सर्वात वर

Nashik : प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांचे निधन

नाशिक – स्त्री मुक्ती चळवळीला प्रोत्साहान देणाऱ्या धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या ,शेतकरी आंदोलनांत सक्रिय असणार्‍या आणि आपल्या लेखणीतून सामाजिक भान जोपासणार्‍या पत्रकार,प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे (Anita Pagare) यांचे आज रविवार (दि.२८) कोरोना मुळे निधन झाले.अनिताताई महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्याने लेखन करायच्या. समाज माध्यमांवरही त्या मोकळेपणाने विचार मांडायच्या. यांच्या जाण्याने नाशिकच्या सामाजिक चळवळीला मोठी हानी पोहचली आहे. त्यांची ‘वस्तीवरची पोरं’ ही मालिका आणि त्यानंतर प्रसिद्ध झालेला कथासंग्रह विशेष गाजला होता.

पोलीस विभागात त्यांनी बरेच वर्ष समुपदेशक आणि प्रशिक्षक म्हणून काम केले. महिलाच्या  बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचेही त्यांनी मोठे काम केले. याच कामाचा एक भाग म्हणून त्यांनी एका मल्टिनॅशनल कंपनीतही मोठे काम त्यांच्या प्रयात्नातुन उभे राहिले होते. राष्ट्र सेवा दलात कार्यरत असताना समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी त्या सातत्याने प्रयत्न करत राहिल्या.  

लॉकडाऊन काळात त्यांनी विविध संस्थांच्या सोशल माध्यमांवर जेंडर, विशाखा गाईड लाईन यासंदर्भात प्रशिक्षण दिले. स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नांवर त्यांनी मोठा लढा दिला होता संगिनी महिला जागृती मंडळाच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या.

अनिता पगारे (Anita Pagare) यांची प्राणज्योत रविवारी सकाळी मालवली.त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता.घंटागाडी कामगारांच्या प्रश्नांवर लढा उभा करणारे मनोहर आहिरे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे.  

शोकसंदेश

समाजाचे बदलणारे प्रश्न यांची सखोल जाण,अभ्यासू पण ,लोकसंग्रह,समोरच्याला समजुन घेण्याची आस या गुणांवर अनिता पगारे कायमच वर्तमानाचा विचार करणारी लढवय्यी कार्यकर्ती होती.समोर जे घडते आहे त्यात परिवर्तवादी जाणिवेतून बघणे व दृष्टिकोन बदलणे यावर तिचा भर असे.
स्त्रीमुक्ती ,वंचित वर्गाचे प्रश्न ,  भूमिहीन वर्गाचे प्रश्न , तसेच शालेय पातळीवरील मुलींचे  भावविश्व जाणून घेऊन तळागाळापर्यंत ती पोहोचली त्यामुळे तिच्या संघर्षाला टोकदार धार होती,शासन पातळीवर त्यासाठी अनिताने लढा दिला व त्यात यशस्वी झाली.परिसंवाद,मेळावे,मोर्चे यातून समुहापर्यंत जाण्याचे व प्रबोधनाचे माध्यम तिने मानले.
लेखणी व विचार यांची सांगड घालून तिची लढाई होती,त्यातूनच वस्तीवरची पोरं, जेंडर गोष्टी सारखं लेखन बहुचर्चित ठरलं.अनिताने उभे केलेले काम,सामाजिक तेचा वसा आपण सारे पुढे नेऊया
हीच भावपूर्ण श्रद्धांजली.,.

विश्र्वास जयदेव ठाकूर
कार्याध्यक्ष
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र, नाशिक