सर्वात वर

माजी मंत्री,ज्येष्ठ आदिवासी नेते विष्णू सावरा यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री,ज्येष्ठ आदिवासी नेते विष्णू सावरा (Vishnu Sawara)यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे.ते ७२ वर्षाचे होते.विष्णू सावरा हे गेल्या दोन वर्षांपासून यकृताच्या आजाराने त्रस्त होते. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती गंभीर होती .आज मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.विष्णू सावरा यांच्या निधनामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे.

विष्णू सावरा यांनी १९८० मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते भाजपमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून रुजू झाले होते.१९८० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाने वाडा मतदार संघात उमेदवारी देण्यात आली होती. मात्र यात त्यांना यश मिळाले नाही. १९८५ मध्ये त्यांनी पुन्हा वाडा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवली. मात्र त्यातही त्यांना यश मिळाले नाही. पराभवाने खचून न जाता त्यांनी सामाजिक काम सुरूच ठेवले .आदिवासी समाजासाठी त्यातही तरुणांसाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. आदिवासाची समाजाच्या उन्नतीसाठी ते कायमच पुढाकार घेत होते.

भाजपा शिवसेनेच्या सरकार मध्ये २०१४ ला दुसऱ्यांदा त्यांना आदिवासी विकास खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांचा नम्र स्वभाव आणि केलेल्या विकास कामांमुळे ते नागरिकांचे आवडते झाले होते.

विष्णू सावरा यांच्या निधनाने भाजपाचा समर्पित कार्यकर्ता हरपला-देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री विष्णू सावरा यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपला आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीत जिल्हाध्यक्ष, आदिवासी आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश सचिव अशा विविध भूमिकांमधून संघटनात्मक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. निवासी शाळांचे व्यवस्थापन, आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार यासाठीही त्यांनी अनेक परिश्रम घेतले. स्पष्टवक्तेपणा आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आदिवासी कल्याणाच्या अनेक योजना परिणामकारकपणे राबविण्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे 30 वर्ष त्यांनी विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.