सर्वात वर

‘ग्रंथ तुमच्या दारी’च्या दशकपूर्तीनिमित्त वाचक मेळाव्याचे आयोजन

बातमीच्या वर

वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी

नाशिक (Nashik News Update) : ‘ग्रंथ तुमच्या दारी’च्या एकादशपूर्तीनिमित्त ‘वाचाल तर चालाल’‘चालाल तर वाचाल’ या संकल्पनेतून रविवार दि.22 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 वाजता बुक मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते किशोर कदम (कवी सौमित्र), विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर यांची प्रमुख उपस्थितील लाभणार आहे. सदर बुक मार्चचा प्रारंभ कुसुमाग्रज निवास्थान येथून तर समारोप गंगापूररोड येथील कुसुमाग्रज स्मारक येथे होणार आहे. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक यांचे लाभले आहे. अशी माहिती ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे प्रवर्तक विनायक रानडे यांनी दिली.

‘वाचनाने घडवू जीवन’ या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 9.00 वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तर सहभाग अभिनेते किशोर कदम, लेखक प्रविण दवणे, कुटुंब रंगलय काव्यात फेम विसुभाऊ बापट यांचा असणार आहे. संवादक म्हणून सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ असणार आहेत.

सकाळी 10.30 ते 12.00 या वेळात ‘ग्रंथ तुमच्या दारी परिवार वाचक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असून त्यात ‘समग्र कुसुमाग्रज’ या कार्यक्रमात प्रविण दवणे, किशोर कदम, विसुभाऊ बापट सहभागी होणार आहेत.

जगभरात 2000 ग्रंथपेट्यांद्वारे मराठी साहित्याचा सर्वदूर प्रसार होत आहे. एक लाखांहून अधिक ग्रंथसंपदा 2 कोटी, 25 लाखापेक्षा जास्त किंमतीची ग्रंथ संपदा, 15 देशांमध्ये विस्तार, त्यामध्ये भारतात 50 पेक्षा जास्त शहरे, 50 हजारांपेक्षा जास्त वाचक, 8200 हून अधिक लेखक अशी ग्रंथ तुमच्या दारीची घोडदौड आहे. असे विनायक रानडे म्हणाले.  
* बुकमार्चसाठी कुसुमाग्रज स्मारकात आपले वाहन लावल्यास तेथून कुसुमाग्रज निवासस्थानी जाण्यासाठी सकाळी 6.30 ते 7 वेळेत वाहनांची व्यवस्था केली आहे.
* नाशिकमधील लेखक, कवींनी आपले प्रकाशित पुस्तकाचे मुखपृष्ठ ए3 साईजमध्ये लावून हॅण्डबोर्ड तयार करावा व बुकमार्चमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान ग्रंथ तुमच्या दारी ही बालवाचकांसाठीही अभिनव चळवळ सुरू आहे. विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट मार्फत ही योजना सुरू आहे. त्यामाध्यमातून नाशिक शहराबरोबरच आदिवासी पाड्यांपर्यंत ग्रंथपेट्यांचे वाटप करण्यात आले आहे. आजपर्यंत 110 पेट्यांचे वितरण करण्यात आले आहे. बालवाचकांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे.
तरी बुक मार्च व कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विनायक रानडे यांनी केले आहे.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली