सर्वात वर

Coronavirus Vaccine : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण

महाराष्ट्राला मिळाले ९ लाख ६३ हजार डोसेस (Coronavirus Vaccine)५११ ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज  

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची (Coronavirus Vaccine) जय्यत तयारी सुरु असून आज पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट कडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोसेस प्राप्त झाले आहेत.केंद्रसरकारच्या सूचनेनुसार या लसीचे  जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे.राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या केंद्रावर वीज पुरवठा  इंटरनेट सह  वेबकास्टची सुविधा करण्यात आल्या आहेत.लसीकरणासाठी प्राधान्य क्रमानुसार गट ठरविण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी (हेल्थ केअर वर्कर्स) यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

राज्यात आतापर्यंत पोर्टलवर ७ लाख ८४ हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून आज मंगळवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे.राज्यात ३१३५ शितसाखळी केंद्र उपलब्ध आहेत,केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर कोरोना लसीकरणासाठी (Coronavirus Vaccine) तज्ज्ञांचा गट स्थापन केला असून त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे.

फ्रंट लाईन वर्कर्समध्ये राज्य व केंद्रीय पोलिस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, म्युनिसिपल वर्कर्स आदीचा समावेश करण्यात आला आहे.तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील सर्व व्यक्ती व ज्यांना अन्य आजार व्याधी आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश आहे.

लसीकरणासाठी जिल्हानिहाय केंद्रांची संख्या(Coronavirus Vaccine)

अहमदनगर-२१, अकोला-५, अमरावती-९, औरंगाबाद-१८, बीड-९, भंडारा-५, बुलडाणा-१०, चंद्रपूर-११, धुळे-७, गडचिरोली-७, गोंदिया-६, हिंगोली-४, जळगाव-१३, जालना-८, कोल्हापूर-२०, लातूर-११, मुंबई-७२, नागपूर-२२, नांदेड-९, नंदूरबार-७, नाशिक-२३, उस्मानाबाद-५, पालघर-८, परभणी-५, पुणे-५५, रायगड-७, रत्नागिरी-9, सांगली-१७, सातारा-१६, सिंधूदुर्ग-६, सोलापूर-१९, ठाणे-४२, वर्धा-११, वाशिम-५, यवतमाळ-९ असे एकूण ५११ केंद्र आहेत.

हे ५११ केंद्र राज्यातील आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, महापालिका रुग्णालय याठिकाणी होणार असून त्यामध्ये ११९ ग्रामीण रुग्णालय, ८३ उपजिल्हा रुग्णालय, ६९ वैद्यकीय महाविद्यालय, ५९ नागरी आरोग्य केंद्र, ४३ महापालिका रुग्णालय, २३ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३ खासगी रुग्णालय, २२ जिल्हा रुग्णालय, २२ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ८ सामान्य रुग्णालय, ७ महापालिका रुग्णालय, ४ महिला रुग्णालय अशाप्रकारे ५११ लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आली आहेत.