सर्वात वर

कुटूंबासोबत मिळालेला हा वेळ माझ्यासाठी खुप महत्वाचा – अमेय बर्वे

आयुष्यात काही क्षण येतात जेव्हा परिस्थिती आपण थांबावे असं आपल्याला सुचवत असते. कारण ती वेळेची गरज असते. आता आपल्यावर असते कि आपण ह्या क्षणभराच्या विश्रांतीकडे कसं बघतोय. अर्थात आपण हा वेळ आपल्यातल्या चांगल्या व्हर्जनला बाहेर काढण्यासाठी जरूर वापरतो. असंच काहीसं सांगतोय आजचा आपला सेलीब्रिटी ज्याला नुकतंच आपण जीव झाला येडापिसा, सहकुटुंब सहपरिवार या मालिकांमधून पाहिलय. गोंडस चेहर्‍याचा अमेय बर्वे (Ameya Barve). जाणून घेऊयात या कोरोंटाईन मध्ये तो नक्की काय करतोय…  

(स्वरदा कुलकर्णी,नाशिक)

आई, बाबा आणि मी इतकं छान समीकरण जमल्यावर आयुष्यात अजुन काय हवं? घरात असणं, आई बाबांना वेळ देणं मी मनापसून एन्जॉय करतोय. अर्थात कोरोनासारखी वैश्विक महामारी हे निमित्त मात्र नक्कीच नसावं. कारण कामानिमित्त मुंबईमध्ये अनेक वर्ष राहिल्यावर, या क्षेत्रात स्ट्रगल केलाय, त्यात आता मनासारखं काम मिळावं इतकं छान आयुष्य सुरु आहे. माझी नविन सिरियल सुरु होऊन काहिच दिवस झाले. या नव्या भुमिकेतून लोकांपर्यंत पोहोचू लागलोय. आणि त्यात आमची मालिका एका रंजक वळणावर आली असताना पुढे काय होणार याची प्रेक्षक वाट बघत असताना घेतलेली क्षणभर विश्रांती. 

मुंबईत माझे शेड्युल असे नसते. शिफ़्टप्रमाणे सगळं रुटीन सेट होत जाते. अश्यात सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे स्वत:ची काळजी घेणं. स्वत:चा स्वयंपाक करणं. ज्याबाबतीत मी (Ameya Barve) एकदम तयार झालो. म्हणतात ना, परिस्थिती माणसाला शिकवते, तयार करते. शूटींगमध्ये वेळ मिळाला कि आम्ही सगळे वाचन करतो. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो. आमच्या सिरियलमध्ये सुनील बर्वे, नंदिता पाटकर, किशोरी अंबिये अशी अभिनयातली दिग्गज मंडळी आहेत. त्यांच्याकडून शिकायला भरपुर मिळते, आम्हाला अनेकदा संभाळून घेतात. मी नाशिकचा आणि बाकीचे वेगवेगळ्या शहरातून आलेले असे सगळे सिरियलमध्ये एकत्र आहोत. त्यामुळे आमच्या सिरियलमध्ये असलेले मुंबईचे कलाकार आमचे खूप लाड करतात. घरून चमचमीत पदार्थ घरून बनवलेले सेटवर आणतात. अशी सेटवरची मजा मिस करतो.

घरी आल्यापासून आईच्या कामात मदत करणं, बाबांशी गप्पा मारणं यात दिवस मजेत जातो. मला बाहेर फ़िरायला, ट्रेकिंग करायला खुप आवडते. सध्या बाहेर पडणे शक्यच नसल्यामुळे मी घरीच रमतो. वेगवेगळ्या वेबसिरिज बघणे, गेम्स खेळणे, वाचन करणं या गोष्टी मला आवडतात. सोसायटीतले मित्र सगळे एकत्र जमून पुर्वी खेळायचो तसं खेळतो. मी जवळपास ७-८ वर्षापुर्वी तबला वाजवायला शिकलो होतो, त्यानंतर मात्र जमलेच नाही. आता वेळ मिळाल्यावर प्रॅक्टीस पुन्हा सुरु केली. आमची शेती आहे आणि शेतातुन गहू नुकताच काढला गेलाय. दुपारच्या वेळात बसून बाबांसोबत गहू निवडण्याचे काम करतो. कारण एरवी कधी घरी आल्यावर घरात थांबत नसतो, मित्रांना भेटायला बाहेर पडतो, त्यामुळे आई बाबांना वेळ देता येत नाही.

कुटूंबासोबत मिळालेला हा वेळ माझ्यासाठी खुप महत्वाचा असतो. संध्याकाळचा वेळ मी खास माझ्यासाठी राखुन ठेवलाय. मी पार्किंगमध्ये माझ्या गाडीत जाऊन शांतपणे बसतो. माझ्या आवडीचं संगीत लावतो त्यासोबत एखादे पुस्तक वाचतो. संध्याकाळी माझ्या सेटवरच्या मित्रांसोबत सगळे मित्र व्हिडिओ कॉल वर भेटतो आणि आवडलेल्या कथांचं, पुस्तकांचं वाचन करतो. म्हणजे आमच्यातला एकजण वाचतो आणि बाकीचे ऐकतात.

घराबाहेर अजिबात पडू नका, आपली व आपल्या घरच्यांची काळजी घ्या हे सगळं तर सगळ्यांना आवर्जून सांगेनच मी, पण त्याबरोबरच हेसुद्धा सांगेन की आत्ता कोरोना आहे, सरकार ने सांगितलंय म्हणुन मी हे सगळं पाळतो आहे असं मनात अजिबात आणू नका. वैयक्तिक स्वच्छता, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे यापुढच्या काळातही पाळणे गरजेचे आहे. तेव्हा ही एक चांगली सवय यानिमित्ताने आपल्यातल्या प्रत्येकाला लागते आहे याचा विचार करा. म्हणजे यापुढे अशी कोणतीही गोष्ट आपल्याला घरी बसायला भाग पाडणार नाही!