सर्वात वर

अश्रूंची झाली फुले…..

एनसी देशपांडे

पार्श्वभूमी
‘प्रभाकर पणशीकर आणि काशिनाथ घाणेकर’ यांनी गाजवलेली ही कलाकृती आजही अनेकांना मोहवीत आहे. या नाटकाने एक इतिहास रचला असून त्याच्या आठवणीत रमण्यात रंगभूमीवरचे कलाकार आणि नाट्यरसिक धन्यता मानतात, हे विशेष! या विषयाचा ‘जर्म’च इतका दमदार आहे की हिंदीत ‘आसू बन गये फुल’ या सिनेमानेही धंदा करून गेला. मग बऱ्याच वर्षानंतर या विषयावर आधारित दिलीपकुमार आणि अनिल कपूर अभिनित ‘मशाल’ या यशस्वी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आणि हा प्रयोग एकदम यशस्वी ठरला होता. त्यामुळे या सेलेबल विषयाचा वापर निर्मात्यांकडून होतच असतो.  

प्रस्तावना

तरी परंतु अशा भक्कम आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवर एखाद्या नवीन संचाने या नाटकाचे पुन:श्च प्रयोग सुरु करणे, हे निश्चितच धाडसाचे होय. साठच्या दशकातलं हे नाटक आज ५०-६० वर्षानंतर नवीन संचात सादर करायचं, म्हणजे एक फार मोठी रिस्कच! दिनेश पेडणेकर हा निर्माता रंगभूमीवर कायम नवनवीन प्रयोग करतच असतो आणि यशस्वीही होतो हे त्याने ‘कोडमंत्र’ या नाटकाच्या निर्मिती आणि यशामधून सिद्ध केले आहे. प्रो.विद्यानंद आणि लालचंद बियाणी उर्फ लाल्या या दोन्ही भूमिका प्रभाकर पणशीकर आणि काशिनाथ घाणेकर या दोन मातब्बर कलाकारांनी गाजवलेल्या असल्याने त्या तोडीचे कलाकारांची निवड करण्याची फार मोठी जबाबदारी दिग्दर्शकावर येते. शिवाय मानवी मुल्यांची कदर करणारा तो काळ आणि आजचा काळ यामध्ये फारच मोठी तफावत असल्याने आजच्या प्रेक्षकांना हा विषय आणि यातील तत्वनिष्ठता पचायला तर हवी ना? दिनेशने निर्मितीचा घाट घातला आणि दिग्दर्शनाची जबाबदारी ‘प्रतिमा कुलकर्णी’ यांच्यावर सोपवली. आजचा आघाडीचा कलाकार आणि घाणेकरांची भूमिका गाजवलेला ‘सुबोध भावे’ याच्या रुपात ‘लाल्या’ तर गवसला, परंतु प्रो.विद्यानंदच्या भूमिकेसाठी तेवढा लायक कलाकार शोधणे, म्हणजे कर्मकठीणच! परंतु ‘शैलेश दातार’ च्या निवडीने हाही प्रश्न सुटला. 

कथासार

आपली आदर्श मुल्यें काटेकोरपणे जपणारे प्रो.विद्यानंद हे त्यांच्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल असतात. या कॉलेजचे आश्रयदाते धर्माप्पा, बेकायदेशीर धंदे करून जमवलेल्या काळ्या पैशांच्या जोरावर दादागिरी करीत असतात. लाल्या हा अन्यायाविरुद्ध लढणारा आणि त्यासाठी प्रसंगी मारामारी करणारा, वरकरणी गुंड भासेल, परंतु चांगल्या विचारांचा आणि प्रवृतीचा विद्यार्थी असतो. या नाटकाचे कथानक मुख्यत्वे या तीन पात्रांभोवती फिरते. आपल्या मुलावर सुरा उगारल्याचा राग येऊन धर्माप्पाशेट लाल्याला कॉलेजमधून बेदखल करण्याचे सांगायला विद्यानंदकडे येतो.त्यावेळी लाल्याही तेथेच हजर असतो. मग अर्थातच या दोघांची बाचाबाची विद्यानंद लाल्याला गप करून आणि धर्माप्पाला जातीने चौकशीचे आश्वासन देऊन थांबवतात. धर्माप्पाशेट आपल्या एकुणात ताकदीची जाणीव विद्यानंदना करून देतात, परंतु ते आपल्या निर्णयावर अढळ असतात. त्याचवेळी लाल्यालाही ते बजावून सांगतात की चौकशीत जर तू दोषी आढळलास तर मी देईन ती शिक्षा स्वीकारायला हवी, आणि लाला ते मान्यही करतो.

