सर्वात वर

स्वॉब तपासणी साठी दातार लॅबला जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील

नाशिक – दातार कॅन्सर जेनेटिक्सला (Datar Cancer Genetics) स्वॉब तपासणीसाठी जिल्ह्याधिकाऱ्यानी हिरवा कंदील दाखवला आहे. कोरोनाचे अहवाल दातार लॅब मधून मोठ्याप्रमाणावर पॉझिटिव्ह येत आहेत असे चौकशी अहवालात समोर आल्यामुळे काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या लॅब मधील चाचणी थांबण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी दातार लॅबची मोठी बदनामी झाल्याचे सांगत दातार लॅबने राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांवर ५०० कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवली होती. या सर्व प्रकरणाची राज्यभरात मोठी चर्चा झाली. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार अशी उत्सुकता होती अखेर या सर्व प्रकरणावर पडदा पडला. जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा चौकशी करून दातार लॅबला  स्वॉब तपासणी साठी परवानगी दिली आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आदेश पुढील प्रमाणे 

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकांमध्ये प्रयोगशाळेतील पॉझिटिव्हिटी रेट जास्त येत असल्याच्या चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक व आयुक्त नाशिक महानगरपालिका यांचेकडील प्राप्त अहवालानुसार  सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या लॅब चे कामकाज आयसीएमआर च्या मार्गदर्शक तत्वां प्रमाणे सुरू आहे किंवा कसे हे तपासण्याच्या दृष्टीने दिनांक 27/2/2021 रोजी आदेश जिल्हाधिकारी नाशिक यांनी पारित केले होते. 

त्यानुसार प्रस्तुत प्रकरणात दातार कॅन्सर जेनेटिक यांचेकडून मुद्दे निहाय स्पष्टीकरण दिनांक 1 मार्च 2021 रोजी प्राप्त झाले. त्या स्पष्टीकरणमध्ये दातार कॅन्सर जेनेटिक्स (Datar Cancer Genetics) यांनी प्रस्तुत प्रकरणात तांत्रिक अधिकाऱ्यांसह सदर लॅब ची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करावी अशी विनंती केली व त्यानुसार प्रयोगशाळेचे कामकाज तसेच कोरोना व्यवस्थापनातील सांख्यिकी संदर्भातील कामकाज याची तांत्रिक माहिती असलेल्या अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात येऊन सदर तांत्रिक अधिकाऱ्यांसमवेत लॅब ची पाहणी दिनांक 2 मार्च 2021 रोजी करण्यात आली आहे. 

प्रयोगशाळेचे कामकाज हा तांत्रिक विषय असल्यामुळे या संदर्भात प्राप्त स्पष्टीकरणतील मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी व त्याची योग्यायोग्यता तपासण्यासाठी तसेच तांत्रिक पाहणीचे निष्कर्ष नोंदवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक पथकाचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिनांक 3 मार्च 2021 रोजी प्राप्त झाला आहे. तांत्रिक समितीने त्यांचे अहवालात शिफारशी केल्या आहेत व त्यावर दातार कॅन्सर जेनेटिक्स यांनी कार्यवाही करावी असे तांत्रिक अहवालात नमूद केलेले आहे.  तसेच प्रयोगशाळा सुरू करण्यास अनुकूलता दर्शवली आहे. 

तांत्रिक समितीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी दातार कॅन्सर जेनेटिक्स यांच्याकडे पाठवण्यात आला आहे व स्वाब स्वीकृती व तपासणीचे कामकाज सुरू करणे बाबत त्यांना अनुमती देण्यात आली आहे. 
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक