सर्वात वर

ऑनलाइन माध्यमातून रसिकांनी अनुभवली दिवाळी पहाट

बातमीच्या वर

‘नृत्यधारा’ : रचना ट्रस्ट आणि कलानंद कथक नृत्य संस्था, अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी व किर्ती कलामंदिर संयुक्त विद्यमाने आयोजन 

नाशिक- रचना ट्रस्ट आणि कलानंद कथक नृत्य संस्था, अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी व किर्ती कलामंदिर संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट २०२० ‘नृत्यधारा’ पुष्प १२ वे आज गुंफले गेले. कोरोनाच्या सावटाखालीही हे पुष्प गुंफून गेली ११ वर्षे सातत्याने होणाऱ्या नृत्य महोत्सवात कोणताही खंड पडू न देता नेहमीप्रमाणे हा महोत्सव पार पडला. फरक इतकाच की प्रेक्षक रचना ट्रस्ट पर्यंत न येता यंदा हा महोत्सव प्रेक्षकांच्या घरोघरी इलेक्ट्राॅनिक डिव्हाईस वर पोहोचला व नेहमीपेक्षा अधिक रसिकांनी त्याचा आनंद लुटला. कार्यक्रम प्रत्यक्ष पहाण्याचा आनंद काही आगळाच असला तरी हे वेगळेपणही कोरोनाला नमवून आयोजकांना व प्रेक्षकांना काहीसे सुखावून गेलेच.

यंदाचे वर्ष कलानंदच्या संकल्पनेने सादर केले गेले. आजच्या कार्यक्रमात कलानंदच्या विद्यार्थिनींनी प्रथेनुसार दीपनृत्य, ताल धमार सादर केला व सुमुखी अथनी यांनी मीरा भजनाने पहाट खुलवली. तर अभिजातच्या विद्यार्थिनींनी ताल रूपक व विद्या देशपांडे यांनी कबीराच्या भजनाने दिवाळी पहाट फुलवली. किर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींच्या ताल तीनतालने व अदिती पानसेंच्या राम भजनाने दिवाळी पहाट बहरली. कार्यक्रमाचे निवेदन सौ.रेखा नाडगौडा यांनी केले.

कार्यक्रमाच्या अंती दरवर्षी तिन्ही संस्थाची एकत्रीत सादर होणारी भैरवी पहाण्यास मात्र पेक्षक मुकले व त्यामुळे कलावंतही काहीसे हिरमुसले हे जरी खरे असले तरी यावर हे दोघेही लवकरच मात करतील याची चाहूल कोरोनाला जरूर लागली असणार.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली