सर्वात वर

करोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – छगन भुजबळ

नाशिक – नाशिक मधील कोरोना रुग्णांच्या संख्येचा आढावा घेऊन व्यापार सुरु करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा, संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला आज दिले.

लॉकडाऊनमुळे नाशिकमधील व्यापार उद्योग  मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे या पार्श्वभूमीवर व्यापार उद्योग सुरू करण्यासाठी  व व्यापाऱ्यांच्या विविध अडचणी संदर्भात  महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक मधील व्यापारी संघटनांच्या  शिष्टमंडळाने आज दि. १६ मे २०२१ रोजी भुजबळ फार्म येथे अन्न, नागरी पुरवठा, संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री श्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट घेतली.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री.  संतोष मंडलेचा यांनी दिनांक १३ मे रोजी झूम ऍपवर नाशिकमधील व्यापारी संघटनांच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी मांडलेल्या विविध अडचणी पालकमंत्री भुजबळ यांच्या समोर मांडल्या.  त्यात प्रामुख्याने व्यापार सुरु, व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळणे, वीज बिल, मालमत्ता कर, बँक कर्जांवरील व्याज माफ करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या गाळ्यांचे तीन महिन्यांचे भाडे माफ करणे, जीएसटी, इन्कम टॅक्स अशा विविध स्वरूपाचे कर भरण्यासाठी सप्टेंबर २१ पर्यंत मुदत द्यावी, लघु व मध्यम व्यापाऱ्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या १० टक्के रक्कम वार्षिक ३ टक्के व्याजाने कर्ज रूपाने द्यावे आदि मागण्या केल्या व व्यापाऱ्यांच्या अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आवाहन केले.

ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री सुरेश चावला यांनी अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वाहनांसाठी स्पेअर पार्ट्सची दुकाने उघडणे गरजेचे असल्याचे सांगून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. 

बैठकीस महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारणी सदस्य श्री सचिन शहा, ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री जगदीश आचरा, ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री सुरेश चावला, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्रीगिरीश नवसे, नाशिक किरकोळ किराणा धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीमहेंद्रभाई पटेल, नाशिक घाऊक किराणा धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीप्रफुल्ल संचेती, दि नाशिक रिटेल क्लाथ मर्चंट्स असोसिएशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर संपत काबरा, नरेश पारख , तुषार मणियार,  व्यापारी  श्री. संजय सोनवणे,  श्री. मेहुल थोरात, चेंबरचे सहाय्यक सचिव अविनाश पाठक आदी उपस्थित होते.