सर्वात वर

नाशिकच्या खासगी हॉस्पिटमध्ये कोरोना उपचार बंद

हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला निर्णय : मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना पाठवले पत्र    

नाशिक- नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्याच्या खाली आला आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने खासगी रुग्णालयातील कोविड कक्ष बंद करण्याचा निर्णय (Corona Treatment) हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. तसेच निवेदनही असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. या निर्णयाने यापुढे खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल केले जाणार नाहीत असे हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने तर्फे आपल्या निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट प्रचंड मोठी होती या लाटेत रुग्ण संख्या हि तिप्पट झाली होती अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे सरकारी यंत्रणा अपुरी पडू लागली. या रुग्णांना उपचार मिळावेेत, याकरीता खासगी रुग्णालयांमध्ये कोविड वॉर्ड (Corona Treatment) तयार करण्यात येऊन शासन निर्देशानुसार ८० टक्के बेड राखीव करण्यात आले. कोरोना नियंत्रणासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात आली. तसेच खासगी रुग्णालयातील बेडही आरक्षित करण्यात आले. सरकारी रुग्णालये तसेच महापालिका रुग्णालयांची एकूणच क्षमता बघता खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्यात आली. परंतू आता कोरोना रुग्णसंख्याही आटोक्यात येत आहे. प्रशासनाने निर्बंधही शिथिल केले आहेत. महापालिकेची कोविड सेंटरही आता रिकामी झाली आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता सध्याची परिस्थिती हाताळणे सरकारी रुग्णालयांना शक्य आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील कोविड कक्ष बंद करण्याचा निर्णय हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.

याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षांपासून कोरोना आजाराला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शासन स्तरावरून दिलेल्या सूचनांनुसार सर्व खासगी रुग्णालयांनी सेवा दिली. आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्याची रुग्णसंख्या पाहता शासकीय व निमशासकीय आरोग्य यंत्रणांना आरोग्यसेवा बजावणे सहज शक्य आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील कोविड कक्ष (Corona Treatment) आता बंद करत आहोत. भविष्यात गरज पडल्यास पुन्हा सेवा देऊ, असेही असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, सचिव डॉ. सचिन देवरे, उपाध्यक्ष डॉ. राज नगरकर, डॉ. समीर आहीरे आदींसह पदाधिकार्‍यांनी सांगितले.

निवेदन