सर्वात वर

चाफा बोलेना (बाल मानसशास्त्र व संगोपन लेख -२)

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)  

चाफा बोलेना, चाफा चालेना, 
चाफा खंत करी काही केल्या फुलेना… खरं तर हे गाणं आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकतोय ,अलीकडे आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर आपल्याला हाच अनुभव आपल्या घरात येत असेल. का होतय असं? असं काय कारण असेल की ही लहान मुलं व्यक्तच होत नाहीत? बोलत नाहीत? मनातलं सगळं सांगत नाहीत? शांत बसून राहतात, शून्य नजरेत एकाच ठिकाणी बघतात, कुठे तरी हरवल्यासारखी तासन्तास बसून राहतात.

हे सगळं जर तुमच्याही मुलांच्या बाबतीत होत असेल तर आजचा लेख नक्की वाचा!

मध्यंतरी रोहितच्या वडिलांनी मला फोन केला होता.  मी रोहितशी व्हिडिओ कॉल वर बोलाव असा त्यांचा प्रेमळ आग्रह होता. लहान मुलांची शाळा हे त्यांच घराबाहेरच जग असतं आणि सध्या शाळा बंद असल्यामुळे लहान मुलं खूप जास्त बिथरली आहेत हे मलाही मान्य आहे  आणि म्हणूनच मी माझ्या सगळ्या पिल्लांशी व्हिडिओ कॉल वर बोलत असते.

रोहितला मी लगेच व्हिडिओ कॉल केला. स्क्रीनवर मला बघून त्यानी आनंदाने उडीच मारली. ’’ टीचर मी चित्र काढल आहे, तुम्हाला दाखवू?” रोहितनी विचारलं. मी म्हणले, “हो दाखव ना!” रोहितनी एक पांढरा कागद मोबाईलच्या कॅमेरासमोर धरला. साडेतीन वर्षाच्या रोहितच चित्र म्हणजे काही रेषा आणि काही वर्तुळ , या पलीकडे जास्त काहीच अपेक्षा नव्हती. त्याच चित्रही त्याच प्रमाणे होतं. दोन समांतर आडव्या रेषा आणि दोन्ही रेषांच्या अलीकडे-पलीकडे 3- 4 वर्तुळ!

या दोन समांतर आडव्या रेषांच्यामध्ये एक काहीतरी चीरखडल्यासारखी खुण होती. ती खुण बघून मला जरा उत्सुकता वाटली, “रोहित हे काय चित्र काढले?” “टीचर, हा रोड आहे” दोन समांतर रेषांकडे हात दाखवून रोहित म्हणाला, “या रोडच्या इकडे हे माझं घर आणि या रोडच्या तिकडे ते माझ्या नानाजींचे घर!” “अच्छा म्हणजे तुझे नानाजी रस्त्याच्या त्या बाजूला राहतात बरोबर?” “हो टीचर रोहितसे नानाजी रस्त्याच्या पलिकडे राहतात.” रोहितच्या आईने माहिती पुरवली. “आधी मला पाहिजे तेव्हा मी रस्ता क्रॉस करून तिकडे नानाजींकडे जात होतो, खाऊ खात होतो आणि खेळत होतो पण आता रस्त्याच्या तिकडे जायचं म्हटलं तर पोलीसकाका अडवतात. त्यांच्याकडे काठी असते आणि त्यांनी मोठमोठे गेट लावलेले असतात रस्त्यांवर! (रोहित पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्स बद्दल बोलतोय हे माझ्या लगेच लक्षात आलं) मग मला जाता येत नाही नां नानाजींकडे.” रोहित निरागसपणे बोलला.

