सर्वात वर

Nashik News : नविन वर्षात सगळं सकारात्मक घडो हीच अपेक्षा – छगन भुजबळ

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा

मुंबई – (Nashik News )कोरोनाच्या संकटामुळे आपल्या सर्वांनाच हे वर्ष अतिशय खडतर गेले आहे.पण आता आपण २०२० ला निरोप देऊन २०२१ चे स्वागत करणार आहोत. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात सर्व सकारात्मक घडो अशी अपेक्षा करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नवीन वर्षाच्या राज्यातील जनतेला नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना  भुजबळ म्हणाले की, नवीन वर्षाची सुरवात होत असताना आपण मागच्या वर्षा मध्ये नेमकं काय घडलं आणि ते वर्ष कसे गेले याचा मागोवा घेत असतो पण मागच्या वर्षी आलेल्या कोरोना महामारीने सर्वांनाच वेठीला धरले यात कोरोडो लोकांना कोरोनाची लागण झाली, काही लाख लोक मृत्यमुखी पडले,तर काही लाख लोकांना कोरोना नंतरच्या आजारांना, विविध व्याधींना सामोरे जावे लागत आहे. पण अशा संकटात देखील डॉक्टर,प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जनतेची सेवा केली आणि अनेक लोकांना या आजारातून वाचवले.

नाशिक जिल्ह्यातील कोरोना संकटावर बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात सुद्धा सुरवातीला कोरोनाचे रुग्ण नव्हते पण नंतर मालेगाव आणि नाशिकमध्ये याचा प्रादुर्भाव वाढला त्यावेळी नाशिकमध्ये प्रशासकीय यंत्रणांनी मोठे कष्ट घेतले,अगदी जीव धोक्यात घालून लोकांना या आजारातून वाचवण्यासाठी मदत केली. 

नाशिकमध्ये कोरोनाचे आकडे वाढत असताना आपण चांगली व्यवस्था उभी केली यात सर्व हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था केली, ठक्कर डोम मध्ये कोविड सेंटर उभारले, ऑक्सिजन,औषधे यांची व्यवस्था केली आणि कोरोणाशी मोठा लढा दिला आणि आज ह्या सर्व सेंटरमध्ये बेड शिल्लक आहेत, ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा आहे आणि आपली सर्व यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

यावेळी कोरोनाच्या या संकटात अनेकांनी आपले जीव गमावले त्याबद्दल छगन भुजबळ यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर भुजबळ यांनी नवीन वर्षाच्या स्वागत करतानाच आपल्यावर आता मोठी जबाबदारी आहे. आपण हे नवीन वर्ष आपल्या घरात कुटूंबियांसोबतच साजरे करूया आणि एकमेकांना शुभेच्छा देऊया की कोरोनाचे संकट लवकर दूर होवोत अशी अपेक्षा व्यक्त केली आणि सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या.