सर्वात वर

नाटक अनलॉक होतंय ! तिसरी घंटा होतेय ..!

मुंबई – कोरोना महामारी मुळे जगातील सर्वच व्यवहार ठप्प झाले होते.लॉकडाऊनमुळे गेली जवळपास ९ महिने नाट्यगृह बंद होती त्यामुळे नाट्यप्रेमींना अनेक दर्जेदार नाटकांना मुकावं लागलं.पण आता प्रतीक्षा संपली आहे कारण येत्या १२ डिसेंबर पासून झी मराठीची प्रस्तुती असलेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकापासून पुन्हा रंगभूमीवर तिसरी घंटा वाजणार आहे.

पुण्यातून या नाटकाचा पुन्हा शुभारंभ होतोय, त्याच बरोबर इतर व्यावसायिक नाटकही सज्ज झाली आहेत, याचेच औचित्य साधून चला हवा येऊ द्या मध्ये निर्मिती सावंत, वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर, अद्वैत दादरकर, कविता मेढेकर, सुनील तावडे, सलील कुलकर्णी, संदीप खरे, राहुल देशपांडे या कलाकार मंडळींनी हजेरी लावली. ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘झी मराठी’ ने पुन्हा सुरु होणाऱ्या नाट्य व्यवसायाला उभारी मिळावी म्हणून पुढाकार घेत रसिकप्रेक्षकांनी सुद्धा नाट्यगृहात न घाबरता सुरक्षेची सगळी काळजी घेऊन येणाऱ्या नाटकांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आहे.

गेली ६ वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘चला हवा येऊ द्या चा मंच’ म्हणजे मराठी नाटक आणि चित्रपटांची जाहिरात आणि प्रसिद्धी चं व्यासपीठ असं जणू समीकरणच झालंय. झी मराठी हि एक अशी वाहिनी आहे जी प्रेक्षकांचे मनोरंजन तर करतेच, पण मराठी चित्र आणि नाट्यसृष्टी च्या अनेक नवनवीन उपक्रमांसाठी देखील पुढाकार घेते आहे.

चला हवा येऊ द्या चा हा “नाटक अनलॉक” विशेष भाग सोमवार ७ ते बुधवार ९ डिसेंबर रात्री ९.३० वा. झी मराठीवर प्रेक्षकांना बघता येणार आहे