सदर चौकशीअंती लाल्याला शिक्षा होते आणि तो निमुटपणे ती उपभोगतोही, परंतु आपण सांगितल्याप्रमाणे त्याला कॉलेजमधून काढून न टाकल्याचा राग येऊन धर्माप्पाशेट इतर प्रोफेसारांच्या मदतीने प्रो.विद्यानंदांना पैशांच्या खोट्या आफरातफरीच्या गुन्ह्यात गुंतवून त्यांचा काटा काढतात आणि त्यांच्या जागी प्रो.विद्यानंदांच्या आश्रयाखाली त्यांच्याच घरात वाढलेल्या श्यामला प्रिन्सिपॉल बनवतात. प्रो.विद्यानंद तुरुंगात सजा भोगत असतांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते ती त्यांची पत्नी ‘सुमित्रा’ आणि त्यांचा मित्र, गुन्हेगारी जगताची चांगलीच ओळख असलेला ‘शंभू महादेव’.शंभू महादेव धर्माप्पाशेटने प्रो.विद्यानंद विरुद्ध केलेल्या कपटकारस्थानाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा घेतो आणि त्याच्या मागावरच असतो.

प्रो.विद्यानंद म्हणजे तत्वनिष्ठता, वैधता आणि मानवता याचा त्रिवेणी संगम असलेलं व्यक्तिमत्व परंतु धर्माप्पाच्या अवैध वृत्तीने त्यांच्यावर आलेल्या प्रसंगांचा एकुणात अनुभव घेतल्यानंतर कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांच्या वृत्तीमधे आमुलाग्र बदल घडतात आणि आपली बुद्धिमत्ता पणाला लाऊन ते धर्माप्पावर सुड घेण्याचा निश्चय करून अंडरवर्ल्डचे ‘डॉन’ बनतात. त्यांची पत्नी सुमित्रा त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु त्यांचा ठावठिकाणा कोणालाच माहित नसतो. तिच्या प्रयत्नांना यश येऊन ती त्यांना भेटतेही परंतु विद्यानंद तिला टाळण्याचा प्रयत्न करतात. आपलं खरं रूप तिला कळून तिने आपला नाद सोडावा, या उद्देशाने ते तिला दुसऱ्या दिवशी विमानतळावर येण्याचं सांगतात.

एकीकडे ‘तत्वनिष्ठव-विद्यानंद-डॉन’ बनत असताना दुसरीकडे गुंड-लाल्या- प्रामाणिक, कर्तुत्ववान आणि धडाडीचा पोलीस अधिकारी ख्याती मिळवून असतो. दुसऱ्या दिवशी विमानतळावर प्रो.विद्यानंद, सुमित्रा आणि लाल्या यांची भेट होते आणि पुढे काय घडतं, ते रसिकांनी समक्षच बघावं….. जुन्या पिढीतल्या नाट्य-रसिकांना, कदाचित या नाटकाचं कथानक पाठही असेल, परंतु आजच्या पिढीला या कथानकात स्वारस्य वाटावं आणि त्यांनी हे नाटक आवर्जून बघावं, केवळ यासाठीच कथासार थोडक्यात मांडला आहे. 

सादरीकरण

पन्नास-साठ वर्षांपूर्वीचं गाजलेल्या या नाटकाने एक इतिहास रचला आहे. अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकार प्रभाकर पणशीकर आणि काशिनाथ घाणेकर यांनी गाजवलेल्या आणि अभिनयाचं प्रमाण मानल्या गेलेल्या भूमिका आजच्या काळात सादर करायच्या, ही कल्पनाच मुळी अत्यंत धाडसाची ठरते. परंतु दिनेश पेडणेकरने हे इंद्रधनुष्य उचललं आणि एक सुंदर ‘टीम’ बनवून आजच्या प्रेक्षकांना ही अजरामर कलाकृती अनुभवण्याचा आनंद दिला. समर्थ नाटककार वसंत कानेटकर यांनी नाट्यपूर्ण घडामोडी, उत्कंठा वाढीस लागेल असं कथानक आणि वेग याचा समतोल राखत प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यश मिळवलं होतं.

काशिनाथ घाणेकरांनी, स्वत:ची अशी एक जगप्रसिद्ध ‘स्टाईल’ वापरून ‘लाल्या’ साकारला होता. या नाटकाचं कथानक जरी प्रो.विद्यानंद यांच्यावर बेतलेलं होतं तरीही लाल्या भाव खाऊन गेला होता. लाल्याला बघण्यासाठीच या नाटकाचे शेकड्याने प्रयोग झाले होते. दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी या पुनर्जीवित नाटकाचं दिग्दर्शन करतांना लाल्याच्या प्रसिद्धीला अव्हेरून हे नाटक प्रो.विद्यानंद यांचंच राहील याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. अर्थात काशिनाथ घाणेकरांच्या लोकप्रियतेने तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला ‘सुबोध भावे’ हाच ‘लाल्या’ साकारणार असल्याने त्या प्रसिद्धीचा वापर करण्याचा मोह प्रतिमा बाईंनी टाळला, ज्याने संहितेशी इमान राखलं, असंच म्हणता येईल! आणि प्रेक्षक जरी सुबोधला बघायला गर्दी करीत असले तरीही तसा आग्रह सुबोधने धरला नसावा, हे सिद्ध होतं.

