त्यांच्या अनेक गोष्टी दुर्लक्षित करतो पण जर तुमच्या मुलाचं खेळण्यावरून मन उडालं असेल , चालताना तो सारखा पडत असेल किंवा छोट्या-छोट्या वस्तू त्याच्या हातातून निसटत असतील, तुम्ही जे काय सांगताय ते त्याच्या लक्षात येत नसेल, साध्या सूचना त्याला समजत नसतील , नीट जेवण करत नसेल आणि त्याला माहीत असलेले शब्द वापरून सुद्धा त्याला जर बोलता येत नसेल  तर मात्र काहीतरी घडतंय , त्याचं काहितरी बिनसलंय! 

या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला अगदी जाणीवपूर्वक बघावं लागेल. त्याच्या वागण्याबोलण्यात हा फरक का येतोय? आपल्या कुटुंबातील छोटे छोटे बदल तपासून बघा, आपल्या दैनंदिन जीवनात काही वेगळं घडतंय का, आपल्या प्रतिक्रिया बदलल्याने हे होतंय का याचा विचार करा. अलीकडच्या काही दिवसांमध्ये कोणी नवीन व्यक्ती आपल्या संपर्कात आहे का ? आपलं मूल नक्की कोणा कोणाकडे जाते, त्या घरातली माणसं कशी आहेत त्या घरातल्या माणसांचा त्यांच्या मुलांशी असलेला संवाद कसा आहे ,आपली मुले तिथे गेल्यानंतर त्याला वागणूक कशी मिळते, या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे तुम्हाला जाणीवपूर्वक बघायला हवं.
मुलांच्या वयाची पहिली आठ वर्षे अतिशय महत्त्वाची असतात. त्यातही पहिली तीन वर्षे जास्त महत्त्वाची मानली जातात, कारण त्यांच्या पुढील आयुष्यात येणाऱ्या सर्वांगीण विकासाचा पाया याच वर्षांमध्ये घातला जातो. या कालावधीमध्ये मुलांच्या शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो.  वयाच्या पहिल्या आठ वर्षांमध्ये मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन आणि मानसिक पातळीवर चालना मिळाली तर ही मुले उत्साहाने शिकतात आणि मग आयुष्यात कुठेही, कोणाच्याही मागे राहत नाहीत.

स्वराची आई आणि बाबा हे ऐकून बऱ्यापैकी सावरले होते. स्वरा त्यांची आवडती लेक आहेच, आता तिच्या बाबतीत नक्की काय करायचं हे त्यांना कळलं होतं आणि खरंच पुढच्या आठ दिवसांतच मला स्वराच्या वागण्यामध्ये परत बदल दिसायला लागला होता. हसरी खेळकर आणि अगदी मनस्वी बडबड करणारी स्वरा आता मला परत मिळाली होती. स्वराच्या छोट्याशा जगात, तिच्या आनंदात, तिच्या प्रगतीमध्ये कुठेतरी माझा हातभार लागला हे माझं भाग्य समजते ,पण माझ्या आजूबाजूला अशी कित्येक मुलं आहेत ज्यांना माझी गरज असेलही पण त्यांच्या पर्यंत मी पोहोचू शकत नसेल किंवा त्यांना माझ्या पर्यंत पोहोचता येत नसेल. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मुलांच्या स्वभावात होणाऱ्या बदलांसाठी किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये मी काही करू शकेल तर माझ्याशी नक्की बोला. मी खाली माझा मेल आयडी देत आहे त्याच्यावर तुम्ही ई-मेल करू शकता किंवा मला व्हाट्सअप करून तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.

[email protected] 

8329932017 / 9326536524