सर्वात वर

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक – नाशिकचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Suraj Mandhare) यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दीड वर्षांपासून नाशिक जिल्ह्याची कोरोनाची परिस्थिती ते अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ते हाताळत होते. 

कोरोनाच्या पहिल्या आणि आणि दुसऱ्या लाटेने तर नाशिक जिल्ह्यात अक्षरशः कहरच केला. पहिल्या लाटेत मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. मालेगांवमध्ये कोरोना व्यवस्थापन करतांना जिल्हा प्रशासनाचा अक्षरशः कस लागला होता. तर दुसर्‍या लाटेत नाशिक शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. या काळात जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा, रूग्णालयातील बेड मॅनेजमेंट करतांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्‍यांवर जबाबदारी टाकण्यात आली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ती यशस्वीपणे पेलली.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत  प्रशासनातील अनेक अधिकारी कोरोना बाधित झाले. यावेळी जिल्हाधिकारयांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असता ती निगेटिव्ह आली. परंतु आता दुसरी लाट ओसरत असतांना तसेच आता कुठे जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकारी मागील तीन दिवस पुणे येथे गेले होते दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी हे पुणे येथून परतले.