सर्वात वर

मना घडवी संस्कार( बाल मानसशास्त्र व संगोपन लेख-३)

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक) 

 “तू कधी स्वतःची चूक मान्य करू नकोस.”
“तुला शंभरदा तेच तेच सांगावं लागतं.” “कधी अक्कल येणार देव जाणे!” “चारचौघात अगदी लाज आणतेस.”
असे प्रेमळ संवाद आपल्या घरातही होत असतील तर आपण मुलांवर होणाऱ्या संस्कारांचा नव्याने विचार करायला हवा. संस्कार म्हणजे काय हो ? आपल्या लहानपणी आपण कधी संस्कार वर्गात गेल्याच आठवतंय? चला, आजचे संस्कार करून झाले! आजचा कोटा संपला असं कधी असतं का? मुलांवर संस्कार करायचे म्हणजे नक्की काय करायचं? ते कोणी करायचे? ते कसे करायचे? (Child Psychology) या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख!

विषयाला हात घालण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. महात्मा गांधींकडे त्यांचे अनेक अनुयायी रोज भेटायला येत. महात्मा गांधीजींची खरं बोलण्याची पराकाष्ठा, त्यांची तत्व, त्यांचे संस्कार यामुळे अनुयायी त्यांना खूप मानत. आपल्यालाही गांधींसारख्या व्यक्तीचा सहवास लाभावा, आपणही त्यांच्याकडे चार चांगल्या गोष्टी शिकाव्या अशी प्रत्येकाची धडपड असे. काही लोक तर मुद्दाम आपल्या मुलांना गांधीजींना भेटण्यासाठी घेऊन येत असत.असेच एकदा एक गृहस्थ आपल्या चार-पाच वर्षाच्या मुलाला घेऊन गांधीजींकडे भेटण्यासाठी आले. त्या मुलानी गांधीजींना वाकून नमस्कार केला. गांधीजींनी त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याच्या वडिलांना विचारलं “आज ह्याला कसं काय आणलंत ?”  वडिलांनी त्या मुलासमोरच बापूंना त्याची तक्रार सांगायला सुरुवात केली. “अहो काय सांगू बापू? याची आई याला किती वेळा मना करते तरीसुद्धा हा गुपचुप डब्यातून काढून गूळ खातो. हरप्रकारे सांगून बघितलं. प्रेमाने सांगून झालं, फटके देऊन सांगून झालं रागवून सांगून झालं पण हा ऐकतच नाही ! हा तुम्हाला फार मानतो त्यामुळे तुम्ही सांगितलं तर तो चोरून गुळ खाणं बंद करेल असं मला वाटतं.” गांधीजींनी त्या गृहस्थाच म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. त्यावर थोडा वेळ विचार केल्यानंतर गांधीजींनी त्या गृहस्थाला आणि त्याच्या मुलाला आठ दिवसांनी परत आश्रमात या असं सांगितलं. हा सगळा प्रकार कस्तूरबा बघत होत्या. तो गृहस्थ त्याच्या मुलाला घेऊन गेल्यानंतर कस्तुरबांनी बापूंना विचारलं, “आज असं का केलं? नेहमी तुमच्याकडे प्रश्न घेऊन येणाऱ्या माणसाला तुम्ही लगेच उपाय देता मग आज त्या छोट्या मुलाला गूळ खाऊ नको असं न सांगता आठ दिवसाचा वेळ का मागितलात ?”

बापू शांतपणे कस्तुरबांना म्हणाले, “मी जास्त गूळ खातो म्हणून तूच रागवतेस ना मला ? जी गोष्ट मी स्वतः करतो आहे ती करू नको असे मी त्या मुलाला कसं सांगू ? पुढच्या आठ दिवसात मी माझी गूळ खाण्याची सवय कमी करेल आणि मग हक्कानी त्या मुलाला चोरून गूळ खाऊ नकोस असं सांगेल.”

