सर्वात वर

फ्युचर प्लानस फॉर युवर पॅरेन्टस्

डाॅ स्वाती गानू टोकेकर  

सकाळी वॉकला जाताना साठीच्या घरातल्या दोन स्त्रियांचा संवाद कानी पडला ‘ मी माझ्या नातवाच्या शिक्षणासाठी एक इनव्हेस्टमेंट प्लान घेतलाय.माझ्या पेन्शनमधून त्याचा इयरली हप्ता मी भरते असं त्यांच्यापैकी सबनीस काकू कौतुकाने सांगत होत्या.त्यांच्या मैत्रिणीने ते नीट ऐकून घेतलं.आणि नंतर  त्या म्हणाल्या  ‘ अग पण तुझा नातू तर फक्त आठ वर्षांचा आहे नं ? मग आत्तापासून कशासाठी हे ? त्याचे आईवडील म्हणजे तुझा मुलगा, सून करतील की सोय .तशा त्या काकू म्हणाल्या,अग त्याला सोनंचांदी किंवा दुसरं काही गिफ्ट देण्यापेक्षा मला अशी काही भेट द्यावी असं वाटलं तर त्यात काय चूक आहे? ते ऐकल्यावर मैत्रीण हसली आणि म्हणाली, रागावू नकोस पण मनात आलं. आपण आईवडील म्हणून किती विचार करतो नाही. मुलांचा,त्यांच्या मुलांचा,त्यांना मदत करतो,त्यांची मुलं सांभाळतो,नातवंडांच्या फ्युचर प्लान्ससाठीही तजवीज करतो.पण कधी मुलांना असं वाटतं का की आपण आपल्या आईवडिलांसाठी काही फ्युचर प्लान्स करायला हवेत.

ते ऐकल्यावर मात्र सबनीस काकू म्हणाल्या ,अग खरंच माझ्या मनात  हा विचार कधी आलाच नाही. हे खरंय की आपण मुलांसाठी बरंच करतो.त्यांना आपल्या मृत्यूनंतर आपले पैसे, प्राॅपर्टी त्यांना मिळेल ,उपयोगी पडेल म्हणून किती सेव्हिंग करतो. पैसे जपून वापरतो. आपल्या बॅकेच्या खात्यात ,फिक्स डिपाॅझिटमध्ये,म्युचअल फंड,इनव्हेस्टमेंट प्लान अशा सगळ्यांमध्ये त्यांना नाॅमिनी करतो.पण आपल्या भविष्याच्या प्लान्ससाठी मुलांनी काही केल्याचं आठवत नाही . हा प्रश्न तुम्हाला अजब वाटेल पण खरंच मुलं असा विचार करतात का? काही मुलं आपल्या आईवडिलांचा सांभाळ करतात.काहीजण महिन्याला ठराविक रक्कम पालकांसाठी पाठवतात. कधीकधी त्यांच्या विशिष्ट समारंभात त्यांना एखादी वस्तू, रक्कम, ट्रीप गिफ्ट केली जाते.आठवड्यातून एकदा चौकशीचा फोन केल्याचं कर्तव्यही केलं जातं .मात्र आपल्या पालकांच्या फ्युचर प्लानसाठी गुंतवणूक केल्याची उदाहरणे मात्र क्वचितच सापडतात. मुलांचं संगोपन, शिक्षण, लग्न, मुलींची बाळंतपणं,सणवार,बारसं एवढं कशाला हनीमून टूरचं गिफ्टही आईवडील ॲरेंज करतात.नातवंडांना सांभाळतात.थोडक्यात ते एक हक्काची सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करतात.

काही पालकांना असं वाटेलही की आम्हाला मुलांच्या पैशांची गरज नाही. आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही.आम्ही आमचा मेडिक्लेम  काढला आहे. म्हणजे आम्ही आत्मनिर्भर आहोत कारण आम्ही दूरदर्शी आहोत. भविष्याची तरतूद करण्याचा हा दृष्टिकोन आदर्श आहे हे नक्कीच. पण जसा तुमच्या इस्टेटीत प्राॅपर्टी, पैसा, गुंतवणूक, सेव्हिंगवर त्यांना आपला वारसा हक्क आहे हे सांगावं लागत नाही, शिकवावं लागत नाही तसं या हक्काची दुसरी बाजू जबाबदारी असायला हवी ही जाण मुलांना बहुतेक वेळा नसते.अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. काही तरुण मुलांनी आपल्या आईवडिलांच्या मेडिक्लेमचे हप्ते भरण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतलीय.काहीजण ट्रीप किंवा टूर आवर्जून आईवडिलांना घेऊनच करतात.आईवडिलांच्या बॅंक खात्यात दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करणारी गुणी मुलंही आहेत.

मुळात आपले आईवडील ‘सिनियर सिटिझन्स’च्या कक्षेत आल्यावरचं त्यांचं आयुष्य त्यांना अभिमानाने जगता यावं यासाठी त्यांना फायनान्शियली साउंड करणं, सुरक्षितता देणं ही खूप महत्त्वाची आणि आवश्यक बाब आहे ह्याची जाणीव, त्याचा विचार आणि तो कृतीत आणणं हे मुलांनी करणं अपेक्षित आहे. जसा बायको, मुलांच्या भविष्याच्या तरतुदींचा विचार केला जातो अगदी तसंच what are the future plans for your parents?हा प्रश्न स्वतःला मुलांनी विचारला की लख्ख प्रकाश पडेल डोक्यात आणि एक नवा विचार सुरु होईल जो फार गरजेचा आहे.जेव्हा मुलं  मोठी होत असतात तेव्हा आईवडीलही वृद्ध होत असतात .त्यांनी तुमचं फ्युचर  तयार केलं असेल किंवा नसेलही पण त्यांनी तुम्हाला एका उज्जवल भविष्यासाठी तयार केलं आहे हे  मुलांनी विसरु नये.तुमच्या जन्मापासून ते तुमच्या फ्युचरसाठी एक एक पैसा सेव्ह करत असतात.आता तुम्ही त्यांच्या फ्युचर प्लानसाठी काम करायचं आहे.

Swati-Tokekar
डाॅ स्वाती गानू टोकेकर