सर्वात वर

मेघराज राजे भोसले मित्र परिवारच्या वतीने नाशिकच्या कलाकारांना मदत

नाशिक – कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक कलाकारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे हाती काम नसल्यामुळे प्रपंच कसा सांभाळायचा असा प्रश्न सर्वच कलाकारांवर पडलेला आहे. सध्याच्या परिस्थितीची जाण ठेऊन नाशिक मधील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांना (Nashik Artists) नाशिक येथील मेघराज राजे भोसले मित्र परिवाराच्या वतीने मदत म्हणून किराणा कीट चे वाटप करण्यात आले. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सभागृह कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात एकूण ५० कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते किराणा कीट चे वाटप करण्यात आले. या समारंभात प्रास्ताविकात बोलताना सुनील ढगे यांनी कलावंतांनी संयम ठेवला असून लवकरच सर्व काही सुरळीत होऊन पुन्हा कलावंतांचे सर्वकाही सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त केला. प्रमुख मान्यवर आबा पाटकर यांनी कलाकारांना मदत करण्यामागचा हेतू स्पष्ट करीत जे दानशूर आहेत त्यांनी स्वतः पुढे येऊन कलाकारांना सढळ हाताने मदत करावी असे सांगितले. तर अध्यक्ष भाषणात डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी कलावंतानी खचून न जाता आतापर्यंत जे धैर्य दाखवले त्याचे कौतुक करून सर्वांनी कोरोना महामारीच्या नियमांचे पालन करून काळजी घ्यावी व आपल्या कलेद्वारे पुन्हा एकदा नव्याने उभारी घ्यावी असे आवाहन केले. 

नाशिक जिल्ह्यातील गरजू कलाकारांना मेघराज राजे भोसले मित्र परिवार, नाशिक यांनी केलेल्या  आवाहनाला प्रतिसाद देत आबा पाटकर, शिल्पी अवस्थी, शीतल गायकवाड, अर्चना अहिरराव, नितीन देवरे, कोळप्पा धोतरे, शरदकुमार श्रीवास्तव (निर्माता), संतोष जाधव, प्रशांत कोठवदे, अजित पाटील, अशोक सावंत, मनोज माळी, विजय शिंगणे, अजय बोरसे, गणपत लभडे, गणेश सांगळे यांनी आपले योगदान दिले. 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि बराथे यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदन खरे, रफिक सय्यद, रवि साळवे, उमेश गायकवाड, सुनील परमार, राजेश जाधव व अमित कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी कलावंत व तंत्रज्ञ उपस्थित होते.