सर्वात वर

उत्तर महाराष्ट्राला सध्या गारपीटीचा धोका नाही : प्रा किरणकुमार जोहरे

काय आहे गारपीटीचे विज्ञान

अंदाज नव्हे माहिती !

नाशिक  : उत्तर महाराष्ट्रात येत्या तीन दिवसात जोरदार गारपीट होणार अशा बातम्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामुळे उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण होत आहे. विशेषत: द्राक्ष व कांदा पिकाचे गारपीटीने नुकसान होईल या भितीने शेतकर्यांची झोप उडाली आहे. तसेच फवारणी व डस्टींग साठी शेतीची औषधे खरेदीसाठी गर्दी होत दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘जनस्थान’ने भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांच्याशी संपर्क साधला असता उत्तर महाराष्ट्राला सध्या गारपीटीचा धोका नाही अशी माहिती  हवामान शास्त्रज्ञ प्रा.किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे ही प्रा.जोहरे यांनी सांगितले.

Prof.-KiranKumar-Johare
प्रा किरणकुमार जोहरे

काय आहे गारपीटीचे विज्ञान ?

कुठल्याही क्षेत्रात गारपीट होण्यासाठी ‘क्युमोलोनिंबस’ ढगांची आवश्यकता असते. मान्सून पुर्व आणि मान्सून पश्चात काळात त्यांची निर्मिती होते. वातावरणातील अस्थिरता, सुर्यकिरणांनी मिळणारी उष्णता आणि त्यामुळे हवेचा वरच्या दिशेने बाष्प घेऊन जाणार जाणारा झोत क्युमोलोनिंबस ढगांची निर्मिती घडवून आणतो. ढगाची उंची दोन किलोमीटर ते आठ किलोमीटर इतकी वाढल्यास पाणी व बर्फाचे कण उष्णतेच्या अभिसरण प्रक्रियेने गोलगोल फिरून चार्ज विलग होतात परीणामी विजांचा कडकडाट होतो. ढगातील तापमान ऋण आठ अंश सेल्सिअस इतके खाली उतरले आणि बर्फाचे कण एकत्र येत ढगात साधारणपणे मोसंबीच्या आकारा एवढे वाढले तर ढगातून खाली येत घर्षण जमिनीवर गारा पडतात. सध्या पुढिल किमान तीन दिवस अशा प्रकारे कुठलीही परीस्थिती उत्तर महाराष्ट्रात नाही त्यामुळे शेतकर्यांनी अफवा पसरवणार्या व नाहक बिनबुडाची भिती निर्माण करणारे अशास्त्रीय मेसेजेस फारवर्ड करू नये असे आवाहन देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी केले आहे.

हवामान खात्याकडे सुविधांचा फायदा शेतकरी बांधवाना होणे गरजेचं

शेतकर्यांना सहा तास अचूक गारपीटीची सूचना देण्यासाठी महाराष्ट्रात किमान एक अब्ज वीस कोटी रुपये खर्च करून डॉप्लर रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपुर आदी डॉप्लर रडारचे नेटवर्क महाराष्ट्राला लाभले ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. डॉप्लर रडारने बोटाच्या पेरा इतक्या भागातील पाणी, पाण्याची वाफ आणि बर्फाचे कण याची अचूक माहिती मिळत असल्याने सहा तास आधी अक्षांश रेखांश नुसार पाऊस, गारपीट, थंडी, वादळ आदींची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी माहिती उपलब्ध होऊ शकते अशी यंत्रणा महाराष्ट्रात उपलब्ध आहे. या यंत्रणेचा फायदा शेतकरी बांधवाना झाला पाहिजे असे हि प्रा किरणकुमार जोहरे यांनी स्पष्ट केले.