सर्वात वर

सहजयोगाच्या संस्थापिका परमपुज्य श्रीमाताजी निर्मलादेवी यांचा जन्मोत्सव जगभरात साजरा

आध्यात्मिक विश्वातील सर्वात कठीण साधना म्हणजे कुंडलिनी जागृती …एक गुरू एक शिष्य या परंपरागत ध्यान साधनेत पुरातन काळी कुंडलिनी जागृत करण्यासाठी साधुसंत , सतगुरू सुद्धा कठीण सिद्धी द्वारे हे कार्य करीत असे.

पण या शक्तीची सखोल माहीती व त्या कुंडलिनी शक्तीच्या ज्ञानाविषयी आदिशंकराचार्यांनी तसेच नाथसंप्रदाया व्यतिरिक्त संत ज्ञानेश्वरांनी देखील स्पष्टपणे ज्ञानेश्वरी मध्ये सहाव्या अध्यायात २२१ ते २२८ व्या ओवीत विस्तृतपणे सांगितले आहेत.

योग साधनेने योग्याच्या शरीरात सुप्तावस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते. तीचा उर्ध्वमुखी प्रवास मुलाधार चक्रापासुन सुरू होऊन , स्वाधिष्ठान चक्र , नाभी चक्र , अनाहत चक्र , विशुद्धी चक्र , आज्ञाचक्रांद्वारे फ़िरत ती अखेर सहस्त्रार या सर्वात वरच्या सातव्या चक्रापर्यंत पोहोचते.  या कुंडलिनी शक्तीसाठी ते नागाचे  विलक्षण रुपक वापरतात. कुंडलिनी शक्ती जणु नागिण आहे असे रूपकात्मक वर्णन त्यांनी केले आहे. 

तंव येरीकडे धनुर्धरा, आसनाचा उबारा, शक्ति करी उजगरा, कुंडलिनीये।

नागाचें पिलें, कुंकुमे नाहलें, वळण घेऊनि आले, सेजे जैसे ।

तैशी ते कुंडलिनी, मोटकी औट वळणी, अधोमुख सर्पिणी, निजैली असे। 

विद्दुल्लतेची विडी, वन्हिज्वाळांची घडी, पंधरेयाची चोखडी, घोंटीव जैशी । 

तैशी सुबद्ध आटली, पुटीं होती दाटली, ते वज्रासने चिमुटली, सावध होय।

तेथ नक्षत्र जैसें उलंडले, कीं सुर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुढले, अंकुरेशीं । 

तैशी वेढियातें सोडिती, कवतिकें आंग मोडिती, कंदावरी शक्ती, उठली दिसे । 

सहजें बहुतां दिवसांची भुक, वरि चेवविली तें होय मिष, मग आवेशें पसरी मुख, ऊर्ध्वा उजू ।


तसेच पुढे ते २७२ व्या श्लोकात म्हणतात की ,


” ते कुंडलिनी जगदंबा ,

जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा ।

जया विश्वबीजाचिया कोंभा , साउली केली ।।

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये कुंडलिनी शक्तीचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. 

पण आजच्या या आधुनिक युगात देखील एक अशक्य वाटणारी घटना म्हणजे एकाचवेळी अनेक सामान्य साधकांची कुंडलिनी शक्ती जागृत करून , अनेकांना आत्मसाक्षात्कार देणे. पण परमपुज्य श्रीमाताजींनी आजपर्यंत देशविदेशात विनामूल्य कुंडलिनी शक्ती जागृती द्वारे लाखो लोकांना आत्मसाक्षात्कार देऊन त्यांचे जीवन सुखमय , चैतन्यमय आणि आनंदी जीवन बनविले. अशा सहजयोगाच्या संस्थापिका आदरणीय परमपूज्य श्री माताजी श्री निर्मलादेवी (Shrimataji Nirmaladevi) यांनी देशविदेशात जाऊन सहजयोगाच्या माध्यमातून जनकल्याणासाठी , आत्मसाक्षात्काराद्वारे प्रचार प्रसाराचे विनामूल्य कार्य केले.

आज परमपूज्य श्रीमाताजींचा जन्मदिवस

२१ मार्च १९२३ साली मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील उच्चशिक्षित , सुप्रसिद्ध वकील श्री. प्रसादराव सालवे  हे थोर स्वातंत्र्यसेनानी होते. श्रीमाताजींनी (Shrimataji Nirmaladevi) ही बालपणापासून स्वतःस स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. महात्मा गांधींबरोबर त्यांनी १९४२ साली इंग्रजांविरूद्ध चलेजाव चळवळीत ही सहभाग घेतला. त्यांचे तेजस्वी आणि चैतन्यमय रूप मात्र सर्व स्वातंत्र्यवीरांमध्ये उठून दिसत असे.
घरातील सर्व उच्चशिक्षित असतांना देखील देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात सर्व कुटुंब प्रेमाने राहायचे. पण देशसेवेचा विचार त्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हता. 

अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग ही घेतला. जेल मध्ये जावे लागले. वेळप्रसंगी भुमिगत ही व्हावे लागले. पण देशसेवेचे व्रत कधी ही सोडले नाही.लहानपणापासून तेजस्वी रूप असणाऱ्या श्रीमाताजींना मानवी शरीरातील नाडी तंत्राविषयीचे संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान अवगत होते. त्यांनी केलेल्या अनेक चमत्कारिक घटनांमुळे त्यांच्या विषयी जनमानसात आदर व प्रेम वाढत होते. पण त्यांनी कधी स्वतःचा मोठेपणा कोणास कधी सांगितला नाही किंवा दाखविला ही नाही.

