सर्वात वर

मदत वेल्फेअर ट्रस्टचा पुरस्कार नाशिकच्या ‘गोदातीर्थ’ समुहास घोषित

नाशिक :- (Nashik News) गेल्या तीन वर्षांपासून वृत्तबद्ध कविता, गझल किंवा मुक्तछंद अशा कविता प्रकारांना चालना आणि नवीन कवींना प्रोत्साहन देणाऱ्या ‘गोदातीर्थ समूह ‘ अर्थात या समूहाचे संस्थापक संतोष वाटपाडे यांसह संचालक मंडळास पुणे येथील मदत वेल्फेअर ट्रस्टचा ‘ प्रतिभा गौरव पुरस्कार ‘ घोषित करण्यात आला आहे.             

मराठी साहित्यात जिला मातृसमान मानले जाते ती वृत्तबद्ध कविता गझलेच्या गर्दीत आणि मानसन्मानात काहीशी नामशेष होऊ पाहत असताना तिला नव्या पुनरुज्जीवन देण्याचे काम गोदातीर्थ या कविता समूहाने गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने सुरू ठेवले आहे. ज्या काव्यप्रकाराला अवघड किंवा कृत्रिमतेच्या नावाखाली व्यर्थ डावलले गेले त्याच कवितेची सहजता आणि नैसर्गिकता जगासमोर नव्या रुपात आणण्यासाठी अथक मेहनत करून एक मोठी चळवळ (Nashik News) नाशिकच्या गोदातीर्थ समूहाने उदयास आणली.

वृत्तबद्ध कवितेची जोपासना ,संवर्धन आणि प्रसार व्हावा या वृत्तबद्ध कवितेतील अग्रणी नाव असलेले प्रसिद्ध कवी संतोष वाटपाडे( नाशिक) यांनी २०१७ साली गोदातीर्थ या वृत्तबद्ध समूहाची स्थापना करून समकालीन कवितेला एक नवे उभारीचे व्यासपीठ दिले. 

या समूहात नव्याने वृत्तबद्ध कविता लिहू पाहणाऱ्या कवींना जशी चालना दिली तशीच चालना आधीपासून काव्यक्षेत्रात रुळलेल्या कवींनाही दिली. अक्षरछंद, मात्रा वृत्ते आणि अक्षरगणवृत्ते हाताळून झाल्यानंतर समूहातील सदस्यांकडून कवितेचे रसग्रहण , कविता समिक्षण तसेच अनेक नवनवीन प्रयोग करवून घेतले जातात. सर्वात महत्वाचे म्हणजे गोदातीर्थ समूह गेल्या तीन वर्षांपासून विनामूल्य ही साहित्यसेवा करत आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातल्या शहरांमधील , गावांमधील कवी या चळवळीत सामील झाले आणि आशय संपन्न दर्जेदार वृत्तबद्ध कविता लिहू लागले हेच या समूहाचे यश आहे. 

पुण्याच्या कोथरूड येथील मनोहर हॉलमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ५ हजार रु.रोख रक्कम, मानपत्र,सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून समूहाचे संस्थापक संतोष वाटपाडे  संचालक मंडळातील डॉ. अमितकुमार खातू ,संजय गोरडे, सहसंचालक निरुपमा महाजन, चिंतामणी जोगळेकर, प्राजक्ता वेदपाठक, अभिजित जोशी आणि प्रा.अश्विनी देशपांडे आदी साहित्यिक या पुरस्काराचा स्वीकार करणार आहे.