सर्वात वर

थर्टीफस्ट कसा साजरा करणार ! राज्यसरकारच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई: थर्टीफस्ट कसा साजरा करावा या बाबत राज्यसरकारने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना आज जाहीर केल्या आहेत. राज्यात  २२ डिसेंबर,२०२० ते  ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु या आधीच लागू केला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून राज्यसरकारने दिलेल्या सूचनेनुसार ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने साजरे करावी अशी अपेक्षा आहे . त्या दृष्टीने राज्यसरकारने  मार्गदर्शक सूचना देण्यात जाहीर केल्या आहेत. 

मार्गदर्शक सूचना 

1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  दि.३१ डिसेंबर २०२० रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. १ जानेवारी २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे असे आवाहन राज्य सरकार तर्फे करण्यात आले आहे. .

2. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर , बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन गर्दी करू नये.तसेच  सोशल डिस्टन्सींग चे पालन करावे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.  


3. नववर्षच्या स्वागतासाठी विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.


4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी तसेच  दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

5. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी कोणत्याही प्रकारे धार्मिकआणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

6. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिकस्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे गरजेचे आहे.तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

7. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. 


8. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

9. तसेच या परिपत्रकानंतर ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्या असून नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.