सर्वात वर

Nashik News : ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.जयंत नारळीकर

नाशिक- (Nashik News) नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारतीय खगोल शास्त्रज्ञ ज्येष्ठ विज्ञान लेखक पद्मविभूषण डॉ .जयंत नारळीकर यांची एक मताने निवड करण्यात आली असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.हे साहित्य संमेलन  २६ ते २८ मार्च २०२१ रोजी नाशिक येथे होणार असल्याचे ही ढाले-पाटील  यांनी सांगितले. 

नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या निमंत्रणाचा स्वीकार करून ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला करण्याचा मान नाशिककरांना मिळाला आहे. काल आणि आज साहित्य महामंडळाच्या बैठकीचे नाशिक मध्ये आयोजन करण्यात आले होते या बैठकीत हा निर्णय झाल्या नंतर पत्रकार परिषदेत हि माहिती देण्यात आली. (Nashik News)

नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली. या त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत – गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. 

१९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.१९६७– ७२ मध्ये ते केंब्रिज विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरेटिकल ॲस्ट्रॉनॉमी या संस्थेच्या अध्यापन व संशोधन वर्गाचे सदस्य होते. १९७३–७५ या काळात ते जवाहरलाल नेहरू फेलो होते. १९७४ पासून ते इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे फेलो आहेत. १९७६ साली ‘इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी’ने फेलोशिप देऊन त्यांच्या संशोधन कार्याचा गौरव केला. ऑक्टोबर १९७२ पासून ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे खगोलीय भौतिकीचे प्राध्यापक म्हणून कार्य करीत आहेत.

नारळीकर यांनी आर्. जे. टेलर, डब्ल्यू. डेव्हिडसन आणि एम्. ए. रूडरमन यांच्या समवेत ॲस्ट्रोफिजिक्स (१९६९) आणि फ्रेड हॉईल यांच्या समवेत ॲक्शन ॲट ए डिस्टन्स इन फिजिक्स अँड कॉस्मॉलॉजी (१९७४) हे ग्रंथ लिहिले. तसेच स्ट्रक्चर ऑफ द युनिव्हर्स (१९७७). हा त्यांचा ग्रंथही प्रसिद्ध झाला आहे. खगोलीय भौतिकी, गुरुत्वाकर्षण, विश्वोत्पत्तिशास्त्र इत्यादी विषयांवरील त्यांचे सत्तरहून अधिक संशोधनात्मक निबंध आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत. याखेरीज त्यांनी काही विज्ञान कथा लिहिलेल्या असून वैज्ञानिक विषयांवर सुलभ भाषेत व्याख्याने देण्यासंबंधी त्यांची ख्याती आहे.

नाशिकचे मराठी साहित्य संमेलन हे नक्कीच ऐतिहासिक ठरेल -पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ तसेच साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे होणारे मराठी साहित्य संमेलन हे नक्कीच ऐतिहासिक ठरेल असा विश्वास आहे.
_____________________________

नाशिक येथे होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ जयंत नारळीकर यांची निवड होणे हा एक अत्यंत आनंददायी क्षण आहे.
रटाळ वाटणाऱ्या शास्त्रीय संकल्पना रसाळ करून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या श्री नारळीकर यांना साहित्यिक शास्त्रज्ञ म्हणावे की शास्त्रीय साहित्यिक म्हणावे असा संभ्रम होतो.
विज्ञानवादाची कास धरणाऱ्या आजच्या पिढीला त्यांच्याच भाषेत बोलणाऱ्या आणि जुन्या नव्याची योग्य सांगड घालणाऱ्या अशाच अध्यक्षांची गरज होती..  ती नाशिक नगरीत पूर्ण होत आहे हा दुहेरी आनंद!

– सूरज मांढरे,
जिल्हाधिकारी नाशिक 

__________________________________

मंत्र भूमी ते यंत्र भूमी ओळख असलेल्या नाशिक शहरात होत असलेल्या ९४ वे साहित्य संमेलनास डॉ जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक साहित्यिक लाभणे निश्चितच समर्पक आहे. करोना नंतरच्या जगात वैज्ञानिक क्षेत्राचे महत्त्व पुन्हा एकदा आधोरेखित झालेच आहे. डॉ नारळीकरांच्या रूपाने साहित्याच्या ललित रुपापासून वैज्ञानिक पर्यंत सर्व समावेश संमेलन होईल यात शंका नाही. डॉ नारळीकरांचे अभिनंदन आणि नाशिककरां तर्फे संमेलनासाठी हार्दिक स्वागत. 

जयप्रकाश जातेगांवकर

(Nashik News)