सर्वात वर

…अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांची  सीबीआय चौकशी करा असे आदेश दिल्यानंतर देशमुखांनी राजीनामा दिला आहे. 

कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी बैठकीत अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवार यांनी होकार दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दिली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर  १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती ती याचिका फेटाळल्यानंतर त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्यास सांगण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात अ‌ॅड.जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देत सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले.त्या नंतर आज गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.