सर्वात वर

२४ जानेवारीला साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर होणार !

Nashik News Update: साहित्य संमेलनात नाशिकच्या साहित्यिकांचा आणि कलावंताचा सहभाग महत्वाचा 

नाशिक (प्रतिनिधी) – (Nashik News) नाशिक शहरात होणाऱ्या  ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भात संमेलनाचे निमंत्रक लाेकहितवादी मंडळाने आज माध्यमांचे संपादक आणि प्रतिनिधींबरोबर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संमेलनात आपल्याला  काय करता येईल यासंदर्भात चर्चा करण्यात आली . संमेलनातील परिसंवाद, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी, शहरातील दिवंगत साहित्यिकांचा विविध उपक्रमांतून सन्मान, डिजीटल माध्यमांचा वापर, पाहुण्यांची व्यवस्था अशा विविध विषयांवर माध्यम प्रतिनिधींनी मते मांडली. साहित्य संमेलनातील विविध कार्यक्रमात नाशिकमधीलही विविध मान्यवर, तज्ज्ञांना सहभागी करून घ्यावे अशी महत्त्वाची सूचना माध्यम संपादक आणि प्रतिनिधींनी केली आहे. 

त्यावर लाेकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले आणि लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी चर्चा करत माध्यम प्रतिनिधी आणि संपादकांकडून आलेल्या सूचनांचे स्वागत करून त्यानुसार नियाेजनात नक्कीच प्रयत्न हाेतील असे सांगितले. यावेळी माध्यम प्रतिनिधी आणि संपादकांनी  संमेलन स्थळची पाहणी केली यावेळी रमेश देखमुख, संजय करंजकर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित हाेते. 

संमेलनाच्या आदल्या दिवशी शहरातील कलाकारांचा कार्यक्रम

संमेलनस्थळी संमेलनाच्या आदल्या दिवशी शहरातील कलाकारांचा साहित्य, संस्कृतीशी संबंधीत एक कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने नियाेजन करण्यात येणार आहे. तसेच लहान मुलांसाठीही संमेलनाच्या आधी काही करता येईल का ? यावर देखील चर्चा झाली. कुसुमाग्रजांचा जन्मदिन २७ फेब्रुवारीपासूनच विविध कार्यक्रम सुरू करावे म्हणजे वातावरण निर्मिती हाेईल अशीही  सूचना आली .त्याचेही यावेळी स्वागत झाले. 

२६ ते २८ मार्च रोजी संमेलन होणार ?

यावेळी साहित्य संमेलन हे मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात  हाेणार असल्याची चर्चा आतापर्यंत चांगलीच रंगली. मात्र आता  माध्यम प्रतिनिधीं साेबत झालेल्या बैठकीत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात २६ ते २८ मार्च दरम्यान संमेलन घेण्याचे नियाेजन हाेऊ शकते असाही एक मुद्दा आला .मात्र या अधिकृत निर्णय  २४ जानेवारी रोजी  साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांबराेबर हाेणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार असून त्यानंतर संमेलनाच्या अधिकृत तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते आहे. (Nashik News)