सर्वात वर

खाजगी रुग्णालयांच्या मनमानी विरोधात मनसेचा एल्गार ….

नाशिक महानगर पालिका आयुक्तांशी चर्चा करून दिले निवेदन 

नाशिक : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशभरात व विशेषतः महाराष्ट्रात थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये ही कोरोनाच्या रुग्णाची संख्या सातत्याने वाढते आहे. शहरात रुग्णांना बेड हि मिळणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या समवेत चर्चा करीत नाशिक शहरातील खाजगी कोविड सेंटरच्या (Private Hospitals) मनमानीवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक मनपाच्या वतीने भरारी पथके, नोडल अधिकारी नेमण्यात यावे ह्या मागणीचे निवेदन देण्यात आले.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खाजगी कोविड सेंटरच्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार कोरोना रुग्णांवर उपचार होणे अपेक्षित असतांना अनेक खाजगी रुग्णालयांत (Private Hospitals) कोरोना रुग्णांची व त्यांच्या हतबल नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे समोर आले आहे. मनपाच्या साईट वर व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड ऑनलाईन उपलब्ध असतांना प्रत्यक्षात रुग्णांना बेड नाकारण्यात येते व त्यासाठी अव्वाच्या सव्वा रकमेची वसुली करण्यात येते अश्या तक्रारी मनसेकडे आल्या असून खाजगी कोविड सेंटरच्या (Private Hospitals) मनमानीवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक मनपाच्या वतीने भरारी पथके, नोडल अधिकारी नेमण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

या प्रसंगी मनसे नाशिक शहाराहध्यक्ष अंकुश पवार,पंचवटी विभागीय अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, मनविसे नाशिक जिल्हाध्यक्ष शाम गोहाड, शहरउपाध्यक्ष सचिन सिन्हा, शाखा अध्यक्ष बंटी लभडे, शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे, रोजगार स्वयंरोजगार विभाग शहराध्यक्ष सिद्धेश सानप, सौरभ सोनवणे, पंकज बच्छाव आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.