सर्वात वर

वेळेची गरज ओळखून वागा- अनघा भगरे

बातमीच्या वर

“अनन्या” नाटकामध्ये अनन्याच्या मैत्रिणीच्या भुमिकेत रंगभूमीवर लक्षवेधी भुमिका साकारलेली आणि सध्या “रंग माझा वेगळा” या मालिकेत श्वेताच्या भुमिकेत दिसणारी नाशिकची लेक अनघा भगरे! तिच्याशी मारलेल्या गप्पांमध्ये तिने शेअर केले की ती अत्यंत जबाबदारीने या वेळेचा उपयोग करते आहे. खरंच खूप महत्वाच्या गोष्टी शेअर केल्यात. पाहूयात काय म्हणतेय… 

(स्वरदा कुलकर्णी,नाशिक)

१६-१७ मार्चच्या दरम्यान आमचं सिरियलचं अत्यंत महत्वाचा सिक्वेन्स आम्ही शूट करत होतो. सगळी तयारी झाली होती. आमच्या संपुर्ण टीमला बाहेर उद्भवलेल्या परिस्थितीविषयी सांगण्यात आले. सोशल गॅदरिंग्स टाळायची म्हणून आम्ही आमचे शूट त्याचक्षणी थांबवावे लागले. रोजच्या या १३-१४ तासांच्या शूट लाईफची इतकी सवय लागली होती कि सुरुवातीला मला अस झालं होतं कि बापरे हे पुढचे दिवस घरात माझे कसे जाणार? आमच्या घरी प्रत्येकजण वर्किंग आहे. त्यामुळे प्रत्येकाचे असे स्वत:चे रुटीन आहे. अर्थात ही खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना एकत्रच इतकी मोठी सुट्टी मिळाली. 

मी नाशिकला आल्यावर बाबा फ़क्त माझ्या हातचे जेवतात. त्यामुळे सकाळी उठले कि मी पहिले नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण याची सगळी तयारी करते. शक्यतो कुठलाच पदार्थ रिपिट होणार नाही याची काळजी मी घेते. त्यामुळे वेगवेगळे पराठे आम्ही करते. मी नवनविन रेसिपीज गूगलवरुन, युट्युबवरून शोधुन काढते आणि त्या घरी बनवून बघते. आईकडून काही पदार्थ शिकते आहे.

मला फ़िटनेस ची खूप आवड आहे. माझे बाबा घरच्या घरीच व्यायाम करतात. त्यामुळे त्यांच्याकडच्या डंबेल्स घेऊन मी माझ्या रोजच्या वर्काऊट ला सुरुवात केलीय. मला आणि बाबांना गार्डनिंगची खूप आवड आहे. आमच्या घरात खुप वेगवेगळ्या प्रकारची ३०० झाडं आम्ही लावलीयेत. आमचं संपुर्ण घर वेगवेगळ्या रोपांनी सजवलं आहे. रोज झाडांना पाणी घालणे,  कुठल्या झाडाला काय आलंय हे पाहणं, झाडांची नियमितपणे मशागत करणं, त्यांच्यासोबत निवांत बसणं या सगळ्याने आमचा वेळ खूप मस्त जातो. खरं मला एका जागी सलग बसून पुस्तक वाचनं जमत नाही. पण फोन वर येणारे न्युज अपडेट्स, लघुकथा, माहितीपर लेख इ. गोष्टी नक्की वाचते. यावर मी एक मस्त पर्याय शोधून काढला. मी अनेक पुस्तके डाउनलोड केली. अनेक पुस्तके माझ्या मित्रांनी मैत्रिणींनी शेअर केली. मग दिवसातला थोडा थोडा वेळ मी वाचन करते.

 या धकाधकीच्या जीवनात एकमेकातला संवाद हरवलाय, असा अनुभव आपल्यातला प्रत्येकजण सध्या घेतोय. तेव्हा हा वेळ आम्ही म्हणजे माझं कुटुंब एकमेकांसोबत गप्पा मारण्यात घालवतो. माझे आजोबा अनुभवाने काही चांगल्या गोष्टी आम्हाला सांगतात, माझे बाबा माझ्याशी मोकळेपणाने माझ्या पुढच्या वाटचालीबद्दल बोलतात. तसंच प्रत्येकजण आपापल्या विषयात प्रविण आहे तेव्हा त्याबद्दलची महत्वाची माहिती, आपापले अनुभव एकमेकांसोबत शेअर करतात. आमच्याकडे संध्याकाळच्या वेळात आवर्जून अध्यात्मिक कॅसेट्स आम्ही घरात लावतो. सध्या आम्ही रामायण ऐकतो आहे. प्रत्येकजण आपपले काम करता करता ऐकतो. एक वेगळीच सकारात्मकता यातून घरभर पसरते. 

मी परवाच बातमी वाचली कि, आपल्या पृथ्वीभोवती जो ओझोनचा थर आहे त्याला असलेले छिद्र कमी झाले आहे. हे सगळं कशाने झालं? तर आपण घरात बसून पर्यावरणपुरक ज्या गोष्टी केल्या, जसं कि वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिले, घराबाहेर पडलो नाही, गाडीचा वापर केला नाही. त्यामुळे प्रदुषणाची पातळी कमी झाली. सकाळ झाल्यावर आपल्याला पशुपक्ष्यांचे आवाज येऊ लागलेत. एक नीरव शांतता आपण ऐकु शकतोय. आपल्याला निसर्ग साद देतोय. आपण शांत होऊन हे सगळं ऐकुयात. आज घरात बसलेला प्रत्येक जण माणूस आहे. अगदी श्रीमंत असो वा गरिब! आपण एका अश्या काळात आलोय ज्या क्षणभर विश्रांतीची आपल्याला गरज होती. तेव्हा उगाच धाडस करून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका. 

आणखी एक महत्वाची गोष्ट, सोशल मिडियावर अनेक अफवा पसरतात. पाळिव प्राण्यांमुळे कोरोना पसरतो आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पाळिव प्राणी आहेत असे अनेक लोक मुक्या जीवांना रस्त्यावर आणुन सोडतायेत. त्यांची उपासमार होते आहे, आपल्या जवळपास असे प्राणी दिसले तर त्यांना जरुर काही खायला द्या. ही अफवा आहे हे खरं नाहीये, आपण जसे सजीव आहोत, तसेच तेही आहेत. बाहेर सोडल्यावर ते रोगाने ग्रस्त होऊ शकतात. त्यापेक्षा जर त्यांची आपण घरात काळजी घेतली तर त्यांचे भयंकर रोगापासून रक्षण आपण करु शकतो. कोरोना हे जगावर आलेले एक संकट आहे, जगभरातले लोकांची शारिरिक दृष्ट्या प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. अश्या अफवा पसरवल्यास लोकांचे मनोबल कमी होईल याचा विचार नक्की करा! आपली काळजी घ्या.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली