सर्वात वर

पनीरचे आरोग्यास फायदे

(आहार मालिका क्र – १3)

डॉ.राहुल रमेश चौधरी  

आज काल रोजच्या जीवनात सगळ्यांच्या आहारात पनीर हा शब्द खूपच जिव्हळ्याचा आणि आपुलकीचा झाला आहे.आज प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हा पदार्थ कधी ना कधी असतोच.पूर्वी हा पदार्थ फक्त उच्चभ्रू लोकांकडे खाण्यात असायचा परंतु आता खाण्यास मात्र श्रीमंत गरीब असा काही भेद राहीलेला नाही.अगदी हॉटेल मध्ये कोणीही गेले तरी हमखास पनीर डिश आधी निवडली जाते.

यात पनीर चे पनीर पराठा ,पनीर समोसा पासून पनीर चिलि,पनीर कोफ्ता,पनीर बटर मसाला,मटरपनीर,पालक पनीर,शाही पनीर,पनीर कोर्मा असे अनेक पदार्थांची रेलचेल बघायला मिळते.इतक्या प्रमाणात पनीर वापरले जाते असे पनीर दुधात काही आंबट पदार्थ खालून नासवले जाते व त्यानंतर घट्ट भाग दाबून त्यातून पाणी काढून पनीर तयार करतात.याचे लाभ तोटे(Health benefits of Paneer) आपण बघणारच आहोत पण त्याआधी आयुर्वेद विचार बघू म्हणजे लेखातल्या काही गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजू शकतील.

आयुर्वेद  शास्त्रात ७ धातु वर्णन केले आहेत,रस (lymph),रक्त(blood),मांस(flesh),मेद(fat),अस्थि(bone),मज्जा(bone marrow),शुक्र(semen) यात आधुनिक संकल्पना ह्या आयुर्वेद संकल्पनांची थोडक्यात कल्पना असावी याकरीता कंसात लिहिलेली आहे वास्त्वात ह्या संकल्पनांचा आवाका खूप मोठा आहे,आपण जेवण केल्यावर त्यापासून जो आहार रस तयार होतो त्यापासून या ७ धातुंचे क्रमाक्रमाने पोषण होते.व सर्वात शेवटी इम्मुनिटी –रोगप्रतिकारकक्षमता म्हणजेच ओज तयार होते.यानुसार जी आहार लेखमाला चालवली जात आहे त्यातील पदार्थाचे त्याचे लाभ तोटे समजावून घ्यावेत. तर मग आता आपण पनीर चे फायदे तोटे बघूयात.(Health benefits of Paneer)

१.व्यायाम करून खुप भूक लागते पण अंगावर मांस चढत नाही वजन वाढत नाही अश्या लोकांनी पनीर खावे याने मांस वाढते ,मांस पेशींना आकार मिळतो,स्नायू बळकट होतात,या फायद्यासाठी भरपूर वजन वाढवणारे पनीर खाणे हितकारक पण भूकेचा विचार करूनच.

२.ज्यांना झोप येत नाही त्यांनी पनीर, म्हशीचे दूध, दही रात्री झोपतांना घ्यावे याने झोप चांगली लागते पण भूक मात्र चांगली असावी.

३.ज्यांना भूक चांगली आहे पण मलाचे खडे होतात किंवा मलप्रवृत्ती व्यवस्थित होत नाही अश्यांनी पनीर खावून पाहावे ,त्रास वाढल्यास लगेच बंद करावे.

४.काहीजणांना खूप भूक लागते कितीही खाल्ले तरी भूक भागत नाही अश्या लोकांनी पनीर म्हशीच्या तूपावर परतून पोळीच्या फुलक्यांसह खावे.

५.बऱ्याच जणांना शुक्र कमतरतेच्या तक्रारी असतात यामुळे पाय,मांड्या,कंबर दुखणे असे त्रास होतात,संभोगेच्छा नष्ट होते,मन उदासीन राहाते,अशक्त पणा वाटतो,शुक्र कमतरतेने रक्ताच्या कमतरता जाणवते अश्या वेळी पनीर,तुप साखर पोळी यासह औषध घ्यावे.याने त्रास कमी होतो.

निषेध

१.रोजच्या वापराकरीता पनीर घातक आहे.

२.भूक कमी असेल किंवा भूक नसेल तर पनीर खावू नये.

३.पोट साफ न होणे,गॅसेस होणे,पोटात आवाज येणे अश्या तक्रारी असलेल्या लोकांनी पनीर खाणे टाळावे.

४.वर्षा,वसंत ऋतूत पनीर खाणे टाळावे

५.हेमंत शरद ऋतूत पनीर खाणे कधीही योग्य

६.कफाचे,कोलेस्टेरॉल वाढणे,मेदाचे आजार अश्यांनी पनीर खावू नये.

७.वरील उपायांत सतत सर्दी ,दमा,अंगावर सूज,जुलाब सातत्याने होणे,किडनीचे आजार, पचनाचे विकार,अम्लपित्त अश्या रुग्णांनी पनीर खाणे अयोग्यच…

८.पनीर हा पदार्थ नियमीत व्यायाम करणारे,खेळणारे,श्रमाची कामे करणारे,अत्यंत भूक लागणारे यांच्या स्साठी उपयुक्त आहे बाकी लोकांनी हा सर्वथा निषीध्द नाही पण जपून वापर करावा.कारण हा पचनास अत्यंत जड आहे.

सावधान

सर्व प्रयोग हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली करावे.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी  

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०