सर्वात वर

संगीताचा अभ्यास करते आहे- सृष्टी पगारे

बालपण किती निरागस असतं ना! आज ही जी सुट्टी मिळालीये ती अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच. मोठ्यांचं कसं असतं बघा त्यांना कामं असली कि घरी थांबायचं असतं आता सांगितलंय कि घरी बसा तर काम सुचतायत… लहान मुलं मात्र या मिळालेल्या वेळेचा खरंच चांगला उपयोग करतात. आपणही सगळ्यांनी मिळालेल्या वेळाचा जास्तीत जास्त उपयोग करावा हे सुचवतेय सुर नवा ध्यास नवा मध्ये गोड गळ्याची गाजलेली बालगायिका आणि सध्या “स्वामिनी” मालिकेमध्ये पेशवेकालीन थाटात नऊवारी साडीत दुडुदुडु धावणारी बालकलाकार सृष्टी पगारे(Srishti Pagare).

(स्वरदा कुलकर्णी,नाशिक)
स्वामिनी मालिकेत छोटी रमाने तिच्या निरागसपणाने सगळ्यांचच लक्ष वेधलं आहे. लहान असूनही मुंबईमध्ये या शूट निमित्त राहणं, शूटसाठी वेळेवर उपस्थित असणं त्यासाठी सकाळी लवकर उठणं हे सगळं जिद्दीने न कंटाळता करते आहे. यामध्ये ती तिची शाळा, गाण्याची प्रॅक्टीस, शाळेचा अभ्यास, तिच्या मैत्रिणी, आई बाबा तिची मोठी ताई यांच्यासोबत असणं मिस करते. तिला आत्ता जी सुट्टी मिळाली आहे त्यात प्रचंड खुश आहे. एवढ्या दिवसाच्या धावपळीची कसर भरून काढतेय असं म्हणायला हरकत नाही.

सृष्टी म्ह्णते “मी सकाळी उशिरा उठते. सकाळी उठले कि रामायण बघते. माझ्या बाबांनी सांगितलंय कि मिळालेल्या वेळेत काही ना काही नविन करत रहा, शिकत रहा. मग बाबांसोबत बसून मी आणि माझी ताई दिवसभर काय काय करायचं हे ठरवतो. एक गोष्ट रोज दोघी नक्की करतो ते म्हणजे गाण्याचा रियाज. मला गाणं खूप आवडतं. रोजच्या शूटमुळे मला गाण्याच्या अभ्यासाला वेळ मिळतोच असं नाही. माझे बाबा आम्हाला गाणं शिकवतात, गाण्याची तयारी करुन घेतात.

माझा शाळेचा अभ्यास आई घेते. शूट्मध्ये मला वेळ मिळतो तसं मी अभ्यास करते. माझी परिक्षा कॅन्सल झाली असली तरी पुढच्या वर्षीचा अभ्यास आता घरी असल्यावर करते आहे. ऑनलाईन अ‍ॅप डाउनलोड केले आहे त्यामध्ये बघून बघून विषय शिकते आहे जे समजून घ्यायला माझी आई किंवा दीदी मला मदत करतात. मुंबईला असते तेव्हा माझ्या सोसायटीमध्ये राहणार्‍या मैत्रिणींची मला खूप आठवण येते. आम्हाला सुट्टी मिळाली कि आम्ही मनसोक्त खेळायचो. पण आता घराबाहेर पडता येत नाहीय त्यामुळे आम्ही सगळे आपापल्या घराच्या खिडकीमध्ये बाल्कनी मध्ये समोरासमोर येऊन गप्पा मारतो, आज काय खेळायचं हे ठरवतो. अगदी आपापल्या घरात दुकान मांडतो, वस्तू विकायला ठेवतो आणि मजा करतो.

मला पेंटींग करायला खूप आवडते. मी रोज वेळ काढून पेंटींग करते. परवाच आम्ही एग पेंटिंगसुद्धा केले. घरी असल्यावर मी आईकडून खाण्याचे खूप लाड करून घेते आहे. आमच्या स्वामिनी मालिकेत सांगितल्या जाणार्‍या सगळ्या रेसिपी मी आईला करायला सांगते. त्याशिवाय आमच्या आवडीचे पदार्थ आई आमच्यासाठी करते. मी आणि माझी दीदी आईसोबत उभं राहून पदार्थ कशी करतेय हे बघतो आणि यामध्ये आम्हाला जमेल तशी आईला मदत करतो. परवा आम्ही दोघीनी मिळून घरी केक केला होता. असं काहीना काही शिकण्याचा आणि ते करुन पाहण्याचा प्रयत्न करते आहे. मुख्य म्हणजे आईसुद्धा आम्हाला हे सगळं करू देते आहे.

माझे आई, बाबा, दीदी या सगळ्यांसोबत एकत्र असणे मी मुंबईला मिस करायचे. दीदी बरोबर खेळणं, भांडण होणं, मस्ती करणं, रुसवे फ़ुगवे हे सगळं होत असताना आई बाबांनी मध्ये पडून समजवणं, रागवणं यात खूप मजा येते जे मला मुंबईला असताना शक्य होत नाही. मुंबईला असल्यावर मी नाशिकच्या सगळ्या गोष्टींची आठवण येते तर इथे असल्यावर सेटवरच्या सगळ्यांची. रुग्वेदी मावशी (मालिकेतली माझी आई) अगदी माझ्या आईसारखीच माझी काळजी घेते, माझे लाड करते. छोट्या रामचंद्राशी माझी खूप छान गट्टी जमलीय. शूटींगला सुट्टी मिळाल्यापासून आम्ही सगळे एकमेकांना फोन करतो, गप्पा मारतो.

मला शाळेत शिकवलं होतं, दिवसातुन आपल्याला शक्य असेल तेवढ्या वेळा आपण हात धुवायलाच हवा. खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करा. आपल्याला सर्दी खोकला झाला असेल तर आपली काळजी घ्या. आपल्यामुळे इतरांना होणार नाही याचीही काळजी घ्या. पुरेशी झोप घ्या. हे सगळं आपल्याला माहीतच असतं पण आपण नेमकं गरजेचं असते तेव्हा विसरतो. पण कोरोनामुळे आपल्याला कळलं असेल कि आपल्याला असं विसरून चालणार नाही. आपली काळजी घ्यावी लागेल. म्हणजे यापुढे कधी असा कोणताही आजार आपल्याकडे पसरणार नाही. मी माझी काळजी घेते आहे, तुम्हीही घ्या!