“पोलीस काका का बरं अडवतात तुला ?” त्याला आजूबाजूच्या परिस्थितीची किती जाणीव आहे हे मला समजून घ्यायचं होतं. “टीचर, तो कोरोना आलाय ना म्हणून पोलीस काका तिकडे जाऊ देत नाही” अच्छा, कोरोना आलाय म्हणून पोलीस काका  तिकडे जाऊ देत नाही याचा निषेध रोहितने या चित्रातून व्यक्त केला होता म्हणजे रोहित पर्यंत कोरोना हा विषय पोहोचला आहे तर ! आपण सगळेच इतक्या वाईट परिस्थितीतून जातोय , कोरोना, क्वारंटाईन, हॉस्पिटल, ऑक्सिजन बेड हे शब्द नकळतपणे मुलांच्या कानावरून २४ तास जाताहेत. या सगळ्या मानसिकतेतून  आपण मोठे असून स्वतःला सावरू शकत नाही त्यात ही तर लहान मुलं !  माझं रोहितच्या चित्राचं समीक्षण अजुन थांबलं नव्हतं. रस्त्याच्या अलीकडे त्याचं घर होतं, रस्त्याच्या पलीकडे त्याच्या नानाजींचे घर होतं पण त्या रस्त्याच्या मधोमध ‘ते चिरखडलेलं’ काय होतं हे मला समजून घ्यायचं होतं. मी रोहितला परत विचारले, “रोहित, रस्त्याच्या मध्ये काय आहे ते काळं काळं?” 

“टीचर तो बिबट्या आहे! तुम्हाला माहिती आहे आता पोलिस काकांनी लोकांनी घरातून बाहेर पडू नये म्हणून बिबट्या पण सोडला आहे.”   खरंच किती निरागस असतात ही मुलं ! आजूबाजूला काय चाललंय याचा परस्पर संबंध लावून मोकळे होतात आपण मात्र कारण शोधत बसतो. बिबट्या आला हे खरं असलं तरी बिबट्याच्या येण्यामागचं कारण रोहितने बालसुलभ बुद्धीने पटवून घेतलं होतं. रोहित सारखी काही मुलं चित्रातून व्यक्त होतात तर काही मुलं त्यांच्या वागण्या मधून व्यक्त होतात. 

मध्यंतरी आदित्यच्या आईचाही फोन आला. आदित्य पूर्वीसारखा मस्ती करत नाही, बोलत नाही, शांत बसून राहतो हे ऐकल्यानंतर मला जरा आश्चर्यच वाटलं. शाळेत आल्यानंतर सगळ्यात पहिले वर्ग गजबजून टाकणारा आदित्य शांत बसतोय ? वर्गात नेहमी शांत बस असं सांगूनही शांत न बसणारा आदित्य आज बोलत नाहीये ? मला थोडी काळजी वाटली.

मी आदित्यला देखील व्हिडिओ कॉल केला. त्याच्या आईने किमान चार-पाच वेळा आदित्यला बोलावलं. “आदित्य, बाळा टीचरचा कॉल आहे. तुला बोलायचं होतं ना?” पण आदित्य काही मोबाईल स्क्रीन समोर येईना. मग मी त्याचं आवडतं गाणं म्हणायला सुरुवात केली आणि गाण्याबरोबर टाळ्याही वाजवल्या. त्या ऐकल्यानंतर आदित्य हळूच उठून मोबाईल स्क्रीन समोर आला. चमकदार डोळ्यांचा आदित्य आज अगदीच निस्तेज दिसत होता. त्याला बघून क्षणभर मलाच वाईट वाटलं पण त्याला या सगळ्यातून बाहेर काढायचंच असं मी मनाशी ठरवलं. आदित्यच्या आईला रोज एक व्हिडिओ कॉल करायला सांगितलं आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये मी रोज त्याच्या एका मित्राला किंवा मैत्रिणीला  ऍड करायला लागले. त्याच्या मित्र-मैत्रिणींना बघून आदित्य थोडासा खुलला. चार वर्षाच्या वयामध्ये मित्र-मैत्रिणी, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी मस्ती हेच त्या मुलांचे जग होऊन जातं आणि आता कोरोनामुळे नेमकं त्यांना तसं जगता येत नाहीये, तसं व्यक्त होता येत नाहीये म्हणूनच लहान मुलांवर या सगळ्या परिस्थितीचा खूप परिणाम होतोय.

बाहेरच्या अनिश्चिततेचा जसा आपल्यावर परिणाम होतोय तसंच मुलांच्या वागण्यावर देखील परिणाम होतोय. मुलांमध्ये अकारण भीती,वारंवार रडणं, कमी झोप, इतर मुलांमध्ये न मिसळणं, अंथरुणात शू करणं, परत अंगठा चोखण्याची सवय लागणं , बोलताना अडखळणं हातापायांची थरथर , उगीचच डोकं दुखणं किंवा पोट दुखणं अशा अनेक भावनिक, मानसिक आणि शारीरिक तक्रारी वाढल्या आहेत. चिडचिडेपणा, अतिचंचलता, राग- संताप, एकाग्रता न करता येणं आणि लक्षात न रहाणं अशा समस्या पण आता मुलांमध्ये दिसत आहेत. मुलांच्या भावनिक आणि मानसिक समस्यांचे योग्य वेळी निराकरण करायला हवं. 

निराकरण करण्यासाठी आधी मुलांच्या विकासामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं रहाणं किती महत्वाचं आहे हे पालकांनी पटवून घ्यायला हवं. मुलांचं वागणं आणि त्यांच्या भावनिक समस्यांकडे पालकांनी दुर्लक्ष करता कामा नये. मुल हसून खेळून वागत असल तरी त्याच्या मनावर काय परिणाम झाला आहे हे त्याच्या शारीरिक अस्वस्थतेतून दिसून येतं. सध्याच्या परिस्थितीमुळे भीती, असुरक्षितता, अगतिकता अशा भावना मुलांच्या मनात असतात. या भावना मुलं शब्दातून, बोलण्यातून व्यक्त करतातच असं नाही पण वेगवेगळ्या शारीरिक कृतीतून त्या व्यक्त होत असतात. जसं की चित्र काढत असताना उगाचच चिरखडत रहाणं , गडद रंगांचा जास्त वापर करणं, सगळं काही शांत वाटत असताना मध्येच एखादी वस्तू हातातून फेकून देणे, त्याच्या आवडीचा खेळ खेळतानाही त्या खेळण्याची जास्त वेळ आदळआपट करणं, जेवताना एकच घास तोंडात धरून ठेवणे अशा अनेक वागणुकीतून तुमचं मूल डिस्टर्ब आहे हे तुम्हाला समजू शकतं. आपलं मुल चाफ्याच्या फुलासारख नाजूक असतं ! ते उमलतं तेव्हाच छान दिसतं, तेव्हाच त्याचा सुगंध सगळ्यांना आकर्षित करतो पण हा चाफा जर रुसला असेल, फुलत नसेल, बोलत नसेल तर मात्र काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे हे समजून घ्या. अशा वेळेला मुलांना बोलतं करा.मुलांना कोरोना बद्दल नक्की कितपत माहिती आहे याचा अंदाज घ्या. कोरोनाबद्दल मुलांना भीती न दाखवता स्वच्छतेच्या चांगल्या सवयी बद्दल त्यांना सांगा. ” मी विसरले तर मला हात धुण्याची आठवण देशील न बाळा ?” अशी गोड जबाबदारी त्यांना द्या‌.

मुलांना मोकळेपणाने बोलू द्या. काही गोष्टी, काही वेगळे विषय काढून त्यांच्याशी बोला. मुलांनी काही प्रश्न विचारले तर ते प्रश्न,  त्यामागची त्यांची चिंता समजून घ्या. “या काळात भीती वाटणे स्वाभाविक आहे बाळा, याच्यात काही चूक नाही” याची जाणीव मुलांना करून द्या आणि माझं तुमच्याकडे पूर्ण लक्ष आहे अशी त्याला खात्री द्या. त्यांचे म्हणणे तुम्ही लक्षपूर्वक ऐकत आहात याची जाणीव त्यांना होऊ द्या.या तणावातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मदत करा. लॉकडाऊन हे खेळण्यासाठी, आई-बाबांबरोबर वेळ घालवण्यासाठी, मजा करण्यासाठी आणि आई-बाबांना आराम मिळावा म्हणून संधी आहे असं त्यांना समजावून सांगा. मुलांना हात धुण्यासाठी प्रवृत्त करतानाच नाहक भीती दाखवू नका. त्यापेक्षा गाणं गाऊन, छोटासा डान्स बसवून किंवा आई-बाबांच्या एकमेकांशी बोलण्यातून मुलांना स्वच्छतेच्या सवयीचे महत्व पटवून द्यायला हवं.

