सर्वात वर

Nashik : आजच्या लसीकरणाबाबत महानगरपालिकेचे स्पष्टीकरण

४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण बंद राहणार !  

नाशिक – नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये  ४५वर्षाच्या वरील नागरीकांचे लसीकरण (Vaccination) बंद राहणार आहे. कोरोना  प्रतिबंधात्मक लसीकरण शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे सुरू आहे. या आधी ४५ वर्ष वयापेक्षा जास्त नागरिकांना लस घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ४५ वर्ष वयापेक्षा जास्त नागरिकांनी त्यांच्या लसीचा पहिला डोस हा घेतलेला आहे. परंतु पूर्वीच्या शासन मार्गदर्शक सूचनांनुसार एक महिन्यानंतर दुसरा डोस घेणे अभिप्रेत होते परंतु सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सदरचा डोस हा सहा ते आठ आठवड्या नंतर घेण्यात यावा अशा मिळाल्या आहेत. तरीही नागरिक  लसीकरण (Vaccination) केंद्रावर दुसरा डोस घेण्याकरिता गर्दी करत आहे.  शासनाकडून मिळणारा  लसीचा साठा हा सद्यस्थितीत मर्यादित कमी प्रमाणात येत असल्या कारणाने ज्या प्रमाणात दुसऱ्या डोसचे लसीकरण होणे अपेक्षित होते त्या प्रमाणात लसीकरण सध्या करणे शक्य होत नाही. 

यासोबतच १८ ते ४४ वर्ष वयोगटासाठी लसीकरण (Vaccination) मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. सदरची लस ही फक्त वय वर्ष १८ ते ४४ या वयोगटासाठी वापरणेबाबत सुचना आहेत. १८ वर्षे ते ४४ वर्ष या वयोगटातील नागरिकांना लस घेण्याकरिता प्रथम लसीकरणाच्या वेबसाईटवर स्वतःची नाव नोंदणी करावी लागते व त्यानुसार मिळालेल्या टाईम स्लॉट नुसार लस केंद्रावर जाऊन लस घ्यावी लागते या नोंदणी दरम्यान टाईम स्लॉटमध्ये जेवढे व्यक्ती अपेक्षित आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये राज्य शासनाकडून प्राप्त होत असल्याकारणाने सदरची लस हे दुसरा डोस करिता ४५ वर्षापेक्षा जास्त नागरिकांना वापरता येत नाही. 

याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठ पुरवठा सुरु असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोविड लसीकरणाच्या पहिला / दुसरा डोस साठी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे काटेकोर पालन करावे. नाशिक महानगरपालिकेकरिता पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नागरिकांकरिता कोविड ची कोव्हॅक्सीन लस उपलब्ध झाल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ सर्व प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, फेसबुक, ट्विटर व महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळाद्वारे दिली जाते. यामध्ये किती लस आली आहे याचा सुद्धा उल्लेख असतो त्यानुसारच नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी न करता लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन मा.आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.