सर्वात वर

‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून “या” शहरांना इशारा

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काय सूचना दिल्या आहेत ?  

मुंबई – दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आता चक्रीवादळात(Cyclone Tauktae) रुपांतर झालं आहे. १५ ते १७ तारखेला कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काल रात्री पासून काही भागात पावसाला  सुरुवात झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्हय़ाला पावसाने झोडपून काढले आहे तर  कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह बेफाम पाऊस कोसळला. वादळाचा जास्त तडाखा, रत्नागिरी-सिंधदुर्गाला बसण्याचा हवामान तज्ञांचा इशारा आहे. वादळाला तोंड देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सर्व तयारी केली असून मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.सध्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ (Cyclone Tauktae) गुजरातच्या किनारपट्टीकडे जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ते समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ असेल. परिणामी किनारपट्टीच्या भागात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

हवामान खात्याने  सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. या काळात येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.या स्थितीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्रात जाऊ नये, असे निर्देश देण्यात आल्याचे प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी सांगितले.

भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील ५ दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला असून  १५ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १६ मे रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे तर १७ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

या मोसमातील  हे या परिसरातलं पहिलं चक्रीवादळ आहे. त्याला ‘तौत्के’ (Cyclone Tauktae) हे नाव देण्यात आले आहे.  म्यानमारने सुचवलेलं हे नाव आहे.‘तौत्के’चा अर्थ सरडा असा होतो.  

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काय सूचना दिल्या आहेत ?  

चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) पार्श्वभूमीवर मुंबई महानगर  पालिकेने सतर्कता म्हणून जम्बो कोविड सेंटरच्या अतिदक्षता विभागातील जवळपास ३९५ रुग्णांना पालिका व राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.  

जम्बो कोविड सेंटरच्या  परिसरातील धोकादायक ठरू शकणाऱ्या वृक्षांची छाटणी करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त  इतर ठिकाणच्या धोकादायक झाडांचीही छाटणी करण्यात येत आहे.  

 सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्याचबरोबर विभागातील तात्पुरत्या निवाऱ्याची ठिकाणे स्वच्छ करुन सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.