वाचलीत ना गोष्ट, मग आता मला सांगा, संस्कार करणं खरंच इतकी सोपी गोष्टी आहे  ? अर्धा तास तुमच्या मुलाला संस्कार वर्गाला पाठवलं तर त्याच्यावर संस्कार होतील  ?  जशी एखादी मालिका आपण अर्धा तास बघतो तसा अर्धा तास संस्कारांचे डोस देऊन मुलं संस्कारी होतील ?खरं तर संस्कार ही 24 तास घडणारी गोष्ट आहे. जेवणानंतर दोन चमचे संस्कार आपण चमचातुन मुलाला पाजु शकतो का ? नाही ना, उठता बसता, चालता बोलता, जागं असताना, अगदी झोपल्यावर सुद्धा मुलांना आपण संस्कार देऊ शकतो.

आपल्या लहानपणी आपण संस्कार वर्गात गेलो नाही कारण आपल्यावर संस्कार करणारी कितीतरी चालती बोलती विद्यापीठं आपल्या आजूबाजूला वावरत होती. आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू, आत्या, मामा, मावश्या, ताई-दादा ही घरातली विद्यापीठं, तर बाहेर गेल्यानंतर आपल्या ओळखीपाळखीचे लोक, दुकानदार ,व्यापारी ,भाजी विकणाऱ्या मावशी , अगदी शाळेबाहेर गोळ्या चॉकलेटं विकणारी आजी ही बाहेरची विद्यापीठे होती. या प्रत्येकाच्या बोलण्यातली अदब, आपुलकी, त्यांच्या शब्दांमधला मायेचा ओलावा आपण आपसूकच शिकत गेलो. मोठ्यांशी बोलताना आपली ताई किती आब राखून बोलते हे बघून आपणही नम्रता शिकलो. बाहेर गेल्यानंतर उद्धटपणे उत्तर दिलं म्हणून आपल्या मित्राला बसलेला मार आपल्याला शहाणे करून गेला आणि आपण आगाऊपणा करायचं नाही हे आपण लहानपणी शिकलो. आपली आई आपल्या आजीशी किती विनम्रतेने वागते हे बघून  मोठ्यांशी कसं वागायचं याची शिकवण आपल्याला मिळाली. रस्त्यावरून जाताना कोणी आपल्याला भेटलं तर त्याची किती प्रेमाने चौकशी करायची हे सुद्धा आपण आजूबाजूला बघून शिकलो. अर्थात आपल्याला चांगलं माणूस बनण्याचे संस्कार हे लहानपणापासून प्रत्येक व्यक्तीकडून मिळत गेले. ते कोणी येऊन आपल्याला शिकवले नाही. पण आपण शिकलो मग आता आपल्या मुलांना हे सगळं आपणच शिकवायला हवं. आपण लहानपणापासून जे शिकलो आहे ते त्यांना मनमोकळेपणाने द्यायला हवं आणि ते देण्यासाठी आधी आपण त्यांना वेळ द्यायला हवा ! आपल्या मुलांना संस्कार शिकवण्यासाठी दुसऱ्या कोणावरतरी अर्धा एक तास अवलंबून ठेवणं हे मला पटत नाही. 

अहो, जे पिंडी ते ब्रम्हांडी!  जे संस्कार आपल्या मुलांना घरातून मिळणार आहेत तेच त्यांना बाहेरच्या जगात टिकवून ठेवणार आहेत. प्रत्येक माणूस चांगलाच असतो, आपल्यामध्येही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या मुलांमध्ये याव्या असं वाटत असेल तर आपण त्यांना तेवढा वेळ द्यायलाच हवा. ‘हट्टीपणा करू नये’ हे त्यांना शिकवायचं असेल तर कुटुंबामध्ये वागतांना, बोलतांना कधीतरी आपणही माघार घ्यायला शिकायला हवं.”हे कर किंवा हे करू नकोस” असं सांगून मुलं ऐकत नाहीत कारण मुलं ही तुम्हाला ऐकून मोठी होत नसतात मुलं ही तुम्हाला बघून मोठी होत असतात ,आणि म्हणूनच त्यांच्या समोर आपण कसं वागतोय यावरून आपण त्यांना काय संस्कार देतोय याची रूपरेषा ठरत असते.

