सर्वात वर

“जनस्थान कलारंग “च्या मैफिलीत ज्ञानेश्वर कासार यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध…

नाशिक – कलाकारांनी , कलाकारांसाठी तयार केलेल्या जनस्थान या व्हाट्सअप ग्रुपची “जनस्थान कलारंग”(Janasthan Kalarang) ही एक अभिनव संकल्पना आहे. नवीन संकल्पना असली तरी तिला पहिल्या दिवसापासूनच खूप छान प्रतिसाद मिळतो आहे.या शुक्रवारी जनस्थान कलारंग मध्ये गायक व संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवलेल्या ज्ञानेश्वर कासार (Dnyaneshwar Kasar) यांच्या गायनाचा आनंद रसिकांनी लुटला.

संगीत विशारद आणि संगीत भूषण या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या ज्ञानेश्वरने मैफिल देखील अतिशय उत्तम सजवली व रसिकांची वाहवा मिळवली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून कलारंगचा शुभारंभ “जयोस्तुते” या गीताने झाला. मराठी मनाला भुरळ घालणाऱ्या आणि संसारात राहून मानवाला अध्यात्माची अनुभूती देणाऱ्या अभंगाशिवाय गाण्याची मैफिल पूर्ण होत नाही. ज्ञानेश्वरने “राजस सुकुमार” हा अभंग सादर केला. सांज वेळी मनाला लागणारी एक अनामिक हुरहुर “सांज ढले गगन तले” या गाण्यातून प्रत्येकाच्या मनात पोहोचवली तर “अनंता तुला कोण पाहू शके” या गीतातून जगनियंत्या परमेश्वराचं अस्तित्व जाणवून दिलं.

“सुरमई अखीयों में” या गाण्याने मैफिलीचा समारोप झाला.या मैफिलीत आदित्य कुलकर्णी यांनी तबल्यावर साथसंगत केली पुढच्या शुक्रवारी पुन्हा एकदा भेटण्याची ओढ सगळ्यांनी व्यक्त केली व जनस्थान कलारंगची मैफिल (Janasthan Kalarang) संपन्न झाली.