सर्वात वर

…या ठिकाणी बसणार ‘बुरेवी’ चक्रीवादळाचा फटका : प्रा किरणकुमार जोहरे

‘बुरेवी’ नंतर ‘तौत्के’! चक्रीवादळ येणार ..!

अंदाज नव्हे माहिती !

Prof.-KiranKumar-Johare
भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे

मुंबई: ‘निवर’ चक्रीवादळानंतर आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आता ‘बुरेवी’ चक्रीवादळ आले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ भारताच्या दक्षिण भागाकडे सरकत असून हे चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्यापेक्षा ते बाजूने पुर्व कडून पश्चिमेकडे सरकत निघून जाण्याची शक्यता अधिक असल्याचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी जनस्थानशी बोलतांना सांगितले. 

या चक्रीवादळाला ‘बुरेवी’ हे मालदीवन या देशाने ठेवलेले नाव आहे. या वादळामुळे तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा या राज्यात निश्चितपणे पाऊस होईल. महाराष्ट्र या चक्रीवादळापासून एक हजार तीनशे किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर असल्याने शेतकऱ्यांनी मुळीच घाबरु नये असे आवाहन देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी केले आहे. 
भारतात अधिकृत मान्सून १ जूनला सुरू होऊन ३० सप्टेंबरला दफ्तरी संपतो. परंतु यावर्षी  १५ ऑगस्ट २०२० ला महाराष्ट्रात मान्सून खऱ्या अर्थाने सुरू झाला व चार महिन्यानंतर म्हणजे १५ डिसेंबर २०२० ला तो संपेल असे आपले वैयक्तिक शास्त्रीय निरीक्षण आहे असे ही हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे म्हणाले.

मान्सून आणि चक्रीवादळांचा पॅटर्न बदलला !

सध्या मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. मान्सून परतीचे ईशान्य मोसमी वारे आता वाहू लागले आहेत याचा परीणाम म्हणून आता चक्रीवादळे निर्माण होण्याची सुरुवात झाली आहे. मान्सून परतत असतांना २०२० या वर्षी तयार झालेले ‘निरव’ हे पहिले चक्रीवादळ उठले होते. येत्या काळात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात अजून चक्रीवादळे निर्माण होतील. यानंतर देखील जानेवारी २०२१ मध्ये चक्रीवादळे आणि त्यामुळे ठराविक कालावधीच्या पावसाचा आपल्याला अनुभव घ्यावा लागेल असा इशारा देखील प्रा.जोहरे यांनी दिला. 

दरवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये चक्रीवादळे निर्माण होतात. यावर्षी एकही चक्रीवादळ ऑक्टोबरमध्ये निर्माण झालेले नाही. नोव्हेंबरच्या शेवटी ‘निवर’ हे चक्रीवादळ बनले.अर्थात याचा सरळ सरळ नैसर्गिक अर्थ असा निघतो कि डिसेंबर आणि जानेवारी मध्ये अजून वादळांना आपल्याला सामोरे जायचे आहे. तसेच गेल्या किमान २० वर्षापासून मान्सून पॅटर्न बरोबरच चक्रीवादळांचा पॅटर्न देखील बदलला लक्षणीयरित्या चित्र बदलला आहे असे आपले निरपेक्ष वैज्ञानिक निष्कर्ष मांडतांना भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे म्हणाले. या बद्द्ल त्यांनी वारंवार भारत सरकारला आपली माहिती कळवली आहे. 

बदलत्या हवामानाची माहिती  शेतकरी बांधवांपर्यंत ‘अंदाज नव्हे माहिती !’ पोहचून त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी  प्रा किरणकुमार जोहरे गेल्या  दहा वर्षापेक्षा अधिक २४ बाय ७ शेतकर्यांना मोफत सेवा पुरवण्याचे महत्वपूर्ण काम करत आहेत.यावर्षी आलेल्या ‘अॅम्फन’ आणि ‘निसर्ग’ या पहिल्या दोन चक्रीवादळांचा वेध घेण्यासाठी दिल्ली येथे एक उच्चस्तरीय तीन सदस्यांची कमिटी गठीत करण्यात आली त्यात प्रा. किरणकुमार जोहरे यांची अनौपचारिक निवड करण्यात आली आहे. चक्रीवादळांचा अचूक वेध घेण्यासाठी ते दिवसातील २२ तास काम करत भारत व जागतिक हवामानातील घटनांवर लक्ष ठेऊन निरीक्षण घेत असतात. 

प्रा.जोहरे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या आयआयटीएम पुणेचे माजी शास्त्रज्ञ असून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वादळांबाबत रिसर्च पेपर देखील त्यांनी प्रकाशित केले आहेत. चक्रीवादळाच्या दरम्यान वाढणारा पाऊस आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत देखील मार्गदर्शना बरोबरच सर्वसामान्य जनतेची भिती दूर करण्यासाठी ते सातत्याने जनजागृती करीत आले आहेत. निसर्ग चक्रीवादळ आले तेव्हा सोशल मीडियावरून घबराट निर्माण केली जात असतांना प्रा किरणकुमार जोहरेच्या मार्गदर्शक व्हिडिओमुळे शेतकऱ्यांची भीती दूर होत त्यांना फार मोठा आधार मिळाला होता. 

चक्रीवादळांचे विज्ञान !

जेव्हा वातावरणात अस्थिरता निर्माण होते आणि वारे गोलाकार फिरु लागतात तेव्हा हवेत भवरे तयार होऊन चक्रीवादळ बनते. मान्सून परतत आहे याचे हे एक दर्शक परीणाम आहे. चक्रीवादळे ही दर्शक म्हणून देखील काम करतात. मान्सून पुर्व काळात आणि मान्सून संपतांना वातावरणातील अस्थिरतेने चक्रीवादळांची निर्मिती होते. ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये मान्सून परतण्यासाठी सुरुवात झाली आहे हे दर्शवितात असे ही ते म्हणाले. 

‘बुरेवी’ नंतर ‘तौत्के’!

‘बुरेवी’ या चक्रीवादळांनंतर साधारणतः पुढील दोन आठवड्यात पुन्हा नवीन दुसरे चक्रीवादळ तयार होईल. ‘तौत्के’ या म्यानमारने ठेवलेले नावाने ते ओळखले जाईल. हे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण होईल की बंगालच्या उपसागरात याबाबत हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे सध्या सखोल अभ्यास करीत आहेत.

शेतकर्यांनी घाबरुन जाऊ नये !

‘जनस्थान’ ला दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्यापेक्षा ते बाजूने पुर्व कडहून पश्चिमेकडे सरकत निघून जाण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे महराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे हि प्रा.जोहरे यांनी सांगितले. 


प्रा किरणकुमार जोहरे यांच्याशी संपर्कासाठी माहिती पुढीलप्रमाणे:


प्रा किरणकुमार जोहरे भौतिक शास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ संपर्क ९१६८९८१९३९

[email protected] www.kirankumarjohare.org

Facebook Id Kirankumar Kiku