सर्वात वर

नाशिकमध्ये तूर्त लॉकडाऊन नाही -छगन भुजबळ

नाशिक – नाशिक मध्ये तूर्त लॉक डाऊन (Lockdown) होणार नाही असे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली त्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले लॉक डाऊन (Lockdown)करायचा असल्यास त्यासाठी  पुरेसा वेळ दिला जाईल. सध्यातरी लॉकडाऊन (Lockdown) न करता रुग्णांची सोय त्याच प्रमाणे गृह विलगीकरण मध्ये असलेल्या    रूग्णांकडून नियमावलीचा भंग केला जात असेल तर त्यांना कोविड केअर सेंटरला आणण्यात येईल.बेडची ऑक्सिजनची क्षमता वाढवणे त्याच प्रमाणे व्हेंटिलेटरची व्यवस्था पूर्ण क्षमतेने वापरणे या गोष्टींवर भर देण्यात येणार आहे.रूग्णालयात बेडस मिळत नसल्याने रूग्णांचे हाल होत आहे त्यामुळे खाजगी रूग्णालयातील ८० टक्के बेडस अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या बैठकीत दिले.

तसेच पुढील तीन दिवसांत जिल्हा रूग्णालयात ३०० बेडसची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगत पुन्हा सोमवारी (दि.५)आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.नाशिक जिल्ह्यात एकूण २२८ व्हेंटिलेटर आहेत.असे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

ज्या कोव्हीड रुग्णांची सोय घरात होऊ शकत नसेल त्याला तातडीने विलगीकरण कक्षात घेऊन यायचे आहे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तुर्तास पोलीस आयुक्त तसेच पोलिस अधिक्षकांनी रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात एक खाजगी रूग्णालय अधिग्रहीत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रूग्णांना बेड मिळावे याकरीता तातडीने उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आले असून सोमवारी मी स्वतः पाहणी करणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पांडेय, मुख्याधिकारी लीना बनसोड, ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, अन्न, औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त डॉ.माधुरी पवार, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निखिल सैंदाने, डॉ.प्रशांत खैरे, डॉ.अनंत पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे मुख्यालय आहे. ओघानेच येथील आरोग्य विषयक सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी विभागातल्या विविध जिल्ह्यातून रूग्ण येतात. प्रत्येक रूग्णाला उपचारासाठी आपण सज्ज रहायला हवे. सर्वप्रथम शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करून बेड, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजनच्या पुरेशा साधन सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. गृहविलगीकरणाच्या शास्रशुद्ध मार्गदर्शक सूचनांचे पालन होतेय किंवा नाही? यासाठी त्याचे काटेकोर निरीक्षण करण्याची गरज आहे. त्यासाठी मनपा आणि पोलीस यंत्रणेला आता अत्यंत सावधानपणे हातात हात घालून काम करावे लागणार आहे.

परिस्थिती हाताळण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, लागणारी साधने एखाद्या ठिकाणी जर उपयोगात येत नसतील तर ती ताबडतोब जेथे गरजेची आहेत तेथे रवाना करून तातडीच्या उपाययोजना कराव्यात. नाशिक महापालिकेच्या बेड न मिळालेल्या रुग्णाच्या प्रकरणात यापूर्वीच संबंधिताविरुद्ध पोलिसांमध्ये मनपाकडून फिर्याद दाखल करण्यात आलेली असून त्याची योग्य ती चौकशी पोलीस आयुक्त करतील. महापालिका क्षेत्रातील वाढती रुग्ण संख्या विचारात घेता महापालिकेने त्यांच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांमध्ये तात्काळ एक हजारांच्या क्षमतेने बेडसह सुविधा निर्माण करण्यात याव्यात असेही श्री भुजबळ यांनी सांगितले. त्याच प्रमाणे जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्ड चे रूपांतर नॉन कोरोना वॉर्डमध्ये व नॉन कोरोना वॉर्ड चे रूपांतर कोरोना वॉर्ड मध्ये करून जास्तीत जास्त बेड रुग्णांना उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या. ग्रामीण भागातील रुग्ण संख्येमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होत असल्याने भविष्यातील तजवीज म्हणून एसएमबीटी आणि एमवीपी ही दोन रुग्णालये शासन निर्णयानुसार तातडीने अधिग्रहित करण्यात यावीत असे निर्देश श्री भुजबळ यांनी दिले. 

मागील वर्षी करण्यात आलेल्या सर्व उपाययोजना पुन्हा अमलात आणाव्यात – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे  

परिस्थिती मागील वर्षी पेक्षा गंभीर असल्याने मागील वर्षी ज्या ज्या उपाययोजना केल्या होत्या त्याचे अवलोकन करून त्या उपाय योजना पुन्हा अधिक प्रभावीपणे अमलात आणण्याची गरज असल्याचे यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. 

परिस्थिती कठीण पण सर्वजण मिळून मात करू – जिल्हाधिकारी सूरज मांढरे 

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी पण अनेकदा अतिगंभिर प्रसंग आले परंतु आपण संयम ढळू न देता त्यावर मात केली. आता त्यापेक्षा कैकपटींनी अधिक कठीण परिस्थिती आहे, याची जाणीव ठेवून अधिक कार्यक्षमतेने व तयारीनिशी आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. आपण या परिस्थितीवर मात करण्याकरता आपली पूर्ण क्षमता पणाला लावू असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला.

यावेळी झालेल्या चर्चेत नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या बेड बाबत नागरिकांना अधिक सहज रित्या माहिती पोहोचणे बाबतची यंत्रणा उभी करण्यात येईल तसेच खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्काची वसुली तातडीने सुरू करण्यात येईल असे सांगितले. शहर पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय यांनी कंटेनमेंट क्षेत्रातील सर्व नियमांचे पालन सर्व नागरिक व आस्थापना करतील यादृष्टीने कठोर कारवाई पोलीस विभागामार्फत करण्यात येईल असे सांगितले.

पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक रत्ना रावखंडे यांनी आपापल्या क्षेत्रातील उपाययोजना सांगून सहभाग घेतला.