सर्वात वर

‘लाईकस् आणि कमेंटस्’

डाॅ स्वाती गानू टोकेकर

सकाळी जाग आली, पहिल्यांदा उशीजवळचा मोबाईल घेतला.काल एफ.बी वर प्रोफाईल पिक नव्याने अपलोड केला होता. तासाभरात शंभर लाईक्स आणि40-50 तरी कमेंटस् यायला हव्या होत्या .पण आजकाल काय झालंय कुणास ठाऊक?माझ्या साड्या,ज्वेलरी,वेस्टर्न अटायर्स सगळं कसं एकदम डिफरंट असतं.फोटो टाकला नुसता की लगेच लाईक्स आणि कमेंटस् चा पाऊस पडायचा.काय फील यायचा एकदम ‘टाॅप ऑफ द वर्ल्ड ‘ .खरं म्हणजे एक सिक्रेट आहे हं फोटोजचं,आपल्यातच ठेवा बरं का ! म्हणजे दहा फोटो काढले की एखादा फोटो फेसबुक, इन्स्टा, व्हाॅट्स ॲप वर टाकण्यासारखा निघतो.

शिवाय फोटो क्राॅप करणं,स्कीनटोन,आईज,ड्रेसकलर सगळं बदललं की फोटो कसा अगदी छान होतो.फोटो काढताना डबल चीन दिसायला नको,पोट थोडं आत घ्यावं लागतं, सेल्फी काढला असला तरी तो सेल्फी नसण्याचं स्किल असावंच लागतं..एखाद्या साडीवर ,ड्रेसवर फोटो काढला की पुन्हा ती काही उपयोगाची नाही मग सणाला,ऑकेजनला नवीन कपडे घ्यावेच लागतात शिवाय जेव्हा लोकांनी पहावे म्हणून फोटो काढायचे म्हणजे ह्यांचे,माझे कपडे मॅचिंग,स्टायलिश,नवीनच पाहिजेत.मला हे शोभायला हवेत न.

आम्ही सगळे किती किती आनंदी आणि खुश आहोत पण हे जोपर्यंत फेसबुकवर कळत नाही तोपर्यंत खरंच सांगते मनाला बरं वाटत नाही. माझ्या घरातले गौरी गणपती, दसरा दिवाळी, फराळ, लाईटिंग,मखराची सजावट, रांगोळी, वाढदिवस,वर्षश्राद्ध सारं कसं बाई मी अपडेट करते.एक सुखी जोडपं,हॅपी फॅमिली,एन्जाॅय करणारी फॅमिली, लव्हेबल कपल,गोंडस ,गुणी मुलं सगळं पडद्यावर यायलाच हवं.म्हणजे जे लोक माझ्या फोटोला लाईक करतात त्यांनाच मी लाईक करते.कमेंटस् करणं थोडं वेळखाऊच.बरं तर बरं आजकाल इमोजी वगैरे सगळं रेडिमेड असतं.लिहित बसायला नको.शायरी, जोक्स वगैरे वाचते मी जरा जरा पण लाॅन्ग पोस्ट वाचण्याइतका पेशन्स नाही ग बाई.मात्र अलिकडे पुरेशा लाईक्स आणि कमेंटस् का नाही येत?काल समायरा म्हणाली ते खरं असेल का?अग आमच्या कमेंटस् च संपल्या .तू इतकी छान दिसतेस की आता काय बोलणार?फोटो टाकणं हा तुझा जन्मसिद्ध अधिकार आहे.सगळे चॅलेंजस घेणं हे तुझं कर्तव्य आहे. आपण हसलो तर होतो तिच्याबरोबर पण मनातून वाईट वाटलंच.तिने चेष्टा केली की टोमणे मारले?तिला माझ्याविषयी जेलसी वाटत असेल का? जाऊ दे मला काही एवढा सोस नाही कमेंटस् आणि लाईक्सचा.पण मग असं रेस्टलेस का वाटतंय ?आपण सुंदर दिसत नाही का?म्हणजे मी मला सुंदर वाटते हो पण जोपर्यंत फेसबुक वर इतर लोक लाजवाब, हाॅट,ब्यूटिफूल,अतिसुंदर, देखणी,क्या बात है असं म्हणत नाहीत तोपर्यंत सुंदर असल्यासारखं वाटत नाही.

जेवून पोट भरतं पण लाईक्स आणि कमेंटस् नी मन रमतं.म्हणजे तसा हा म्हणतो मला की तू ऑलवेज सुंदर दिसतेस.मग तेवढं पुरेसं का वाटत नाही. दुस-याचं ॲप्रिसिएशन का हवंहवंसं वाटतं?आणि वाटलं तर काय झालं? आजकालच्या व्हर्च्युअल जगात आपलं देखणेपण इतरांनी ठरवायचं असतं.काय झालं फोटो टाकले तर तेवढंच इतरांना मी सुंदर कसं रहावं,दिसावं याबद्दल मी एज्युकेट करतेय नं .तसंच अगदी मी छान छान स्टेटस् टाकते तर ती माझी मनस्थिती नसते काही. मात्र काही जणांचा फार जळफळाट होतो माझे फोटो पाहून. आता तुम्हच सांगा वेकेशनमध्ये काश्मीर, लंडन,न्यूयाॅर्कला गेलो तर तिथले फोटो टाकणं अगदी मस्टच असतं हो की नाही. म्हणजे साईटसीईंग करतो आम्ही पण त्या फोटोजना इतके लाईक्स नाही पडत.त्या फोटोत आपण असायला हवं.आपण लाईफ किती एन्जाॅय करतो.कुठे चेक इन करतो हे समजायला पाहिजे. माझ्याकडून माझ्या फ्रेंडसपण इनस्पायर होतात आपणही जावं आऊट ऑफ इंडिया फॅमिली बरोबर. शिवाय स्टायलिश फोटो कसे काढावेत आणि ते फोटो पोस्टावेत हे एक शास्त असतं हे पण कळतं त्यांना. म्हणजे वेळ प्रसंगी मी ओल्डीजचे फोटो पण टाकते.कळायला हवं ना सगळ्यांना आमचे संस्कार, वळण. घरातली पंचपक्वान्नं,रांगोळ्या,लाईटिंग पाहून काहींना वाटतं

” इसके घर की दिवाली में मेरे घर से ज्यादा लाईटिंग क्यों भला? आणि एवढं ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय आहे फोटो टाकण्यात?इतके सुंदर दागिने, छान कपडे काय फक्त कपाटात ठेवायचे?आहे रंगरूप म्हणून तर फोटो टाकते तर समायरा म्हणाली “माणसाची श्रीमंत लाईक्स आणि कमेंटस् वर,त्याच्या रंगरूपावर नाही ठरत तर ती त्याच्या अंतरंगावर ठरते.खरं आहे का ते?फेसबुकची व्हर्च्युअल भिंत मनाला फसवायला बरी आहे का?सुखी,आनंदी आहोत हे जगाला दाखवायला हा मुखवटा खरा आहे का? विचार करायला हवा.

Swati-Tokekar
डाॅ स्वाती गानू टोकेकर