सर्वात वर

दिवाळी आकाशाच्या नक्षत्रांची

बातमीच्या वर

डाॅ स्वाती गानू टोकेकर 

दिवाळी आकाशाच्या नक्षत्रांची पणत्या निरांजनाच्या प्रकाशाची  लक्ष दिव्यांनी उजळणाऱ्या आशेची  मनातील साऱ्या इच्छांच्या पूर्ततेची ‘

दिवाळीचे पाच दिवस आपण सगळे जण त्यांच्या वैशिष्टयपूर्ण पद्धतीने साजरे करणार. दुष्ट प्रवृत्तींवर सुष्ट वृत्तीचा विजय होईल. वसुबारसला गाय -वासरू  ह्यांची पूजा होईल. गोधनाप्रती केलेली ही कृतज्ञता पूजाच असेल. धनत्रयोदशीला ‘धन्वंतरीचे’ पूजन होईल . नरकचतुर्दशीला दीपावलीच्या मंगल पर्वाची सुरुवात होईल. अश्विनवद्यअमावस्येला लहानथोर, साऱ्यांच्या घरात , दुकानात , ऑफिसात , पेढ्यांवर घरातलं सोनं, नाणं, रोकड, आरोग्यलक्ष्मीची पूजा होईल. फटाक्यांची अतिशबाजी होईल. साडेतीन मुहुर्तातल्या एका सुयोगाला अर्थात पाडव्याला नवीन गोष्टींचा शुभारंभ होईल. यमद्वितीयेला भाऊबीजेतून भावाबहिणीच्या उत्कट प्रेमाची साक्ष पटेल. अशा ह्या आनंदोत्सवात सारेजण हिरीरीने सहभागी होतात कारण उत्सवांची महाराणी असणाऱ्या दिवाळीचं हे वर्षानुवर्षांपासून चालत येणारं मोहक रूप आहे.    

सहज मनात विचार आला की दिवाळी थोडी वेगळ्या प्रकारेही साजरी करता येईल नाही का? नकारात्मक विचारांच्या अंधारावर सकारात्मक विचारांचा विजय प्राप्त करता येतो हे शिकवणारी दिवाळी फक्त गोडधोड मिष्टान्नावर ताव मारून आणि कानठळ्या बसवणारे फटाके फोडून साजरी करायला हवी असे नाही. सगळ्या वातावरणाला धूर आणि वासाने प्रदूषित करण्यापेक्षा काहीजण साजरी करताहेत ‘ग्रीन दिवाळी ‘ . पर्यावरणाला पूरक अशी ही दिवाळी सेलिब्रेट करताना इलेक्ट्रिक दिव्यांपेक्षा ‘पणत्या ‘ वापरण्यावर त्यांचा भर आहे. त्यातून वीज तर वाचेलच शिवाय पणत्यांच्या प्रकाशाचं विलक्षण सौंदर्य अनुभवता येईल आणि हे नक्कीच पटण्यासारखं आहे. आनंद घेणं याचा अर्थ भरमसाट फटाके उडवून अक्षरशः पैशांचा धूर उडवणं हे शहाणपणाचं कसं ठरू शकेल कारण फटाक्यांच्या आवाजाने आणि धुराने लहान मुलं , वयोवृद्ध आणि प्राण्यांना त्रास होतोय. ‘इकोफ्रेंडली दिवाळी ‘ साजरी करताना जबाबदार नागरिकाचं कर्तव्य करणं हे त्यांना जास्त महत्वाचं वाटतं. या विचारप्रवाहाचाही आदर व्हायला हवा.

