सर्वात वर

Nashik : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदा गौरव ,नाट्य परिषदेचा कार्यक्रम स्थगित

 नाशिक- नाशिक मध्ये वाढत्या कोरोना ( Nashik Corona)रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रज प्रतिष्ठानने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी २०२१ रोजी कालिदास कलामंदिर येथे आयोजित केलेला गोदावरी गौरव पुरस्कार तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखे तर्फे आयोजित शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी वि. वा. शिरवाडकर,  वसंतराव कानेटकर, आणि बाबुराव सावंत पुरस्कार स्थगित करण्यात आले आहे.

कोविडची (Nashik Corona) पार्श्वभूमी बघता सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून हा पुरस्कार सोहळा शासनाच्या पुढील निर्देशांपर्यंत स्थगित करण्यात आल्याचा निर्णय कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा.रवींद्र कदम कार्यवाह सुनील ढगे यांनी कळवले आहे. 

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे निवेदन 

वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आयोजित केलेला गोदावरी गौरव पुरस्कार समारंभ स्थगित केला आहे. या पुरस्कार समारंभाचे आयोजन शनिवार दि. २७ फेब्रुवारी रोजी  महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले होते. एक वर्षाआड दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा गोदावरी गौरव म्हणजे आपल्या विशिष्ठ क्षेत्रात असामान्य कामगिरी करून भारतीय समाजाचे सांस्कृतिक, सामाजिक जीवन समृद्ध करणा-या महनीय व्यक्तींना प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञतेचा नमस्कार असतो.

मागील वर्षीही हा पुरस्कार कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे शासनाच्या निर्णयानुसार स्थगित करण्यात आला होता. तो या वर्षी २७ फेब्रुवारी रोजी होणार होता. प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या आज सायंकाळी झालेल्या बैठकीत मा. अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा पुरस्कार वितरण सोहळा स्थगित

नाट्य परिषदेतर्फे शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी वि. वा. शिरवाडकर,  वसंतराव कानेटकर, आणि बाबुराव सावंत पुरस्कार प्रदान करण्यात येणार होते. कोविडची पार्श्वभूमी बघता सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून हा पुरस्कार सोहळा शासनाच्या पुढील निर्देशांपर्यंत स्थगित करण्यात आल्याचा निर्णय नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. 

दरम्यान दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी परिषदेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची सर्व तयारी झाली असून कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र शहरातील सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम स्थगित होत असल्याने सामाजिक बांधिलकी ठेवत हा कार्यक्रमही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसदीबद्दल क्षमस्व
आपले 

प्रा रवींद्र कदम, अध्यक्ष

सुनील ढगे, प्रमुख कार्यवाह