त्यामुळे या दोघांचं कौतुक करावं, तेवढं कमीच! त्या काळी कानेटकरांनी हे नाटक बरचसं भावनाक्षोम आनंदपर्यवसी लिहिलेलं असलं तरीही आजच्या युगात ते संयुक्तिक नसल्याने या कथानकाला वास्तवतेच्या जवळ नेण्याचा यशस्वी प्रयत्न स्तुत्य होय! प्रत्येक पात्राला संपूर्ण वाव देतांना कथानकाला वा इतर पात्रांना धक्का पोहोचणार नाही, याची काळजी, प्रतिमाबाईंनी निश्चितच घेतली आहे. कदाचित त्यामुळे ‘सुबोध भावे’ चे चाहते नाराज झाले असतीलही, पर्वा नाही. जादुगार नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी प्रो.विद्यानंदांचा प्रशस्त बंगला, डॉनचा अड्डा, तुरुंग आणि विमानतळ दिग्दर्शकबरहुकूम तंतोतंत उभं केलं आहे. प्रकाश योजना त्यांचीच असल्याने नेपथ्य उठावदार होईल याची काळजी घेतली आहे.मिलिंद जोशी याने कथानकाला पूरक पार्श्वसंगीत दिल्याने प्रसंगांच गांभीर्य अधिक गडद होतं.गीता गोडबोले यांची वेशभूषा आणि कमलेश यांची रंगभूषा कलाकारांना पात्रांचा चेहरा देण्यात मदत करतात.

अभिनयानुभव

खरंतर शैलेश दातार आणि सुबोध भावे, तसे समवयस्कच, तरीही शैलेशने प्रो.विद्यानंदचा बाज आणि आब मस्त सांभाळला आहे. त्यामुळे विद्यानंदांची तत्वनिष्ठता, निश्चयीवृत्ती याची जाणीव होते. बदला घेण्याच्या आत्मिकइच्छेने डॉनचा बुरखा पांघरलेला विद्यानंद अंतर्यामी, या प्रवृत्तीच्या विरोधात आहे, हे देहबोलीतून आणि चेहऱ्यावरून जाणवतं.या दोन्ही भूमिका पेलतांनाची प्रो.विद्यानंदांची भावनिक आंदोलने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. यातील दुसरं महत्वाचं पात्र, म्हणजे लाल्या, विद्यानंदांप्रमाणे याही पात्राला दोन बाजू, दोन चेहरे आणि त्यातील द्वंद्व आहेत. सुबोधने दोन्ही बाजू समर्थपणे पेश केल्या आहेत.

मुलत: अन्यायाविरोधातली बंडखोर, निर्विकार आणि बेडरवृत्ती असलेला लाल्या विद्यानंदांचा परीसस्पर्श झाल्याने सुशिक्षित, सुसंस्कृत जीवनशैली गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनलेला सच्चा पोलीस अधिकारी, या बदलासह पित्यासमान लाभलेले प्रो.विद्यानंद, त्यांच्या बाबतीतील अकल्पनीय घटना आणि समोर साक्षत डॉनच्या रुपात अवतरलेले प्रो.विद्यानंद, म्हणजे कर्तव्याची सत्वपरीक्षाच! सुबोधने ही परिस्थिती उत्कृष्टपणे हाताळली आहे.प्रणव जोशी(धर्माप्पा), प्रथमेश देशपांडे(शाम), रवींद्र कुलकर्णी(प्रा.आरोळे), जितेंद्र आगरकर(प्रा.क्षीरसागर) यांनी आपापल्या भूमिका चोख निभावल्या आहेत. उमेश जगताप यांनी साकारलेला शंभू महादेव आणि सीमा देशमुख यांची सुमित्रा, ही दोन्ही पात्र उत्कृष्टच! 

सारांश

या नाटकाचे कथानक तत्वनिष्ठ प्रिन्सिपॉल विद्यानंद आणि त्यांच्या आयुष्यात आलेला कधीही हार खाण्याची आणि माघार न घेण्याची प्रवृत्ती असलेला त्यांच्याच कॉलेजचा विद्यार्थी लाल्या यांच्या आयुष्यातील अकल्पित घटना आणि नशिबाचे फेरे यावर बेतलेले आहे. विद्यानंद लाल्यावर संयतपणे संस्कार करून त्याच्या आयुष्याला एक दिशा देतात. त्यांची ताटातूट होते आणि पुन:श्च जेव्हा ते एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा फुटबॉल खेळाप्रमाणे त्यांची धेय्ये आणि भूमिका पूर्णत: बदललेले असतात. उपकाराची परतफेड करतांना तत्वनिष्ठ लाल्या आपल्या गुरूंना त्यांच्याच तत्वनिष्ठतेची याद देऊन त्यांच्या आयुष्याला दिशा देतो. या संपूर्ण प्रवासात नशिबी आलेले भोग धैर्याने सामोरे जाऊन सकारात्मक विचारांचा आणि तत्वांचा आदर करीत समाजाला एक शिकवण देऊन जातात.

N C Deshpande
एनसी देशपांडे

Mobile- ९४०३४ ९९६५४