सर्वात वर

देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता

‘तौत्के’चक्रीवादळामुळे (Cyclone Tautke) झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का.) –  ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या (Cyclone Tautke) फटक्यामुळे देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे दोन बोटी वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम, रा. गढीताम्हणे, ता. देवगड या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दिनानाथ जोशी रा. पावस, रत्नागिरी, नंदकुमार नार्वेकर रा. कोल्हापूर, प्रकाश गिरीद, रा. राजापूर, रत्नागिरी हे बेपत्ता आहेत. तर जानू यशवंत डोर्लेकर, रा.रत्नागिरी, विलास सुरेश राघव, रा. पुरळ – कळंबई, ता. देवगड, सूर्यकांत सायाजी सावंत, रा. हुंबरठ, ता. कणकवली हे सुखरूप बाहेर आले आहेत.

काल दुपारी 3.30 वा. सुमारास आनंदवाडी बंदर येथे रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून जाऊ लागली. त्यामुळे रुक्मिणी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी, निरज यशवंत कोयंडे यांची, आरची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटी जवळ नेण्यात येत होती. पण, वादळी वाऱ्यामुळे आरची बोटीवरील खलाशांचे नियंत्रण सुटून दोन्ही मच्छिमार बोटी लगतच्या मौजे पालये किनाऱ्यावरील खडकावर आदळल्या.

त्यानंतर दोन्ही बोटीवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण 7 खलाशी होते. यापैकी तीन खलाशी सुखरूप बाहेर आले. तर चार खलाशी वाहून गेले. यापैकी एका खलाशाचा मृतदेह आज सकाळी देवगड मळई येथील खाडीमध्ये आढळून आला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे अशी माहिती देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे. या दुर्घटनेनंतर उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांनी बचावलेल्या खलांशांची भेट घेतली.

” तौत्के” चक्रीवादळामुळे(Cyclone Tautke) झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

अलिबाग,जि.रायगड(जिमाका):- ” ‘तौत्के’ ” चक्रीवादळाचा (Cyclone Tautke) प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर  जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे.

या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी  9.00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 839 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू व दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

(Cyclone Tautke) तालुकानिहाय सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

अलिबागमध्ये 22 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 24 मि.मी. असून, 156 कुटुंबातील 605 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पेणमधील एका घराचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 8 मि.मी. असून, 62 कुटुंबातील 193 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

मुरुड तालुक्यातील 5 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 32 मि.मी. इतके आहे. 306 कुटुंबातील 1 हजार 67 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पनवेल तालुक्यातील 20 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 11. 50 मि.मी. इतके असून, 168 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

उरण तालुक्यात एका घराचे अंशतः नुकसान झाले असून, 1 व्यक्ती व 1 प्राण्याचा मृत्यू झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 27 मि.मी. आहे. 122 कुटुंबातील 451 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यातील 17 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 7.80 मि.मी. इतके असून,  48 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

खालापूर तालुक्यातील 91 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 12 मि.मी. इतके असून, 670 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

 माणगाव तालुक्यातील 27 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 17 मि.मी. इतके असून, 291 कुटुंबातील 1 हजार 309 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

रोहा तालुक्यातील 10 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 19 मि.मी. इतके असून, 100 कुटुंबातील 523 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

सुधागड तालुक्यातील 20 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 26 मि.मी. इतके असून असून, 45 कुटुंबातील 185 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

 तळा तालुक्यातील 23 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, एका घराचे पूर्णत: नुकसान झाले आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 21 मि.मी. असून 36 कुटुंबातील 135 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

महाड तालुक्यातील 38 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 23 मि.मी. इतकी असून, 195 कुटुंबातील 1 हजार 80 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पोलादपूर तालुक्यातील 96 घरांचे अंशत: नुकसान झाले असून 1 व्यक्ती जखमी झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 41 मि.मी. इतके असून, 81 कुटुंबातील 295 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

 म्हसळा तालुक्यातील 204 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 44 मि.मी. इतके असून, 134 कुटुंबातील 496 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील 335 घरांचे अंशतः नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 48 मि.मी. इतके असून, 761 कुटुंबातील 1 हजार 158 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.