सर्वात वर

ज्येष्ठ छायाचित्रकार राम पोतदार यांचे निधन

नाशिक – (Nashik News) नाशिकमधील अनेक छायाचित्रकारांना घडवणारे छायाचित्रण क्षेत्रातील गुरु पोतदार फोटो स्टुडिओचे संचालक राम पोतदार यांचे आज निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. आज सायंकाळी नाशिक मधील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी,जावई,बंधू छायाचित्रकार अशोक पोतदार,सुरेश पोतदार असा परिवार आहे. 

वृत्तपत्र छायाचित्रणात आपला वेगळा ठसा राम पोतदार यांनी उमटवला होता. वृत्तपत्र छायचित्रकारां पासून सर्वच छायाचित्रकारांना  मार्गदर्शन करणारे छायचित्रणकले मधील गुरुच्या निधनामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया अनेक छायाचित्रकारांनी दुःख व्यक्त केले आहे. 

नाशिक मध्ये गेली चार दशकापासून पोतदार स्टुडिओच्या माध्यमातून वृत्तपत्र छायाचित्रणापासून छायाचित्रण क्षेत्रात रामभाऊ पोतदार यांचा मोलाचा वाटा होता.नाशिक मधील दैनिक गांवकरी .देशदूत,लोकमत,सकाळ,रामभूमी,दैनिक भ्रमर मध्ये त्यांनी अनेक वर्ष फोटोग्राफी केली. नाशिकमधील सर्वच वृत्तपत्रात पोतदार स्टुडिओच्या माध्यमातून राम पोतदार यांनी अनेकवर्ष छायाचित्रणाचे काम केले. 

छायाचित्रकारांना मार्गदर्शन करणारा एक व्रतस्थ छायचित्रकार हरपला – छगन भुजबळ
नाशिकमधील ज्येष्ठ छायाचित्रकार राम पोतदार यांचे दुःखद निधन झाले. छायाचित्रण क्षेत्रातील ते एक समर्पित व्यक्तिमत्त्व होते.नाशिकमधील छायाचित्रकारांचे ते गुरु होते. वृत्तपत्र छायाचित्रणात आपला वेगळा ठसा राम पोतदार यांनी उमटवला होता. त्यांच्या निधनाने वृत्तपत्र छायचित्रकारां पासून तर हौशी छायाचित्रकारांना मार्गदर्शन करणारा एक व्रतस्थ छायचित्रकार हरपला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.

भावपूर्ण श्रद्धांजली
छगन भुजबळ
मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य

फोटोग्राफी क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला – चंदुलाल शहा (संपादक दैनिक भ्रमर)

रामभाऊंच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्काच बसला. शहरातील प्रमुख वृत्तपत्रांना अनेक दिवस चांगले फोटो कमी वेळेत देण्याचा त्यांचा हातखंडा होता. भ्रमरसाठी अनेक वर्ष त्यांनी छायाचित्राचे काम केले. अतिशय मेहनती असणारा फोटोग्राफर आपण गमावला आहे. स्टुडिओतील इनडोअर फोटोग्राफी तसेच पूर्वीच्या काळी फोटो डेव्हलप करण्याच्या कामात ते माहिर होते. भ्रमर परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !

नाशिक शहर  छायाचित्रकार संघटनेचा मार्गदर्शक हरपला – हिरामण सोनवणे (संस्थापक अध्यक्ष शहर छायाचित्रकार संघटना )

स्वर्गीय रामभाऊ पोतदार नाशिकच्या छायाचित्रकार संघटनेचे आधारस्तंभ होते. १९८२ पासून माझे आणि त्यांचे संबंध होते. नाशिकच्या छायाचित्रकार संघटनेच्या उभारणीसाठी त्यांचे मोलाचे योगदान होते.त्याकाळात व्हिडीओग्राफी म्हंटले कि फक्त रामभाऊचं असे समीकर होते फोटोग्राफी क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना नियमित मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक हरपला 

एक गुणी छायाचित्रकार हरपला – अर्जुन गुप्ता 

नाशिकमधील एक गुणी छायाचित्रकार सर्व छायाचित्रकारांना जोडणारा दुवा आणि सर्वांचा मार्गदर्शक हरपल्याची भावना स्नॅप कलर लॅब चे संचालक अर्जुन गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.

(Nashik News)