सर्वात वर

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना पाठवले सक्तीच्या रजेवर

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कोरोना आढावा बैठकीनंतर घेतला निर्णय,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना तासाभरातच पाठवले सक्तीच्या रजेवर

नाशिक- ( Nashik Corona Update )नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे.दररोज २ हजाराच्या पुढे रुग्ण वाढता आहेत.नाशिक मध्ये रुग्णालयात बेड मिळत नाही.व्हेंटिलेटर बेड मिळत नाही अशी नागरिकांची सातत्याने तक्रार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल नाशिक शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठक राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल पार पडली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा रुग्णालयातील दिरंगाई आणि गलथान कारभाराबाबत तातडीने आरोग्य मंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर तासाभरातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी नाशिक जिल्ह्यासाठी २२८ व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून त्यातील केवळ १९६ व्हेंटिलेटर बसवण्यात आले. त्यातील केवळ ग्रामीण मध्ये सात आणि जिल्हा रुग्णालयात सात असे एकूण १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर रुग्ण उपचार घेत आहे.जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या ८० व्हेंटिलेटर पैकी फक्त ७ व्हेंटिलेटर रुग्णांच्या वापरात होते आणि पैकी ७३ व्हेंटिलेटर हे नॉन कोविड भागात विनावापर पडून आहेत.तसेच २३ व्हेंटिलेटर अद्याप कार्यान्वित न करता तसेच जिल्हाभरात पडून आहेत.व्हेंटिलेटर न मिळाल्याने एकीकडे रुग्ण दगावत असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील अशा हलगर्जीपणामुळे पालकमंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.


तर विभागीय मुख्यालय असलेल्या नाशिक जिल्हा रुग्णालयात केवळ १००  बेड् कोरोनसाठी ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयामधील डेडिक्टेड कोरोना (Nashik Corona Update)रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले नाही.या हलगर्जीपणा आणि दिरंगाई बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाही.

जिल्ह्यात कोरोनाची ( Nashik Corona Update)परिस्थिती गंभीर असतांना जिल्हा रुग्णालयाकडून होत असलेल्या दिरंगाई बाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर तातडीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क करून ही गंभीर परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर तासाभरातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.