‘सारखा मोबाईल बघू नकोस’ हे मुलांना सांगताना जर तुम्हीच व्हाट्सअप चेक करत असाल तर ते मूल तुमचं ऐकणार नाही.लहान मुलींना मेकअप करायची जरा जास्त आवड असते. कॉस्मेटिक त्यांच्या त्वचेला त्रासदायक ठरू शकतात हे आपल्याला माहिती असतं, म्हणून आपण कित्येक वेळा “त्यांना लिपस्टिक लावू नको” असं आवर्जून सांगतो. हे सांगताना आपलेच ओठ गडद रंगवलेले असतील तर ती मुलगी तुमचं ऐकणार का ?

मुलांसमोर आपण भांडतो, आवाज चढवतो आणि मूलं जेव्हा चिडतात, रागावतात, तेव्हा त्यांचा आरडाओरडा आपल्याला सहन होत नाही. राग आला तर आरडाओरडा करायचे संस्कार आपणच त्यांच्यासमोर दिले ना मग आता त्यांच्यावर चिडून उपयोग नाही. 

तुम्ही मुलांसाठी कायम आदर्श असता. तुम्ही जे करता तेच बरोबर अशी त्यांची लहानपणापासूनच धारणा असते आणि म्हणूनच आपली जबाबदारी वाढलेली असते.

मुलांनी चांगलं वागावं असं वाटत असेल तर सगळ्यात आधी चांगलं वागण्याची सुरुवात आपणच करायला हवी. लहान मुलं ओल्या माती सारखी असतात आणि या मातीला आकार आपणच देऊ शकतो हे खरंतर वापरून झालेलं गुळगुळीत वाक्य आहे पण ते आजही तितकंच खरं आहे. 

तुम्ही जर कधी कुंभाराला मडकं घडवताना बघितलं असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, कुंभाराचा एक हात मडक्याच्या बाहेरून स्थिर असतो पण दुसरा हात मडक्याच्या आतल्या बाजूने हलके हलके फटके मारत असतो. म्हणजेच मडकं घडवताना कुंभाराला दोन्ही क्रिया कराव्या लागतात , एका हाताने मडक्याला फटके मारावे लागतात आणि दुसरा हात स्थिर ठेवून त्या मडक्याला आकारही द्यावा लागतो. आपली हीच भूमिका आहे, जिथे पाहिजे तिथे आपल्याला स्थिर हाताने आधार देता आला पाहिजे आणि जिथे गरज असेल तिथे हलके हलके थापटून त्यांना जागंही केलं पाहिजे. याचा ताळमेळ जमला तर आपला घडा उत्तम बनणार यात शंका नाही. 

मुलांचे संस्कार ही काही त्रिवार्षिक किंवा पंचवार्षिक योजना नाही किंवा  ठराविक अभ्यासक्रम नाही तर ती एक आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही लहानपणीच मुलांना चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची सवय लावली, आजूबाजूच्या उत्तम गोष्टी घेण्याचे संस्कार दिलेत तर त्यांचं आयुष्य हे कायम संस्कारातून घडत राहील आणि ते पुढे इतरांनाही घडवत राहतील.

तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मुलांच्या स्वभावात होणाऱ्या बदलांसाठी किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये मी काही करू शकेल तर माझ्याशी नक्की बोला. तुम्ही ई-मेल करू शकता किंवा मला व्हाट्सअप करून तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न विचारू शकता. भेटूया पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह !

Aditi Morankar
आदिती मोराणकर

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.

[email protected] | 8329932017 / 9326536524