सर्वात वर

प्रा.वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाटकांचा उत्सव साजरा करावा

प्रा.वसंत कानेटकरांची सून अंजली, नातू अंशुमान कानेटकर तसेच ज्येष्ठ नाटककार कादंबरीकार अशोक समेळ यांचे आवाहन   

नाशिक – (प्रतिनिधी) प्रतिभाशाली नाटककार,लेखक तथा इतिहासकार, प्राध्यापक स्वर्गीय वसंत कानेटकर (Vasant Kanetkar)यांचे हे जन्मशताब्दी वर्ष येत्या २० मार्च पासून सुरु होणार आहे.या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम साजरे करून कानेटकरांना अभिवादन केले जाणार आहे.प्रा. कानेटकरांचे या क्षेत्रातील योगदान लक्षात घेता त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपणही आपल्या वेगवेगळ्या मंडळांतर्फे या वर्षभरात विविध कार्यक्रम करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रा.वसंत कानेटकरांची सून अंजली, नातू अंशुमान कानेटकर तसेच  ज्येष्ठ नाटककार कादंबरीकार अशोक समेळ यांनी केले आहे.

Ashok-Samel
ज्येष्ठ नाटककार कादंबरीकार अशोक समेळ

प्रा. वसंत कानेटकर यांनी पन्नास वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत ४१ प्रसिद्ध नाटके लिहिली. या नाटकांपैकी “अश्रुंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते, प्रेमाच्या गावी जावे, लेकुरे उदंड झाली, संगीत मत्स्यगंधा, येथे ओशाळला मृत्यू, मला काही सांगायचंय?” इत्यादी प्रसिद्ध नाटकांचे त्यांनी हजारो प्रयोग केले.  

प्रा. वसंत कानेटकरांना (Vasant Kanetkar) ओळखणारे  देशातील लेखक, कलाकार, नाटककार तसेच त्यांचे असंख्य चाहते हे २० मार्च २०२१ ते १९  मार्च २०२२ या वर्षभरात चालणाऱ्या कानेटकरांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या विविध उपक्रमात सहभागी होणार आहेत. प्रा.वसंत कानेटकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपणही आपल्या वेगवेगळ्या मंडळांतर्फे प्रा. कानेटकरांचे प्रयोग,अभिवाचन, नाट्य, गायन, चर्चासत्रे  इत्यादी स्पर्धा आयोजित करून या उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन ज्येष्ठ नाटककार कादंबरीकार अशोक समेळ यांनी केले आहे.