आमच्या शाळेत आम्ही कोरोनाचं गाणं तयार केलं होतं, त्यामध्ये शाळेतल्या मुलांनी आई-बाबांना शिकवलं होतं की कोरोना आहे तर आपण कसं वागायला हवं? त्याचा उत्तम परिणाम असा झाला की आता ती मुलं आई-बाबांना स्वतःहून सांगतात हात धुवा, आम्हाला सॅनिटायझर द्या, मास्क लावल्याशिवाय बाहेर जाऊ नका. या सगळ्या सूचना जेव्हा लहान मुलं आई-वडिलांना द्यायला लागतात, त्या वेळेस समजून घ्यायचं की मुलांनी सकारात्मकतेने हे सगळं स्वीकारलं आहे.  तुम्ही सुद्धा त्यांचे मित्र बनुन, त्यांच्याशी संवाद साधून या सगळ्या विषयाची माहिती त्यांना द्या.

लहान मुलांमधील मानसिक समस्या वेळीच ओळखण्याचे काम पालक आणि शिक्षक दोघांनाही चांगल्या प्रकारे जमू शकतं कारण लहान मुलांच्या सगळ्यात जवळच्या त्या व्यक्ती असतात. आपल्या अंगणातल्या या नाजूक चाफ्याला काही समस्या आहेत का हे कस ओळखायचं? त्यासाठी काही लक्षण सांगते आहे. 

# मुलं शाळेत असताना त्याची एकाग्रता नसणे, लक्ष न लागणे, एका जागी न बसणे आणि मुलाच्या वर्तणुकीबद्दल शाळेतून तक्रारी येणे हे महत्त्वाचे बदल असतात.

# लहान मुलं आपली समस्या स्पष्ट बोलून दाखवू शकत नाही पण त्यांच्या वागण्यातून काहीतरी बिनसल आहे हे आपल्याला समजतं. मूल आक्रमक होत असेल, घरामध्ये रागाचा उद्रेक होत असेल, भांडण करत असेल, वाद घालत असेल तर समजून घ्या की मुलांना काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे.

# नेहमी सगळ्यांमध्ये मिसळणारा मुल आता इतरांमध्ये मिसळत नसेल,  एकट एकट रहात असेल, लहरी वागत असेल तर मात्र हे गांभीर्याने घ्यायला हवं.

आपल्या घरातला मुल आपल सर्वस्व असतं. आपलं मूल जर कोमेजायला लागलं तर आपल्या मनाची अवस्थाही सैरभैर होते म्हणूनच या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष द्यायला हवं. 

उत्तम प्रतीच फुल हव असेल तर त्याला उत्तम प्रतीचे खत द्यावंच लागतं, वेळेवर पाणी घालावं लागतं, मोकळा सूर्यप्रकाश द्यावा लागतो तसच आपल्या मुलाची वाढ हवी असेल तर त्याला आपल्या प्रेमाच खत टाकाव लागेल, वेळोवेळी संस्कारांचं खत पाणी घालावं लागेल, सूर्यप्रकाशाच्या किरणांची ऊब त्याला आपल्या स्पर्शातुन द्यावी लागेल आणि आपल्या शब्दांच्या आधारानेच त्याची मुळं घट्ट करण्यासाठी मदत करावी लागेल नाही का?

तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मुलांच्या स्वभावात होणाऱ्या बदलांसाठी किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये मी काही करू शकेल तर माझ्याशी नक्की बोला. मी खाली माझा मेल आयडी देत आहे त्याच्यावर तुम्ही ई-मेल करू शकता किंवा मला व्हाट्सअप करून तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.

[email protected] | 8329932017 / 9326536524