सर्वात वर

“झूम”च्या माध्यमातून साजरा झाला जनस्थानचा “कलारंग”

सुप्रसिद्ध गायक आनंद अत्रेंच्या मैफीलीने झाली सुरुवात

नाशिक -कोरोनाच्या बातम्यांनी एकीकडे हैराण केलेले असतानाच कलाकारांच्या मनात ‘आपण कुठेतरी यातून मार्ग काढणे शिकले पाहिजे’ ही भावना असते. जनस्थान (Janasthan) हा कलाकारांचा व्हाट्सअप ग्रुप आता नाशिककरांना नवीन नाही. लॉकडाऊनच्या काळात सगळ्या कलाकारांवर बर्‍यापैकी परिणाम झाल्याचे चित्र आहे. त्या आशयाच्या बातम्या देखील आपण सतत वाचत असतो पण शेवटी थांबेल तो कलाकार कुठला ? 

कितीही अडचणी आल्या तरी आपला आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे आणि हा आनंद इतरांनाही देता आला पाहिजे ही कलावंतांची नेहमीच भावना असते. या भावनेतूनच सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या करंजीकर यांनी  झुमवर कलाकारांच्या मैफिलीची संकल्पना मांडली व जनस्थान (Janasthan) ग्रुपचे ॲडमीन अभय ओझरकर यांनी ही संकल्पना उचलून धरली. त्यातुनच झुमवर जनस्थान  कलारंगाची मैफिल रंगली.

जनस्थान (Janasthan) मधील सगळेच कलाकार अतिशय प्रतिभावंत आहेत. सध्याच्या काळात प्रत्येकाची मानसिक, शारीरिक, आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने जनस्थानच्या माध्यमातून आपण काय करू शकतो याचा सातत्याने विचार होत होता. जे आपल्या हातातून निसटून गेले आहेत त्यापेक्षा आपल्या हातात जे आहे, आपल्या सोबत जे आहेत त्यांच्याकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणं हे परिवार म्हणून आपलं कर्तव्य आहे.  

Janasthan Kalarang Celebrated Through Zoom

यापुढे दर शुक्रवारी जनस्थान (Janasthan) कलारंगाच्या माध्यमातून मान्यवर आपली कला सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या कलेचा आस्वाद घेण्याची, त्यांच्या काळज्या, चिंता थोडावेळ का होईना विसरण्याची संधी देणार असल्याचे जनस्थानचे ॲडमिन अभय ओझरकर यांनी सांगितले. जनस्थान कलारंगच्या मैफिलीत सुप्रसिद्ध गायक आनंद विष्णु अत्रे यांनी आपल्या सुरांनी सगळ्यांना चिंब भिजवले. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी या अभंगाने सुरू झालेल्या कलारंगचा रंग उत्तरोत्तर चढत गेला. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याने प्रत्येकाची मनस्थिती दर्शवली तर काळ देहासी खाऊ आला, जन्म माझा हारण्या साठी नसू दे यातून मानवाच्या जगण्याच्या विजिगीषू वृत्तीचे दर्शन झालं. यातील जन्म माझा हारण्या साठी नसू दे ही गझल जनस्थानचे सदस्य , कवी मिलिंद गांधी यानी रचली असुन आनंद अत्रेंनी खास या मैफिलीसाठी स्वरबद्ध केली होती. 

मराठी भावगीतांबरोबरच ये दील ये पागल दील मेरा, काश ऐसा कोई मंजर होता ह्या गझलदेखील रसिकांची दाद मिळवून गेल्या. भूली बिसरी चंद उम्मीदे या भैरवीने मैफिल संपन्न झाली. झूम वरील या मैफिलीला अनेक क्षेत्रातील नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भूमिकेत होते.सर्वांनी जनस्थान कलारंग चा आस्वाद घेतला. आदिती मोराणकर यांनी आनंद अत्रे यांचा परिचय करून दिला तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहल एकबोटे ,गणेश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.