दिवाळी सेलिब्रेशन थोडं वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी पाच महत्वाच्या गोष्टी आम्ही करणार आहोत असं एका यंगस्टरनच्या ग्रुपने सांगितलं तेव्हा त्या विचारात जाणवत होती वैचारिक बदलाची नांदी. कारण त्यांची पहिली स्टेप होती स्वयंपाकघरातला प्रवेश. जिथे घरातली स्त्री स्वादिष्ट स्वयंपाक करते तिथे तिला छोट्या छोट्या कामात मदत करणं. त्यातून त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर फुलणार आहे एक प्रसन्न स्मित हास्य . दुसरी पायरी होती बाजारात जाऊन ताजी फुलं आणून फ्लॉवरपॉटमध्ये सजवायची . घराला नववधूसारखं सजवायचं . कारण ते आमचंही घर आहे. तिसरा विचार होता या सुट्टीत कॉफी करून वडिलांना द्यायची आणि काम नसतानाही सहज म्हणून त्यांच्याशी गप्पा मारायच्या . आम्ही बहुतेक वेळेला आमच्या फ्रेंड्सबरोबर नाहीतर पैसे कमवण्यात बिझी असतो . फार क्वचित पॅरेनट्सशी मोकळेपणाने बोलायला वेळ मिळतो . मुद्दाम फॅमिलीमेंबर्स आणि नातेवाईकांना बोलवायचंय कारण रोजच्या फास्ट पेसच्या आयुष्यात त्यांच्याशी बोलायलाही वेळ मिळत नाही. आम्ही त्यांना ‘मिस’ करतोय हे सांगायचं असंही  ठरवलंय हा विचारही सुखावह वाटला. 

आम्हाला वाटतंय दिवाळीचा आनंद लुटताना तो द्विगुणितही करावा. आपण फटाके विकत आणतो त्यात कितीतरी पैसे खर्च करतो पण ज्यांना साधा एक फटाकाही विकत घेता येत नाही त्यांच्यासाठी नवे  कपडे विकत घेऊन दिले तर त्यांनाही आनंद मिळेल. आम्हाला किमान एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करता येईल.’नुसतं एकाने करून काय होणार’ असं वाटणाऱ्या लोकांना हे समजून घेता येईल की जसा एका दिव्याने दुसरा दिवा लागतो आणि आसमंत उजळू शकतो तसाच दृष्टिकोन माणसाला आनंद  देण्याच्या बाबतीत ह्या ग्रुपचा आहे.    

लास्ट बट नॉट लीस्ट अतिशय महत्वाचा विचार आणि कृती म्हणजे ‘फटाक्यांपासून मुक्त दिवाळी’ हा विचार प्रस्तुत करणं. किमान 5 व्यक्तींनी तरी ह्या विचारांची कास धरावी असा आग्रह धरणे. ह्या तरुण मुलांच्या ग्रुपचा दिवाळी साजरा करण्याचा हा साधासाच पण क्रांतिकारक विचार नक्कीच कौतुकास्पद आहे.

काही घरात दिवाळीच्या निमित्ताने असणाऱ्या सुट्टीत संपूर्ण कुटुंब पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याच्या वर्षानुवर्षाच्या रितीला पूर्णपणे बाजूला सारून निसर्गाच्या सहवासात राहावं असा विचार करताहेत. ट्रीपला देशात किंवा परदेशात जाण्याचीही पद्धत आता दिसतेय . आवाज, प्रदूषण, पैशाचा अपव्यय यापेक्षा प्रसन्न , शांत ठिकाणी जाऊन कुटुंबातील आपल्या लोकांबरोबर चांगला वेळ व्यतीत करावा असाही कल सध्या जाणवतोय. काही जणांना या मोकळ्या वेळात नात्याला दृढ करण्याची खूप छान संधी आपल्याला मिळते असंही वाटतं. 

 
सणांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे तो म्हणजे सामाजिक बांधिलकीचा. ज्या घराने घरातल्या सदस्यांना जीवन जगण्यासाठी  काही मूल्ये दिली आहेत आणि  ती मूल्ये आपल्या वागण्यातून , विचारातून पुढच्या पिढीत  रुजत जावी यासाठी अशा व्यक्ती, अशी माणसं , कुटुंब ह्या दिवाळीचा आनंद वेगळ्या पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचवताहेत . जिथे अनाथालयात पोरकी मुलं आहेत, वृद्धाश्रमात मुलांशिवायचे पोरके असलेले आई वडील आहेत, कॅन्सर, एडस् सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असणारे दुर्दैवी लोक आहेत, गरीब , अंध , अपंग , बेरोजगार आहेत अशा संस्थेमध्ये जाऊन ही माणसे नवे कपडे, मिठाई नेऊन देतात.काही जागरूक पालक मुलांना कुंभारवाड्यात बनवल्या जाणाऱ्या पणत्या कशा तयार होतात ते पाहायला घेऊन जाताहेत . काही ठिकाणी खास मुलांसाठी किल्ले बनवणं , उटणं तयार करणं , रांगोळ्या काढणं , आकाशकंदिल तयार करणं ह्या गोष्टी शिकवणाऱ्या कार्यशाळा भरवल्या जातात . तर काही ठिकाणी ‘एक करंजी मोलाची ‘ ह्या सारखे गरीबांना फराळ मिळावा म्हणून अनोखे उपक्रम राबवले जाताहेत . घरच्या स्त्रीला या वर्षी चेंज मिळावा, थोडा आराम मिळावा म्हणून काही कुटुंबात बाजारातून फराळ विकत आणला जातोय.

दिवाळीचा सण भारतात सर्वत्र आनंदाने साजरा होतो पण त्यातही प्रत्येक राज्याचं काही वेगळेपण असतच. राम अयोध्येला पुन्हा परतले ते ह्याच काळात या मुळे उत्तर प्रदेशातही दिवाळीला विशेष महत्व  प्राप्त झाले आहे. पंजाब, हिमाचलप्रदेश, बिहारमध्ये दिवाळीची सुरुवात दसऱ्याच्या   रामलीलेपासूनच  होते. तिथे लक्ष्मीपूजनाच्या वेळी दुधाने भरलेल्या ग्लासमध्ये चांदीचं  नाणं टाकून त्या दुधाचं शिंपण घराला केलं जातं. पूर्व भारतात घर प्रकाशाने उजळून दरवाजे मुद्दाम उघडे ठेवतात जेणेकरून लक्ष्मीने घरात प्रवेश करावा . पश्चिम बंगाल , ओरिसात पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दीपावली साजरी केली जाते. गुजरातेत रात्रभर तुपाचा दिवा लावून ठेवण्याची पद्धत आहे आणि त्यातून तयार झालेलं काजळ डोळ्यात घालतात. दक्षिणेकडे तांदळाच्या ओल्या पिठाने अप्रतिम रांगोळी घालतात. आंध्रात हरिकथेचा नृत्य पदन्यास तसंच सत्यभामासाठी विशेष प्रार्थना म्हटल्या जातात. संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात वैशिष्ट्यपूर्ण पद्धतींनी दिवाळी साजरी होते पण त्यामागचा हेतू असतो फक्त आनंदाचा.

दिवाळीसारखे मंगल सण साजरे करण्याची पद्धत हळूहळू बदलतेय. विचारात, मानसिकतेत, आणि कृतीत बदल होतोय. तरीही हे नक्कीच की या सण उत्सव साजरं करण्यात मनात एकच विचार असतो. घरातलं, मनातलं, नात्यातलं अज्ञान , गैरसमज , राग, तिरस्कार , ईर्ष्या दूर व्हावी आणि एक हर्षोउल्हासाचं , सुखाचं , चैतन्याचं वातावरण निर्माण व्हावं. प्रेमाने नाती दृढ व्हावीत.ज्या दिवाळीला विष्णूने लक्ष्मीच्या केलेल्या मुक्ततेची, कृष्णाने नरकासुराच्या केलेल्या वधाची , पांडवांच्या पुनरागमनाची , रामाच्या तेजस्वी विजयाची , विक्रमादित्याच्या राज्याभिषेकाची लखलखती परंपरा आहे ती दिवाळी जर असे बदल घेऊन येत असेल तर हे शुभसूचक ठरणारं आहे.

ज्या भारतात वेगवेगळ्या जातीधर्माचे , वंश वर्गाचे , भाषा-संस्कृतीचे लक्षावधी लोक राहतात अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाच्या लोकांच्या जीवनात ही दिवाळी भविष्याची आश्वासकता देते. पुढे नक्कीच काही चांगले घडेल अशा विश्वास देते. छोटीशी पणती असली तरी तिचा हळूवार प्रकाश वाट दाखवतो आणि पुढे चालत राहण्यासाठी आयुष्यात तेवढाही प्रकाश पुरेसा असतो हे सांगते दिवाळी. एका दिव्याच्या ज्योतीने दुसरी ज्योत पेटवता येते. जशी दिव्यांची आवली तयार करते दीपावली तसंच विविध पद्धतीने दिवाळी साजरी करतानाही त्यात सकारात्मक विचारांची एक देदीप्यमान प्रकाश रेषा सर्वांना एकत्र घेऊन जात असते म्हणून तिचे स्वागत करायलाच हवे.

Swati-Tokekar
डाॅ स्वाती गानू टोकेकर 
बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली