सर्वात वर

बाबाज् थिऄटर्स तर्फे रविवारपासून “लोकोत्सव” सांस्कृतिक सोहळा

नाशिक (Nashik News) : बाबाज् थिऄटर्स आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (७) पासून “लोकोत्सव २०२१” सांस्कृतिक सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहोळ्याचे खास आकर्षण म्हणजे नाशिककर रसिकांचा भेटीसाठी झी मराठी वहिनी वरील सुप्रसिद्ध मालिका “माझा होशील ना” यातील सर्वांचे लाडके कलाकार आदित्य व सई उपस्थित राहणार आहेत. सोबत लेखक व निर्माते सुबोध खानोलकर हे देखील नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. दिनांक १३ पर्यंत दररोज भरगच्च कार्यक्रमांची विनामूल्य मेजवानी मिळेल. हे सर्व कार्यक्रम दररोज सायंकाळी ६ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होतील. 

रविवार, दि.७ रोजी लोकोत्सवाच्या प्रारंभी आर.एम.ग्रुप प्रस्तुत “रंग मऱ्हाटमोळा” हा लोकसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. ३५ कलाकारांचा संच नृत्य, गायन, वादनाने बहरलेला आगळावेगळा कार्यक्रम सादर करतील. सोमवार, दि.८ रोजी पाटेकर ब्रदर्स प्रस्तुत “बॉलिवूड हिट्स” हा हिंदी गीतांचा कार्यक्रम होईल. यावेळी मोहम्मद रफी, मुकेश, किशोर, लता, आशा अशा दिग्गज पार्श्वगायकांनी गायलेली सुमधुर गाणी कलाकार सादर करतील.

मंगळवार, दि.९ रोजी बाबाज् थिऄटर्स निर्मित “आपली आवड” ही सुरेल संगीताची मैफल सजणार आहे. संगीत संयोजन अमोल पाळेकर ह्यांचे असून झी मराठी सारेगमप मधील चैतन्य कुलकर्णी व झी युवा संगीत सम्राट मधील श्रावणी महाजन सहभागी होणार आहेत. यांच्या सोबत नाशिक मधील युवा गायक व वादक कलाकार विविधरंगी मराठी गाणी सादर करतील. बुधवार, दि.१० रोजी उत्सव झी मराठीचा या कार्यक्रमात कलाकारांशी थेट संवाद साधता येईल.

अभिनेत्री पल्लवी वैद्य व अधोक्षज कऱ्हाडे यांचे सुत्रसंचलन असेल. “महाराष्ट्राची लावण्यवती” या स्पर्धेत विजेती झालेली शिरीन दत्ता पाटील व उपविजेती क्षमा देशपांडे यांचा बाबाज् थिऄटर्स तर्फे सन्मान करण्यात येणार आहे. क्षमा देशपांडेचा नृत्याविष्कार यावेळी अनुभवायला मिळेल.  झी मराठीच्या अनेक सेलिब्रेटींमुळे हा सोहळा दिमाखदार होईल.

गेल्या २० वर्षांपासून बाबाज् करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यांत येते. यंदा दि.११ ते १३ दरम्यान सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत स्पर्धा होणार आहे. राज्यभरातून सुमारे ७३ संघांनी नोंदणी केली असून, त्यातील निवडक ३० संघ यात सहभागी होतील. सांघिक पारितोषिके प्रथम रूपये २० हजार, द्वितीय रूपये १५ हजार, तृतीय रूपये १० हजार, तसेच ५० हजार रूपयांची वैयक्तीक पारितोषिके देण्यात येणार आहेत. काल (दि.४) झालेल्या पत्रकार परिषदेत बाबाज् थिऄटर्सचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत जुन्नरे यांनी अशी माहिती दिली.

हा लोकोत्सव प्रामुख्याने सुनील भाऊ बागुल व शम्भूराजे बागुल यांच्या वाढदिवसाचा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे आणि दरवर्षी न चुकता याच कालावधीत हा लोकोत्सव साजरा केला जाईल. धर्मवीर युवा प्रतिष्ठान हे तरुणांच्या मनातील न सुटणाऱ्या प्रश्नांचा आढावा घेऊन त्याचे योग्य निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील असतात, असे किशोर (बंटी) बागुल यांनी पत्रकार परिषदेत खास नमूद केले.

नाशिककरांनी या विनामूल्य सोहोळयाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यांत आले. संपूर्ण सोहोळयात कोविडच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात येईल. यावेळी राजेश पिंगळे, विजय निकम, किसन बल्लाळ, अमोल पाळेकर, प्रवीण कांबळे, जगदीश जंगम, विजय राजेभोसले, विक्रम बल्लाळ, कैलास पाटील आदी संयोजक उपस्थित होते.(Nashik News)