या संपूर्ण आध्यात्मिक व वैज्ञानिक ज्ञानास वैशिष्ट्यपूर्ण शब्दावली देण्यासाठी त्यांनी लुधियाना येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि लाहोर येथील बाळकराम मेडिकल कॉलेज येथे आयुर्विज्ञान व मनोविज्ञान विषयावर सखोल संशोधन केले. 
१९४७ साली देश स्वतंत्र होण्याआधी उच्चविद्याविभूषित श्री चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव यांच्याशी त्यांचा शुभविवाह झाला. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर  सर चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव हे पुर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींचे प्रमुख संयुक्त सचिव म्हणून ही कार्यान्वित होते. युवकांमध्ये देशप्रेम , सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी तसेच राष्ट्रीय भावना जपण्यासाठी व नैतिक मुल्याची जाणीव करून देण्यासाठी श्रीमाताजींनी १९६१ साली युथ सोसायटी फॉर फिल्म ची स्थापना केली. 

परमपुज्य श्रीमाताजींनी ५ मे १९७० साली मानवाच्या कल्याणासाठी सहजयोगाची स्थापना करून अहोरात्र सर्व सामान्य माणसांची कुंडलिनी शक्ती जागृत करून करोडो साधकांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती दिली.

आतापावेतो अनेकानेक देशात सर्वोच्च सन्मानाने , पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले सन्मानित करण्यात आले. कित्येक देशात त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून त्या देशातील एक दिवस श्री निर्मलादेवी दिन  म्हणुन साजरा करण्यात येतो.
आज जगभरात १४० हुन अधिक देशांमध्ये त्यांनी सांगितलेल्या निस्वार्थी तत्त्वानुसार सहजयोगाचे कार्य अविरतपणे चालू आहे. कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव न करता , गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता भारतीय संस्कृतीचे , मानवतेचे व एकतेचे दर्शन सहजयोग परिवारात बघावयास मिळते. आज विश्वातील सर्व सहजयोगी बंधु आणि भगिनी शांततेत सहजयोग ध्यान धारणा करत जगाच्या कल्याणासाठी ,  सुखासाठी निस्वार्थी भावनेने श्री माताजींच्या चरणी विनम्रपणे प्रार्थना करत असतात. मला सुद्धा सहजयोग ध्यान साधनेमुळे  खुप फायदा झाला. मी एक माझा सहज अनुभव सांगू इच्छितो. 

गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर पडते तेव्हा मात्र आपल्या जीवनाचे कल्याण होते…..असे ऐकले होते.

खर पाहीले तर मी आधी नास्तिक होतो. आध्यात्मिक संप्रदायापासून दूर असायचो. त्यामुळे गुरूंविषयी जाणून घ्यायचा कधी योग आलाच नाही….पण नशिबाने १९९३ साली दिल्ली येथे परमपुज्य श्री माताजी श्री निर्मलादेवी (Shrimataji Nirmaladevi) यांच्या जन्मदिनानिमित्त आंतरराष्ट्रीय संगीत समारोह व जन्मदिन पुजेचा उत्सव साजरा झाला. याच संगीत समारोहात मला कलाकार म्हणून आमंत्रित करण्यात आले मी सिंथेसायझरवर शास्त्रीय संगीत वाजवले….त्यावेळी त्यांनी मला जे भरभरून आशिर्वाद दिले , प्रेम दिले त्यामुळे माझा आनंद तर गगनात मावत नव्हता…कारण ज्या खऱ्याखुऱ्या गुरूंच्या शोधात मी होतो तिथे साक्षात महागुरू मिळाले.

जगण्याची योग्य नवी दिशा , जीवनाचे आणि संगीतातले सखोल मार्गदर्शन मिळाले ते परमपूज्य श्रीमाताजी श्री निर्मलादेवी यांच्या परमकृपेमुळे…ज्या गुरूंमुळेच मला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले अशा माझ्या सांगीतिक व आध्यात्मिक गुरूंना परमपुज्य श्रीमाताजींना जन्मदिवसानिमित्य त्यांच्या श्रीचरणी कोटी कोटी नमन करतो.

अशा आमच्या गुरूंना ( श्रीमाताजींना ) जन्मदिनाच्या आम्हा सर्व सहजयोग्यांकडुन लाख लाख शुभेच्छा 
परमपूज्य श्री माताजींच्या परमकृपेत कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर आत्मसाक्षात्काराची जी जीवंत चैतन्यमय अनुभूती मिळते. आपले जीवनात नकारात्मकता नष्ट होऊन जीवन सुखमय , निरोगी , समृद्ध व यशस्वी होऊ लागते.
या अनुभूतीची जाणीव घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी www.sahajayoga.org.in या संकेतस्थळावर जरूर भेट द्या.

Dhanajya Dhumal
पं. धनंजय धुमाळ

पं. धनंजय धुमाळ
आंतरराष्ट्रीय संगीत दिग्दर्शक ,विविधा तरंगिनी ( सिंथेसायझर ) वादक